पोटोबाची उपासना
मी एक वेळ जेवत होतो. रात्रीच्या वेळेस जेवणाचे निमित्त करून
मी बुधवारच्या बागेत जाऊन बसत असे. काही दिवस ही गोष्ट कोणालाही कळली नाही. परंतु एके दिवशी माझी सारी सत्यकथा प्रगट झाली. त्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सात-साडेसात वाजता मी जेवणासाठी म्हणून बाहेर पडलो. परंतु त्या दिवशी जोगेश्वरीपर्यंत जाऊनच मी परत आलो. बुधवारच्या बागेकडे गेलो नाही. इतक्या लवकर श्याम जेवून कसा आला? राम व इतर सर्वजण चर्चा करू लागले. त्यांची जेवणे खाली होतच होती. मी मुकाटयाने वरती खोलीत बसलो होतो. जेवणे आटपल्यावर ते सारे भाऊ माझ्याभोवती जमले. मी खित्र झालो.
''श्याम, तू जेवून आलास?'' अनंतने विचारले.
''हो,'' मी उत्तर दिले.
''कुठल्या रे खाणावळीत जेवलास? मला ती दाखवतोस? चल, येतोस माझ्याबरोबर?'' रामने सूचक प्रश्र केला.
''श्याम, तुझा हात बघू,'' बाळू म्हणाला.
बाळून माझा उजवा हात घेतला. त्याने वास घेऊन पाहिला. सर्व भावांनी माझ्या दक्षिण करकमलाचे आघ्राण केले.
''मुळीच जेवला नाहीस. हाताला अन्नाचा वास येत नाही.
''जेवलेल्या माणसाचं हे तोंडही नव्हे,'' अनंत म्हणाला.
''जेवलेला श्याम अद्याप घरी यायचा आहे, हे श्यामचं भूत आलंय!'' राम म्हणाला. ''खाणावळीत जेवल्यावर साबण लावून हात धुतात. त्याला वास कसा येईल? उगीच माझी थट्टा का करता?'' मी ओशाळून म्हटले.
''श्याम, आता लपवालपवी नको. अगदी खरं काय ते सांग. रामबद्दल तुला जर काही थोडं-फार वाटत असेल, तर खरं ते सांगशील. स्नेहाला असत्याचं वावडं आहे. सांग,'' राम म्हणाला.
''राम, तुझा श्याम दुपारी एक वेळ जेवतो. रात्री जेवणाच्या मिषाने बाहेर जातो. इकडे-तिकडे हिंडून परत येतो,'' मी सांगितले
''मग चल खाली जेवायला. ऊठ,'' राम म्हणाला.
''मला जरूर नाही. एक वेळ जेवून काही त्रास होत नाही,'' मी म्हटले.
इतक्यात रामची आई वर आली.
''चल रे, भात-भाकरी उरली आहे,'' ती म्हणाली.
मी निमूटपणे उठलो. मातेच्या शब्दांत एक प्रकारचा सहज अधिकार असतो. ते शब्द तोडवत नाहीत, मोडवत नाहीत. मी नळावरून हातपाय धुऊन आलो. जेवलो.
''उद्यापासून तुझी खाणावळ बंद,'' रामची आई म्हणाली.
''किती पैसे त्याला दिले आहेस?'' रामने विचारले.
''त्याला महिन्याचे निम्मे पैसे दिले होते. आता एखादा रूपया द्यावा लागेल,'' मी म्हटले.
''मग उद्या त्याचे पैसे देऊन ये,'' आई म्हणाली.
''तुझ्याजवळ नसतील तर आईजवळ माग,'' राम म्हणाला.
दुस-या दिवसापासून माझी खाणावळ बंद झाली. रामच्या आईजवळून पैसे घेऊन, मी ते देऊन आलो. आता रामकडेच मी दोन्ही वेळां जेवू लागलो. मला अत्यंत संकोच होई. मला प्रसत्र वाटेना. मनाला प्रशस्त वाटेना, पण काय करणार? दोन-चार दिवस असेच गेले.
एके दिवशी रामची आई मला म्हणाली,''श्याम, आज आपल्या वाडयातल्या त्या तात्यांकडे जेवायला जा हो. त्यांनी तुला बोलावलं आहे.''
त्या दिवशी दशमी, द्वादशी, अमावस्या वगैरे काही नव्हते, का बरे त्यांनी मला बोलावले? मी जेवायला गेलो. जेवून आलो. दक्षिणा वगैरे मिळाली नाही. म्हणजे मी भटजी म्हणून काही गेलो नव्हतो. माझा हा वार तर नसेल लावला? पुण्याला मुले वार लावून जेवतात, असे मी ऐकले होते.