खोलपोटी मंडळी
हिंदुस्थानात भिकारी व बैरागी मिळून जवळ जवळ एक कोटीपर्यंत संख्या जाईल. डोक्यावर जटाभार वाढलेले, अंगाला भस्म फासलेले, गळयात व हातात माळा असलेले, कमंडलू बाळगणारे, सर्व हिंदुस्थानाची तीर्थयात्रा बिनपैशाने करणारे, मानापमान गिळून बसलेले, आगगाडीतून उतरा असे सांगताच उतरणारे, असे ते बैरागी, हा भिका-यांचा एक प्रकार. हे चल भिकारी, दुसरे अचल भिकारी. आंधळे, पांगळे, लुळे, थोटे, मुके. हयांचे त्या गावाला संघ असतात. हे हिंदुस्थानभर भटकत नाहीत. त्या त्या गावातच हे भिक्षा मागत हिंडतात. हिंदुस्थानात मनुष्येतर प्राण्यांसाठी पांजरपोळ आहेत; परंतु माणसांसाठी पांजरपोळ नाहीत. अपंग चतुष्पादांची काळजी घेणा-या संस्था आहेत; परंतु अपंग द्विपादांची व्यवस्था लावणा-या संस्था नाहीत. ह्या द्विपादांची व्यवस्था मग मिशनरी थोडी-फार लावतात.
आमच्या दारावरून रात्री आठ वाजल्यापासून किती तरी भिकारी जायचे. 'शिळं-पाकं वाढा हो आई, गरिबाला भात वाढा हो माई,' असे ओरडत ते जायचे. एका भिका-याकडे आमचे लक्ष वेधले.
'कुणी आहे रे अनाथांचा, दीनांचा, गरिबांचा दयाळू? कुणी आहे का रे धर्मी राजा?'' असे तो बोलायचा. त्याच्या शब्दांत एक प्रकारची विशेष आतुरता असे. आवाज-आवाजांतही फरक असतो. पुष्कळ वेळा 'ए भिका-या, थांब' असे म्हणून, आम्ही त्याला थांबावायचे व जे उरलेले असेल ते द्यायचे.
''आपण त्या भिका-याला त्याचं नाव-गाव विचारू या,'' एके दिवशी राम म्हणाला.
''त्याचं नाव-गाव काय विचारायचं?'' अनंत म्हणाला.
''त्याला 'ए भिका-या' असं आपण म्हणतो, त्याऐवजी त्याला त्याच्या नावाने आपल्याला हाक मारता येईल,'' राम म्हणला.?
''खरंच, किती चांगलं होईल!'' मी म्हटले.
आमचे त्याप्रमाणे ठरले. रात्री तो 'धर्मीराजा' त्याच्या शिरस्त्याप्रमाणे आला. आमच्या खिडकीखाली उभा राहिला.
''काय हो, तुमचं नाव काय?'' रामने त्याला प्रश्र केला.
''माझं नाव पुस्ता होय रावसाब?'' त्याने विचारले.
''हो,'' राम म्हणाला.
''माझं नाव बाबूराव आहे, दादा.'' तो म्हणाला.
''चागलं आहे तुमचं नाव,'' मी म्हटले.
''आम्ही तुम्हांला बाबूराव म्हणूनच हाक मारीत जाऊ,' राम म्हणाला.
''असं कशाला महाराज?'' तो म्हणाला.
''तुम्हांला आवडेल ना?'' रामने विचारले.
''न आवडायला काय झालं दादा? परंतु आंधळया भिका-याला कोण म्हणेल बाबूराव?'' तो खित्रतेने म्हणाला.
''आम्ही म्हणू.'' मी म्हटले.
''देव तुमचं भलं करो,'' तो म्हणाला.
आम्ही त्याला भाकरी दिली, बाबूराव निघून गेला. त्या दिवसापासून आम्ही त्याला 'ए भिका-या' अशी हाक पुन्हा कधीही मारली नाही. 'बाबूराव, थांबा हं जरा,' असे आम्ही त्याला म्हणायचे. भिका-याला 'बाबूराव' म्हणून हाक मारणारे माझ्या रामसारखे कितीसे लोक असतील? भिका-याला आदराने भिक्षा घालणारे, त्याच्या पदरात भाकरी-तुकडा प्रेमाने नीटपणे वाढणारे असे किती लोक असतील? भिका-याचा मान कोण राखणार? त्याल गोड हाक कोण मारणार? भिका-याला मन, बुध्दी, हृदयही आहेत, ह्याची कितीकांना जाणीव असते? भिका-यांनाही काही थोडयाफार भावना असतात, हे कितीकांना समजते? त्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून कोण जपतो? समजात भिकारी आढळणे, हा सामाजिक रचनेचा दोष आहे. सरकारी राज्यपध्दतीचा दोष आहे. अपंग लोकांकडनूही सहानुभूतिपूर्वक काही काम करून घेता येईल. त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवता येईल. परंतु ज्या देशात धट्टयाकट्टया लोकांनाही काम मिळत नाही, तेथे आंधळया-पांगळयांपासून कोण काम घेणार? जेथे धडधाकट लोकांचा स्वाभिमान टिकत नाही, तेथे ह्या अनाथांचा स्वाभिमान कसा टिकणार?