वाडीची यात्रा

सदानंद गेल्यापासून माझा आनंद कित्येक दिवस मावळला होता. आधीच आनंदाची माझ्या घरी वाण आणि त्यात प्रिय भावाचे मरण। मी नेहमी उदास व दु:खी-कष्टी असा असे. आधीच मला बोलायला हवे कमी; आता तर मी जणू मुकाच झालो. शाळेतून घरी येताच मी एकटाच कोठे तरी दूर दूर फिरायला जात असे. परत घरी यावे, तो रात्रीचे दहाही वाजून जात. कोणी म्हणत, ही कवीची लक्षणे आहेत. कोणी म्हणत, ही वेड लागण्याची चिन्हे आहेत!

इतक्यात दिवाळी जवळ येऊ लागली. सुटटी लागणार होती. मुले नाना प्रकारचे विचार करू लागली. मी कोठे जाणार? कोकणात घरी जाणे शक्यच नव्हते. पैसे कोठे होते? माझ्याजवळ फक्त दोन रूपये होते. तेवढयात जर कोठे भटकून येता आले, तर मी पाहात होतो. शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी सांगली, मिरज, नरसोबाची वाडी वगैरे ठिकाणी जायचे ठरवले. रेल्वेचे सवलतीचे दर होते. त्या मित्रांमध्ये मीही सामील होण्याचे ठरवले. रेल्वेचे सवलतीचे दर होते. त्या मित्रांमध्ये मीही सामील होण्याचे ठरवले.

स्टेशनपर्यत आम्ही पायीच चालत गेलो. शक्य तो काटकसर करायची असे सर्वांनी  ठरवले होते. आम्ही रहिमतपूरला गाडीत बसलो, मिरजला उतरलो. मिरजला कोणाकडे जायचं? चर्चा सुरू झाली.

''माझ्या गावची इथे ओळख आहे. तुम्ही येता का मिथे?'' शंकरने प्रश्र केला.
''तुझ्या गावचं इथे कोण आहे?'' त्याला विचारण्यात आले.

''माझ्या गावच्या ओळखीच्या शेतक-याची मुलगी इथे राहाते. तिचा नवरा टांगेवाला आहे. आपण जाऊ या तिच्याकडे तिला खूप आनंद होईल. ती लहानपणी आजारी होती. तेव्हा माझ्या आईचया औषधाने तिला बरं वाटलं, ती माहेरी आली, म्हणजे आमच्याकडे येते. मी तिला माझी बहीण मानतो. मी भाऊबीजेला तिच्याकडेच राहीन. येता का मग?'' शंकरने विचारले.

''त्यांच्याकडे सगळयांना झोपायला जागा असेल का?'' एकाने शंका विचारली.
''तिथे घोडयाच्या पागेत निजावं लागेल,'' दुसरा म्हणाला.
''परंतु तिथे सर्व गोष्टींना सुंदरता देणारं प्रेमही मिळेल,'' मी म्हटलं.
''आधी जेवायचं कुठे ते ठरवा. आकाशाखालीही झोपता येईल,'' एकजण म्हणाला.
''तुम्हाला तिथे जेवायला मिळेल, प्रेमाची भाजी-भाकरी मिळेल.'' शंकर म्हणाला.
''कुणटब्याकडे जेवायचं?'' एकाने तोंड वाकडे करून विचारले.
''त्यात काय झालं? भाजी-भाकरी कुठलीही असली म्हणून काय बिघडलं?'' मी म्हटले
''प्रवासात सारं पवित्र आहे. हा आपध्दर्म आहे,'' तिसरा एक म्हणाला.

शेवटी शंकरच्या त्या मानलेल्या बहिणीकडे आम्ही सहाजण होतो. शंकर आत गेला. त्याच्या बहिणीला अपरंपार आनंद झाला. जणू देव आले, असे वाटले. तिचे लहान मूल शंकरने घेतले. तिने झाडले. बसायला तिने एक घोंगडी पसरली. आम्ही सारे तेथे प्रेमाने बसलो.

''ताई, भाजी कसली करतेस?'' शंकरने विचारले.
''वांग्याची, कृष्णाकाठीची वांगी. त्याला ठेव तुझ्या मित्रांजवळ व तू वांगी दे चिरून,'' ती बहीण म्हणाली.

शंकरने त्या मुलाला आमच्याजवळ ठेवले. शंकर बहिणीला मदत करू लागला. ते मूल प्रथम हसत-खेळत होते; परंतु आमचे अनोळखी चेहरे पाहून ते घाबरले. आमचे चेहरे का त्याला राकट दिसले? ते मूल रडू लागले. मी त्याला उचलून घेतले. मी त्याला बाहेर घेऊन गेलो. रस्त्यावरचे दिवे त्याला दाखवू लागलो. ते मूल रडायचे राहिले. ते झोपेला आले होते. हळूहळू त्याने माझ्या खांद्यावर मान टाकली. बाळ झोपले. मी त्याला थोपटीत होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel