सुंदर तुझी मूर्ती।

ते नवरात्राचे दिवस होते. औंधच्या यमाईच्या मंदिरात उत्सव होता. नऊ दिवस सर्वांना मुक्तद्वार होते. यावे नि जेवून जावे. नऊ दिवस तरी मला जेवणाची काळजी नव्हती. किती जाड जाड पोळया असत त्या! दोन चतकोर खाल्ले, की माझे पोट भरत असे.

त्या दिवशी मंगळवार होता. सकाळची शाळा होती. मंगळवारी औंधचा बाजार असे. त्या दिवशी माझ्या नावे तीन पत्रे आली होती. दोन कार्डे होती, एक पाकीट होते. त्या दोन्ही कार्डांत मरणाचीच वार्ता होती. माझ्या रामचा धाकटा भाऊ तापाने मरण पावला होता. दापोलीच्या शाळेतला माझा एक मित्र शंकर, त्याची मरणावार्ता दुस-या कार्डात होती. आणि तिस-या पत्रात काय निघते, असे मनात आले. भीत भीत मी ते पाकीट फोडले. त्यातही निधनवार्ताच होती! माझा धाकटा भाऊ सदानंद पुण्यास प्लेगला बळी पडल्याची दु:खद वार्ता होती. ते मावशीचे पत्र होते.

सप्रेम आशीवार्द

श्याम, लिहू नये ते लिहायची पाळी माझ्यावर आली आहे.
सर्वांचा आवडता सदानंद देवाकडे निघून गेला. पुण्यास प्लेगची साथ होती सदानंदला घेऊन मी आप्पाकडे गेल्ये होत्ये. पुण्यास गणपतीचा उत्सव होता. तो उत्सव पाहाण्यासाठी म्हणून सदानंद तिथे राहिला. मी एकटीच हिंगण्याला आल्ये. परंतु चार दिवसांनी निरोप आला, 'सदानंद आजारी आहे, ताबडतोब ये.' मी तशीच पुण्यास गेल्ये. सदानंद तापाने फणफणत होता. त्याला मोठा गोळा आला होता. गोळा चिरण्यात आला. सदानंद वाचणार असे मला वाटले. आप्पाची मुलगी शांता, तिलाही ताप आला. शेजारच्या यमूताई, त्यांचीही मुलगी तापाने बेफाम झाली. शांतीच्या व यमुताईंच्या लिलीचा शस्त्रक्रिया करण्यात आली. शांती व सदानंद बरी होती असं वाटत होतं. परंतु दुदैव! सदानंदाला दुसरा गोळा आला! आता मात्र उपाय नव्हता. एकदम त्याला वातच झाला. तो वातात बोले. सारखं 'दत्तगुरु, दत्तगुरु' म्हणत होता. मध्येच तुझी आठवण काढी. 'अण्णा, दिवाळीत ये हं. मग पोटभर जेव,' असं म्हणे. 'ते पाहा चारपाच जण मला बोलवीत आहेत! खुणा करीत आहेत. मी जातो. शांती काही येत नाही लिली व मी दोघंजण जातो. चल लिल्ये,' असं बोले, आमची सारी आशा सुटली. शेवटी देवाचं नामस्मरण करित तो निघून गेला.

मी देवाला म्हणत होत्ये,' 'सदानंदचं दुखणं मला दे' किती मनापासून मी प्रार्थना केली! परंतु देवाने माझं देवाने माझं म्हणणं ऐकलं नाही. सदानंदाला किती आशेने मी कोकणातून आणलं? आता तुझ्या घरी काय लिहू? अक्कांच समाधान कसं करु? मी सदानंदाला पुण्यास ठेवलाच का? माझीच चूक; परंतु मेळे वगैरे पहायला ठेवला. त्यानेही हट्ट धरला होता. पुढचं कोणाला ठाऊकत्र मी कमनशिबी, दुसरं काय?

श्याम, सदानंदवर तुझं फार प्रेम होतं. अक्का नेहमी आजारी, म्हणून तूच त्याला अगदी लहानपणापासून वाढवलंस. तू त्याला खेळवलंस, बोलायला शिकवलंस तुझाच त्याला लळा होता. तुझीच आठवण तो काढीत होता. त्याच्या मरण्ााने सर्वात अधिक दु:ख तुलाच होईल. तुझं सांत्वन मी कसं करु? शक्य ते सारे उपाय आम्ही केले. मी स्वत:चे प्राणही देऊ केले. आणखी काय करणार? मानवी आशा विरुध्द देवाची इच्छा, असा ऐहिक जीवनाचा कायदाचा आहे जण्ाू, शेवटी त्याची इच्छा प्रमाण. असंच आपण म्हटलं पाहिजे. श्याम, तू एकटा आहेस. संयम राख. दुस-याच्या दु:खाकडे पाहून स्वत:चं दु:ख विसरता येतं.

इथे शेजारी एक बाई आहे. तिची तीन मुलं प्लेगात गेली. तिने काय करावं? तुम्ही अजून तिघे तुमच्या आई-बापांना आहांत. जगात आपल्यापेक्षाही अधिक आपत्ती इतरांवर आहे. तिकडे लक्ष द्यावं व समाधान मानावंत्र. विवेकानंच समाधान निर्मावं लागतं. तू घरी अक्काला चांगलंस पत्र लिही. तुझ्या लिहिण्याचा तिच्यावर परिणाम होईल. नाही तर ती हाय घेऊन बसेल. सांत्वनपर असं सुंदर पत्र लिही. 'आई आमच्याकडे बघ व दु:ख आवर,' असं लिही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel