हा श्लोक मी म्हणून दाखवला. तो सर्वांनाच आवडला.' आणखी म्हण श्याम, आणखी म्हण,' मला आग्रह झाला.
गतसारेऽत्र संसारे कुत: सौख्यं शरीरिणाम्।
लालापानमिवांगुष्ठाद् बालानां स्तनवद् भ्रम:॥
मी हा श्लोक म्हटला व त्याचा अर्थही समजावून दिला
''श्याम, हे श्लोक तुझ्या लक्षात कसे राहातात?'' एकाने विचारले.
''ते किर्तनकार ते श्लोक पुन:पुन्हा घोळून म्हणत. त्यांचा आवाजही फार गोड होता. म्हणून लक्षात राहात,'' मी म्हटले.
''इथले आपले महाराजही कीर्तन करतात,'' मोदी म्हणाला.
''परंतु त्यांची वाणी मधुर नाही वाटत. त्या वाणीत प्रसाद नाही वाटत. त्यांच्या वाणीत कठोरता वाटते,'' मी म्हटले.
'पीळदार शरीराप्रमाणे त्यांची वाणीही पीळदार आहे,'' काळे म्हणाला.
खोलीत अंधार पडू लागला. डासांनी गाणी सुरु केली.
''मी आता जातो,'' मी म्हटले.
''येत जा, श्याम,'' काळे म्हणाला.
इतर मुले तेथेच बसली होती. मी निघालो. मी एकटाच टेकडीकडे फिरायला गेलो. मुले मला सहानुभूती दाखवीत होती. मला आनंद झाला होता. अनेक विचार करीत करीत मी कितीतरी दूर गेलो. शेवटी माघारी वळलो. माझ्या खोलीत मी आलो. दिवा लावला व वाचीत बसलो. इतक्यात एकाएकी सखाराम माझ्या खोलीत आला.
''काय श्याम, झालं का जेवणखाणं?'' त्याने विचारले.
''आज काळेकडे गेलो होतो. खूप फराळ झाला. पोट भरलं आहे. शिवाय ' भुकी राखे चौथा कोन' अशी म्हणही आहे, '' मी हसत म्हटले.
''भुकी तो सुखी,'' सखाराम म्हणाला.
''त्या दृष्टीने आपला देश सर्वात सुखी आहे,'' मी खिन्नपणे म्हटले.
''श्याम, तुला एक विचारायचंय. किती दिवस विचारीन, विचारीन म्हणतोय, आज विचारतोच,'' तो म्हणाला.
''विचार ना,'' मी म्हटले.
''तुझं संस्कृत चांगलं आहे,'' तो म्हणाला.
''मग का क्लास काढू?'' मी हसून विचारले.
''हो,'' तो म्हणाला
''सखाराम, संस्कृत साहित्याचा अर्थ मला समजतो; परंतु व्याकरण तितकं माझं चांगलं नाही,'' मी म्हटले.
''अरे क्लास इथे नाही काढायचा,'' तो म्हणाला.
''मग कुठे?'' मी विचारले.
''पुण्याला, नारायण पेठेत,'' त्याने उत्तर दिले.