मी तिस-या प्रहरी घरी गेलो. सखारामला माझे माधुकरीचे अनुभव सांगितले; मुजावर, एकनाथ, हमजेखान सारे तेथे जमले.

''तुम तो फकीर बन गये,'' मुजावर म्हणाला.

''शिकण्यासाठी सारं करावं लागतं,'' मी म्हटले.

''आम्ही दोघे भाऊ हाताने करतो. श्याम तू आमच्यातच ये ना जेवायला,'' एकनाथ म्हणाला.
''परंतु पैसे कुठून देऊ?'' मी विचारले.
''पेसे काय करायचे? आमचे वडील आणखी थोडी ज्वारी पाठवतील. आम्ही झुणका भाकरी करतो. सुटसुटीत काम!'' एकनाथ म्हणाला.

''एकनाथ, तू वेडाच आहेस. असं कसं चालेल?'' मी म्हटले.
मी एकदम माझ्या खोलीत गेलो. लहानपणी मला आगगाडीत भेटलेल्या माधवचे स्मरण झाले. माधवचे ते चरण आठवले.

प्रेमाचे भरले वारे ।
भाऊ हे झाले सारे॥

हा एकनाथ त्याच वृत्तीचा दिसला. ना ओळख परंतु एकदम म्हणाला, ''आमच्याकडे येत जा!''
एकनाथच्या त्या सहज प्रेमाने व बंधुभावाने मी भांबावलो. देवाच्या जगाची गंमत वाटली. हृदयं कृतज्ञतेने भरुन आले. जगात काही सारा कचराच नाही. त्या कच-याच्या राशीत टपोरे मोती आहेत. परंतु हे टपोरे मोती कोण पाहील? कोण पूजील? कबिराच्या एका पदाची मला नेहमी स्मृती येत असते.

नजर न आवे आत्मज्योति ॥
तैल न बत्ती बुझ नही जाती
जैसे निर्मल मोती ॥ नजर०॥
कहत कबीर सुनो भाई साधू
घर घर वाचत पोथी॥ नजर०॥

गाथा, ज्ञानेश्वरी, गीता हयांचचं प्रत्येक घरात अध्ययन आहे; मनाचे श्लोक घोकले जात आहेत; परंतु मनुष्याचा निर्मळ आत्मा कोणाच्याही डोळयांना दिसत नाही. सारे जगावर रुसतात, रागारागात सारे जगाला छळतात, जाळतात, पोळतात, सर्वाच्या अंतरंगातील दिव्यता दिसण्याचे दूर राहिले; परंतु एकनाथसारख्यांची ही घडणारी दर्शने तरी आपल्या मनास उन्नत का करु नयेत? ह्या जगाबद्दल अशा दर्शनामुळे प्रेम का वाटू नये?

मी कधी कधी ह्या जगाचा तिटकारा करीत असतो. ह्या जगाचा निषेध करुन मरावे, असे मला वाटते; परंतु त्या वेळेस मी कृतघ्न होत असतो, खरोखरच ह्या जगात मला अपरंपार सहानुभूती व प्रेम दोन्ही लाभली आहेत. इतके प्रेमाचे पाऊस पडणारे मित्र दुस-या कोणाला लाभले असतील, असे मला वाटत नाही. असे असूनही ह्या जगाचा मला कंटाळा का येतो? एकाच गोष्टीमुळे जगाने दिलेल्या अपरंपार प्रेमाचा  मी उतराई कसा होऊ ह्याच एका विचाराने मी कष्टी होतो. माझ्यासारख्या कर्महीनाला जग इतके प्रेम का देते, ते मला समजत नाही. त्या प्रेमाने मी गुदमरतो. हे प्रेमच मला 'मर' असे सांगते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel