आईची शेवटची भेट

मी कोकणात गेलो, पण एकदम घरी नाही. 'प्लेगमुळे मी औंध सोडून येत आहे,' असे घरी पत्र पाठविले होते. त्यामुळे घरी माझी काळजी करणार नाहीत, असे वाटले. पालगडला घरी जाण्याआधी, दापोलीला, माझ्या मित्रांचा पाहुणचार घेत, मी दोन राहिलो. दापोलीला राम नसला, तरी दुसरे पुष्कळ मित्र होते. त्यांना भेटल्याशिवाय मी परभारा कसा जाऊ?
दापोलीच्या बोर्डिगात माझा शिवराम नावाचा एक मित्र राहात होता. त्याने तेथे बि-हाड केले होते. त्यांची आई व दोन लहान मामेभाऊ तेथे होते. मी त्याच्या बि-हाडी गेलो. त्याला खूप आनंद झाला. त्या दिवशी हाताने स्वयंपाक करायची पाळी होती. शिवरामची आई दुरून सारे सांगत होती.

'' शिवराम, आज मी आलो आहे, तर मलाच करू दे स्वयंपाक. देवाने चांगली संधी आणली आहे,'' मी म्हटले.
'' अरे, तू लांबून पाहूणा आलेला. इतर मुलं हसतील,'' शिवराम म्हणाला.

'' तू हसू नको म्हणजे झालं. निदान पोळया तरी मी करीन. अरे औंधला जाऊन इतर काही शिकलो नसलो, तरी स्वयंपाकात तरी मी नि:संशय प्रगती केली आहे,'' मी म्हटले.
'' करू दे हो श्यामला पोळया,'' शिवरामची आई म्हणाली.

शिवरामच्या आईच्या तोंडावर जी सात्त्विता होती. तशी सात्त्विता मी क्कचिमच कोठे पाहिली असेल राहून राहून ती पवित्र मूर्ती कधी कधी माझ्या डोळयांसमोर येते. पती अंमळ वेडसर होऊन कोठे निघून गेलेला. त्याचा पत्ता लागत नव्हता. भावाच्या आधाराने ही थोर सती आपला एकुलता एक मुलगा शिवराम ह्याला घेऊन राहिली होती. भावाचीही पत्नी निवर्तली होती. भावाच्या लहान मुलांना तिनेच वाढवले. भाऊ जरा रागीट होता. परंतु ती साध्वी सारे सहन करी व सर्वांमाना सांभाळी.
आईने सांगितल्यावर शिवरामचा इलाज नव्हता. मी चुलीजवळ बसलो. मी चांगल्या पोळया केल्या. कशा छान फुगत होत्या मला शाबासकी मिळाली. ताक करायचे होते. मी ताकही केले व कढत घालून लोणीही काढले.

'' श्याम, अगदी सारं तुला करता येतं रे '' शिवरामची आई म्हणाली.
'' निदान आचारी म्हणून तरी कुठे राहाता येईल,'' मी म्हटले.

आमची जेवणे झाली. शिवरामबरोबर मी इंग्रजी शाळेत जाणार होतो. सर्व वर्गबंधूंना भेटायला मी उत्सुक होतो. मला सारखे हसू येत होते. ज्या वेळेस मला फार आनंद झालेला असतो, त्या वेळेस मला सारखे हसू येते. ते काही केल्या थांबत नाही. झ-याचे पाणी जसे बुडबुड बाहेर येते, तसे माझे होते.

मी एकदा गुजरातमध्ये एका गावी गेलो होतो. तेथे राष्ट्रीय शाळा चालवणारे तुरूंगात माझे मित्र झाले होते. त्यांना भेटायला म्हणून मी गेलो. शाळेतील मुले-मुली पाहून मी सारखा मंदमधुर हसत होतो. ती मुले म्हणाली, ''हे हसरे आहेत.'' मी त्यांना म्हटले, ''परंतु लोक मला रडका म्हणतात.'' ते लोकांचे म्हणणे त्या सरळ मुलांना पटले नाही. मुलांचे म्हणणे बरोबर होते. स्वभावत: मी अत्यंत आशावंत  आनंदी आहे. माझ्या निराशेतही अपार आशा असते व माझ्या अश्रूंतही अनंत स्मिते असतात, म्हनूनच रडता रडता मी एकदम खुदकन मुलांप्रमाणे हसतोही. कारण ते रडणे, सहज आकस्मिक आलेले क्षणभंगुर पटल असते. गुजरातेतली त्या खेडयाातील मुले तरी मला 'हसरा' म्हणून संबोधीत!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel