''आजोबा कुठे गेल?'' मी विचारले.
''ते कामाला गेले आहे,'' म्हतारी म्हणाली.
''तुम्ही इथे किती दिवस राहणार?'' मी विचारले.
''येत्या बुधवारी किंवा शुक्रवारी जाऊ'' ती म्हणाली.
''लवकरच जाणार तर,'' मी खिन्नपणे म्हटले.
''इथे किती दिवस राहायचं?'' जाऊ आपल्या घरी. श्याम, तुकारामने ही पुरचुंडी आणून दिली आहे. मी भाकरी भाजून देते. सकाळी तू जेवला नाही,'' ती म्हणाली.
''परंतु मला फिरायला जायचं आहे,'' मी म्हटले.
''उपाशी पोटी नको जाऊ कुठे. तिन्हीसांजची वेळ आहे.'' ती म्हणाली.

शेवटी मी उठलो. मी चूल पेटवली. आजीबाई चुलीजवळ गेली. तिने मला दोन भाक-या भाजून दिल्या. चण्याचे थोडे पीठ होते, ते तिने कालवून तव्यावर टाकले. स्वयंपाक तयार झाला. मी जेवायला बसलो. एकाएकी माझे डोळे भरुन आले.
''श्याम, काय झालं?'' म्हातारीने विचारले.

मी काही बोललो नाही. भाकरीचा तुकडा माझ्या हातात होता. पानात टपटप पाणी पडले म्हातारी जवळ आली.
''श्याम, काय झालं? तिन्हीसांजा असं डोळयात पाणी आणू नये. जेव बरं'' ती म्हणाली.

''तुम्ही खरोखर माझ्या कोण? मी, कोण तुम्ही कोण? मी कुठला, तुम्ही कुठल्या? मी त्या दरिद्री कोकणातला भिकारडा पोरगा. माझ्यासाठी तुम्ही एवढं सारं का करावं? मी ब्राम्हण. तुम्ही माझ्या ना जातीच्या, ना गावच्या. माझ्याबद्दल एवढं प्रेम तुम्हांला का वाटतं? का वाटावं? कुणी ओतलं हे प्रेम तुमच्या हृदयात? माझी आई  का येऊन बसली आहे तुमच्या डोळयांत? माझी आई का आली आहे तुमच्या ह्या मायाळू हातात? आपली का पूर्वजन्मीची ओळख आहे? काय आहे हे सारं? का तुम्ही माझ्यासाठी हे सारं करतां?'' असे म्हणून मी म्हातारीच्या मांडीवर डोके टेकले. तो भाकरीचा तुकडा तसाच माझ्या हातात होता. तिने माझे डोळे पुसले. मी शांत झालो. तसेच डोक टेकून मी होतो. मी डोके उचलले. आजीबाईच्या डोळयांकडे पाहिले. किती सात्विक होती मुद्रा! किती साधेपण, सरळपणा, सौम्यता, स्निग्धता, मधुरता तेथे होती! खरे निर्हेतुक पिकलेले प्रेम तेथे दिसत होते.

'' जेव आता. मी दिवा लावते. कुठे आहे काडीपेटी?'' तिने विचारले.
त्या खोलीत दिवा लागला. मी जेवलो. मी माझी सारी खरकटी बालडीत घातली. झ-यावर जाऊन घासून आणावी, असे मनात आले. मी उठलो. सदरा घातला. बालडी हातात घेतली. वहाणा घातल्या व निघालो.

समोरच्या मशिदीत दिवे लागले होते. आकाश निरभ्र असल्यामुळे तारे चमकत होते. मी झ-यावर गेलो. तो कर्मयोगी झरा शांतपणे तेथे झुळझुळ वहात होता. त्याला दिवस व रात्र त्याचे अखंड नाम-संकीर्तन सुरुच असे.त्याचे हृदय सारखे उचंबळून येऊन वाहातच असे. ती पवित्र वेळ होती. प्रार्थनेची वेळ होती. संध्येची वेळ होती. नमाजाची वेळ होती. मी बालडी तेथेच ठेवली. झ-याच्या काठच्या खडकावर मी मांडी घालून बसलो. मी डोळे मिटले.

शेवटी मी उठलो. भांडी घासली. ती मातीने घासलेली भांडी विसळण्यासाठी त्या स्वच्छ झ-यात त्या वेळेस बुडवायला मला धीर होईना. अशा प्रशांत वेळी तो झरा का मी अमंळ करु? त्याची समाधी का भंगू? त्याच्या प्रार्थनेत का खंड पाडू? मी अलगद बालडी बुडवून, भरुन बाहेर आणली. बाहेरच भांडी विसळली. नंतर सारी भांडी बालडीत भरली. मला तेथून जावेसे वाटेना. त्या झ-याची मंजुळ खळखळ मला मोह पाडीत होती. परंतु मला एकदम भीती वाटू लागली. भीतीची कल्पना मनात येताच मी उठलो. त्या बाजूस रात्री लांडगे येतात. असे मी ऐकले होते, त्याची आठवण झाली. मी निघालो. साचलेल्या डबक्यातून बेडूक ओरडत होते. क्वचित काजवे दिसत होते, काजवे आता कमी झाले होते. नाहीतर पावसाच्या आरंभी झाडे पेटल्याप्रमाणे दिसत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel