''होय. दु:खद घटना आहे ही. रामचा भाऊ गेला. माझा भाऊ गेला. रामचाही सर्वात धाकटा भाऊ माझाही स सर्वात धाकटा भाऊ. आम्ही समदु:खी आहोत. मी माझ्या दु:खात चूर आहे. रामची मला आठवणही नाही. रामही भावासाठी असाच रडत असले का? माझ्याइतका तो असंयमी नाही. तो दु:ख आवरील. फार रडत बसणार नाही. आदळ-आपट करणार नाही. रानावनात भटकणार नाही,'' मी म्हटले.

''दु:खाचा बाहय आविर्भाव हे रानटीपणाचं लक्षण आहे. रडारड माणसाला शोभत नाही'',
सखाराम म्हणाला.

''सखाराम, तुझं हदय जरा कठीण आहे. त्या दिवशी माझ्या पायात घुसलेली काच चरचर पाय कापून तू काढून टाकलीस. चाकू चालवायला असं धैर्य मला झालं नसतं,'' मी म्हटले.

''तो कठोरपणा नव्हता. ती दया होती. त्या वेळेस पाय न कापणं म्हणजेच निर्दयपणा झाला असता,'' गोविंदा म्हणाला.

''रडतो तो कोवळया मनाचा, न रडणारा तो दगड, असं का श्याम तुला वाटतं? ती चूक आहे. रडणारं नाडतात व न रडणारे तारतात. अशा किती तरी अनुभवाच्या गोष्टी आहेत. जसं दिसतं तसं नसतं,'' सखाराम म्हणाला.

मी आकाशात पाहात होतो. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. आई माझ्या सदानंदाला ओवी म्हणत असे. ती मला आठवली

मोठे मोठे डोळे । भिवया चंद्रज्योती ॥

सुंदर तुझी मूर्ती । तान्हे बाळा ॥

ते डोळे, त्या सुंदर भिवया, त्यांची आता माती झाली. त्यांची फक्त स्मृतीच राहिली.

''काय पाहातोस, श्याम?'' गोविंदाने विचारले
''चंद्राची कोर बघ कशी गोड आहे,'' मी म्हटले.
''एका पर्शियन कवीने म्हटलं आहे, माझ्या प्रियेचं नख काढलं, त्याची आकाशात
चंद्रकोर झाली,'' सखाराम म्हणाला.
''माझ्या भावाच्या भिवया अशाच कामानदार दिसत! आई त्यांना चंद्रज्योतीची उपमा देत असे, अशी चंद्रकोर पाहिली, की नेहमी मला माझ्या भावाचं स्मरण होईल,'' मी म्हटले.
''भावाचं अमर स्मारकच म्हणायचं ! आकाशातल्या तारामंडळात स्मारक!'' गोविंदा म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel