ज्या दिवशी माझा वार नसे, त्या दिवशी मी तुळशीबागेत किंवा जोगेश्वरीच्या देवळात जाऊन बसत असे. लागोपाठ दोन उपवास येणार नाहीत, अशा रीतीने मी वारांची व्यवस्था केली होती. दुपारी तुळशीबाग व रात्री बुधवारची बाग. दुपारी राम बघावा, रात्री बुधवारच्या बागेत बसून आकाशातील तारे बघावे. बुधवाराच्या बागेत रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत बसून, मी पुन्हा रामच्या आईसाठी तुळशीबागेतल्या दत्ताला जात असे.

जोगेश्वरीच्या देवळात पाणी पिण्याची सोय होती. थंडगार पाणी. अंबाबाईच्या घरचे पाणी पिऊन, श्याम शिकायला जाई. एखादे वेळेस खिशात आणा, दोन आणे असले, तर मी डाळे-मुरमुरे किंवा पेरू घेऊन खात असे. अर्ध्या आण्यात पोट भरल्यासारखे वाटे.

एके दिवशी मी जोगेश्वरीच्या देवळात बसलो होतो. एक सभ्य गृहस्थ देवदर्शन करून माझ्याजवळ आले. लांब पांढरा कोट, त्याच्यावर घडी घातलेले उपरणे, डोक्यावर पागोटे, असे ते पोक्त गृहस्थ आले. ते माझ्याकडे चमत्कारिक दृष्टीने बघत होते. त्यांना मी कोणी तरी लफंग्या आहे, असे वाटले. तमासगीर आहे, असे वाटले. कारण माझे केस वाढलेले होते. सहा-सहा महिन्यात मी हजामत करीत नसे. आमचे बोलणे-चालणे झाले. शेवटी मी एक विद्यार्थी आहे, हे त्यांना कळून आले.

''तुम्ही विद्यार्थी आहांत ना, मग इथे का?'' त्यांनी विचारले.
''इथे जेवायला आलोय,'' मी म्हटले.
''इथे कोण जेवायला वाढणार?'' त्यांनी हसून प्रश्र केला.
''जगदंबा, जोगेश्वरी,'' मी म्हटले.
''स्वच्छ काय ते सांग ना,'' ते जरा त्रासिक स्वरात बोलले.

''मी वारकरी आहे. ज्या दिवशी माझे वार नसतात, त्या दिवशी मी देवाच्या दारी येऊन बसतो. जगाने लोटलेला गरीब मुलगा देवाकडे नाही जाणार, तर कुठे जाणार?'' मी सांगितले.

''चला आजचा वार माझ्याकडे. ह्या दिवशी माझ्याकडे येत जा,'' ते गृहस्थ सद्भावाने म्हणाले.

त्यांनी अगदी हात धरून मला उठवले. मी त्यांच्याकडे गेलो व पोटभर जेवलो. त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. जर कधी तापा-बिपाने आजारी असल्यामुळे मी त्यांच्याकडे जेवायला जाऊ शकलो नाही, तर ते रामच्या घरी येऊन माझी चौकशी करायचे. ते रोज निरनिराळया देवळात जाऊन देवदर्शन करायचे. अशाच एका देवदर्शनाच्या त्यांच्या रस्त्यावर राम वगैरे राहात असत. त्या गृहस्थांबद्दल मला आदर वाटे. नाही तर वारक-याचे घर जरी आपल्या रस्त्यावर असले, तरी त्याची कोण चौकशी करणार? वारक-याबद्दल इतकी सहृदय भावना कोणता अन्नदाता दाखवणार?

मला वाराच्या घरी सर्वत्र सौजन्याने वागवीत. कोणी कधी हिडीस-फिडीस केले नाही. क्वचित कोठे कोठे जरा कटू अनुभव आले, परंतु ते यायचेच! ते कटू अनुभव काही अडाणी माणसांच्या अडाणी व संकुचित वृत्तीमुळे येत; परंतु तेथल्या दुस-या माणसांची उदारता पाहून मी ते सारे विसरून जात असे. पुष्कळ वेळां यजमान उदार असतो; परंतु घरातली इतर माणसे अनुदार असतात आणि ती तो अनुदारपण यजमानाच्या दृष्टीस पडणार नाही अशा खबरदारी घेत असतात.

मला किती तरी गमतीच्या आठवणी येत आहेत, पण एकच सांगतो. एका घरी मी नित्याप्रमाणे जेवायला गेलो, घरातली लहान-थोर सारी शाळेत जाणारी मुले जेवायला बसली होती. त्या मुलांतला एक मुलगा नुकताच मराठी चौथ्या यत्तेत गेला होता. त्याला अपूर्णांकांची ओळख करून द्यायला शाळेत सुरूवात झाली होती. त्याची आई वाढीत होती.

''भाकरी हवी का?'' आईन त्याला विचारले.
''हवी,'' त्याने सांगितले.
''किती वाढू?'' आईने विचारले.
''तीन अष्टमांश वाढ,'' तो म्हणाला.

आम्ही सारी हसू लागलो. मला तर हसू आवरेना. मिळालेले नवीन ज्ञान दाखवायला आपण किती उत्सुक असतो!
माझ्या त्या नव्या मित्राने जो एक वार कबूल केला होता,  त्याच्या घरी यमूताई म्हणून एक वृध्द आजी होत्या. त्या आजी एकटयाच होत्या. माझा मित्र त्यांच्याकडे राहिला होतो. त्यांचे नाते होते. यमूताई अत्यंत धार्मिक होत्या. त्यांचे देवदेवतार्चन फार. त्या प्रत्यही पहाटे उठून, ओंकारेश्वरावरून स्नान करून यायच्या. त्यांचे माझ्यावर प्रेम जडले. त्यांच्यासंबंधी पुन्हा केव्हा तरी सांगेन.

अशा रीतीने माझा वारकरी संप्रदाय सुरू झाला. पंढरपूरचे वारकरी खांद्यावर पताका घेऊन श्रीपांडुरंगाचे पुजारी होतात. मी माझा मुगटा खाकोटीस मारून पोटोबाजा पूजक झालो होतो. एक देवाचा वारकरी, एक देहाचा वारकरी! एका अक्षराचा फरक, परंतु केवढा जमीन-अस्मानाचा फरक! श्याम पोटोबाची उपासना करण्यात दंग होता. ज्या दिवशी पोटोबाची पूजा करता येत नसे, त्या दिवशी मात्र दिवसा तो रामाचा मुखचंद्र पाही व रात्री आकाशातली दिवाळी बघे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel