''कालवण काय आहे?'' तिने विचारले

''तेल-मिठाशी खाईन,'' मी म्हटले.

''द्रुपदीच्या आईकडचं वरण देऊ आणून?'' तिने विचारले

''हं,'' मी म्हटले
म्हातारी गेली. द्रुपदीच्या आईकडून तिने वरण आणले.
''घे खा ह्याच्याशी. नीट जेव,'' म्हातारी म्हणाली.

मी जेवून शाळेत गेलो. शाळेत यायला थोडा उशीर झाला होता; परंतु उशीर झाल्याचे मला वाईट वाटले नाही. मला खूप आनंद झाला होता. मला काहीतरी नवीन मिळाले होते. मला दोन भाक-याच नाही मिळाल्या, तर त्या भाक-या भाजणा-या आजीबाईचे वात्सल्यप्रेम मला मिळाले होते. आईपासून दूर असलेल्या मला प्रेम मिळाले होते.

द्रुपदीच्या आई म्हणजे माझ्या घराची मालकीण, ती एक गतधवा. पोक्त पावन, कष्टाळू माउली होती. तिचा सर्वात वडील मुलगा लष्करात होता. तो वानवडीस पलटणीत होता. तिच्या त्या मुलाची पत्रे येत, ती मीच वाचून दाखवीत असे. घरी दोन-तीन मुले होती. घरात गाय होती. द्रुपदीची आई मुलांस भाकरी वगैरे देऊन, मग कामाला जात असे. त्या दु्रपदीच्या आईकडे ती म्हातारी आजी व तिचा तो म्हतारा नवरा, दोघे पाहुणी म्हणून आली होती. म्हातारी रोज तेथे माझ्या खोलीच्या दाराबाहेर बसत असे; परंतु मी कधी बोलत नसे. हायस्कूलातला मी विद्यार्थी. त्या गावंढळ म्हाता-या मराठणीजवळ कसा बोलणार?

परंतु माझे दु:ख पाहून, ती म्हातारी विरघळली. माझी फजिती तिला पाहवली नाही. ती परकेपणा विसरली. तिने मला भाक-या भाजून दिल्या. मला कालवण आणून दिले. मी ब्राह्मण व ती ब्राह्मणेतर; परंतु ते सारे मी विसरलो व ती म्हातारीही विसरली. आम्ही मानवाच्या समुद्रात डुंबत होतो. मी मनुष्य होतो. म्हातारी मनुष्य होती. माणुसकीच्या धर्माचे आम्ही उपासक होतो. 'आणू का कालवण?'' किती सहज निघाले शब्द! मी खाईन की नाही, वगैरे शंकाही त्या माउलीच्या चित्तास शिवली नाही. ती का चर्चेची वेळ होती? सहानुभूतीच्या सिंधूत सारे भेद बुडून गेले होते.

मी वर्गात बसलो होतो; परंतु माझे लक्ष तेथे नव्हते. मधली सुट्टी होताच खोलीवर जाण्यासाठी माझे ह्दय अधीर झाले होते. आजीजवळ जाऊ, दोन शब्द बोलू, असे मी मनात म्हणत होतो.
दोन तास झाल्यावर छोटी सुट्टी असे.

''काय श्याम, स्वयंपाकाचा प्रयोग कसा काय झाला?'' गोविंदाने विचारले.

''फारच उत्कृष्ट,'' मी म्हटले.

''भाकरी जमली का?'' त्याने विचारले.

''देवाने जमवली,'' मी म्हटले
''म्हणजे?'' त्याने जिज्ञासेने विचारले.

''शेजारच्या आजीने माझी फजिती पाहून दिली भाजून,'' मी म्हटले.

''तुला सारं चालतं, तुझं आपलं बरं आहे. तू आहेस अवलिया,'' गोविंदा म्हणाला.

''गोविंदा, ब्राह्मण-अब्राह्मण माझ्या मनातही नसतं. मनात आलं., तर ना त्याची विचारणा? परंतु हे भेद माझ्या जीवनातच नाहीत,'' मी म्हटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel