पुणे : आले..... गेले

त्या दूरच्या गावीही मला मातृप्रेमाचा मधूर व पवित्र अनुभव देऊन ती आजीबाई निघून गेली. ती गेल्यानंतर मी पाच-सहा वेळा तुकाराम कडून  पीठ आणले. परंतु प्रत्येक वेळेस माझे मन मला खाई. मला मिंधेपणा वाटे. मला अपमान वाटे. हळूहळू तो प्रकार मी बंद केला. पूर्वीप्रमाणेच कसा तरी राहू लागलो. आता तुकारामची व माझी वरचेवर गाठ पडत नसे.

मी पीठ नेतनासा झाल्यावर एके दिवशी तुकाराम माझ्याकडे आला व म्हणाला,'' श्याम अलीकडे तू का येत नाहीस?''
'' तुकाराम, मला ते मरण वाटतं. मिंधेपण म्हणजे मरण नाही तर काय, ते पीठ मी घेतो खरा; परंतु माझ्या स्वाभिमानाचं पीठ होत होतं. नको, तुकाराम, अत:पर ते जगणं नको. तू रागावू नकोस. तुझा-माझा लोभ आहेच. मी एखादे वेळी तुझ्या चक्कीकडे येईन, प्रेमाने तुझ्या कडे पाहिन. अंगा-तोंडावर पीठ उडून, भ्स्म फासलेल्या शंकराप्रमाणे दिसणारी तुझी मूर्ती पाहीन, तुझा हात हातात घेईन व निमूटपणे निघून येईन हो. असा खिन्न नको होऊ,'' मी म्हटले.

'' तुमच्या मनाला इतके क्लेश होत असतील, तर मी कसा आग्रह करु? परंतु, श्याम, मधून मधून येत जा. ह्या औंधात कुणी तरी माझं आहे, असं मला वाटून दे. श्याम, अन्न नसल्यामुळे तुम्ही उपाशी राहाता आणि ह्या औंधला प्रेम मिळत नसल्यामुळे मी उपाशी आहे. तुमच्या शरीराची उपासमार होत आहे. आणि आज तीन वर्षं माझ्या मनाची उपासमार होत आहे, श्याम, भेट बरं का. तुला मी मध्येच 'तुम्ही' म्हणतो, मध्येच 'तू' म्हणतो. खरं सांगू तुला 'तू' म्हणावं असंच वा
टतं,'' तुकाराम माझ्याकडे पाहून म्हणाला.

''होय तुकाराम. 'तू' शब्द अधिक प्रेमाचा आहे. 'तुम्ही' शब्द लांबलचक आहे व प्रेमही त्याच्यापासून लांब जातं. मी तुला भेटायला येत जाईन. प्रेम व सहानुभूती  न मिहाली तर जिवाची कशी तगमग होत, ते मी जाणू शकतो. जा आता तू. तुला उशीर होईल,'' मी म्हटले.

तुकाराम गेला. मी शाळेत गेलो. माझी स्थिती वर्गातल्या पुष्कळ मुलांना माहीत होती. एखादे वेळेस रुमालात बांधून कोणी भाकरी घेऊन येई, तर एखादे वेळेस दुसरे काही कोणी आणून देई.

''श्याम, आज शाळा सुटल्यावर आमच्याकडे ये बरं का,'' काळे नावाचा विद्यार्थी म्हणाला.
'' काय काम आहे?'' मी विचारले.

'' आता नाही सांगत. मग सारी मजा जाईल.'' तो म्हणाला. शाळा सुटली व मी काळेबरोबरच त्याच्या खोलीवर गेलो. दुसरीही काही मुले तेथे आली. काळेच्या घरुन फराळाचा उबा आला होता. खादी कार्यक्रम होता! कागद वगैरे पसरण्यात आले. वाटली डाळ, चकल्या, कडबोळी, लाडू वगैरे पुष्कळ पदार्थ होते.

'' करा आरंभ,'' काळे म्हणाला.
'' श्याम, घेना,'' मोदी म्हणला.
'' श्याम, हा लाडू घे,'' दुसरा एक म्हणाला.
'' लाडू नको. श्याम फार गोड आहे. त्याने थोडं तिखट झालं पाहिजे, ही चटणी खा रे श्याम,'' एक मित्र प्रेमाने म्हणाला.
'' श्याम, तू उपाशीच असशील?'' काळेने प्रश्न केला.
'' नाही काही,'' मी म्हटले.
'' मग आज कोणता होता बेत?''
'' आज मक्याचे दाणे तब्यावर परतले व पोटभर खाल्ले.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel