परंतु मी निघून गेलो. टोपी घालून बाहेर गेलो. बाहेर तरी कोठे जाणार? दुपारच्या वेळी कोठे जाणार? मी समुद्रावर जायला निघालो. लोक संध्याकाळी फिरायला जातात. मी  दुपारच्या वेळी फिरायला निघालो. ज्या वेळेस डोके तापले असेल, त्या वेळेस फिरायला जावे. मी चौपाटीवर गेलो. तेथे गर्दी नव्हती, समुद्राला भरती होती. समुद्राच्या पाण्यात मी उभा होतो. माझे पाय तो अनंत सिंधू धूत होता. त्या समुद्रर्दानाने माझा अनंत हृदयसिंधूही हेलावला. माझ्या हृदयातल्या लाटा खालच्या लाटांत मिसळल्या. अंत:समुद्र व बहि:समुद्र हयांचा महान संगम तेथे निर्माण झाला होता. त्यात माझे स्नान होत होते. ऊन होते, तरी गार वारा होता. त्यामुळे तेथे उन्हाचा त्रास मला होत नव्हता. काही वेळाने मी माघारा वळलो. मनात काही तरी निश्चित करुन मी माघारा वळलो. मी घरी आलो. मी रामला पुढीलप्रमाणे पत्र लिहिले.

प्रिय राम ह्यास सप्रेम प्रणाम.

तुझा अक्षर तिळगूळ मिळाला. तो भरपूर खात आहे. राम, पुण्याला येऊन मी तुझ्याकडे राहू का? सध्या औंधला प्लेग आहे. मी तुमच्या शाळेत जाईन. जमलं तर कायमचा पुण्यातच राहीन. रामजवळ श्याम पुन्हा येईल. मागे मी पुण्याला आलो होतो, त्या वेळेस तुम्ही सर्वानी 'ये म्हणून सांगितले होते; परंतु त्या वेळेस योग आला नाही. मला ताबडतोब उत्तर लिही.

मला तुझ्याकडे फक्त राहायला हवं. जेवायची मी माझी काही तरी व्यवस्था करीन. त्याची काळजी नको. डोकं टेकायला कुठे तरी जागा हवी ना? ती तुळशीबागेतल्या राममंदिरात मिळत नसते. त्या राममंदिराचा सात वर्षापूर्वी मी अनुभव घेऊन चुकलो. आता जिवंत राम-मंदिरात प्रवेश मिळतो का पाहायचं. राम, तुझ्या सर्व भावडांचे मत असेल, तरच मी येईन. तुझ्या मनाचा कोंडमारा तू करुन घेऊ नकोस. तुझ्या एकटयाच्या इच्छेला तो प्रश्न नाही.

राम, श्यामला सर्व प्रकारच्या कामाची आता सवय आहे. तुमच्याकडे मी राहिलो तर जड होणार नाही. चार धंदे माझे हात करतील. मी सर्वाना हवाहवासा होईन. तुला पश्चाताप करण्याची पाळी मी येऊ देणार नाही. सध्या मी चमत्करिक मन:स्थितीत आहे. आताच मी समुद्रावरुन आलो. भर दुपारी समुद्रावर एकटाच गेलो होतो. तो निळा निळा समुद्र मला पाहून उचंबळला. समुद्राला भरती होती, माझ्या जीवनालाही भरती आली. भरलेल्या जीवनाने मी घरी परत येऊन तुला हे पत्र लिहित आहे. जास्त काय लिहू? आईस अनंत प्रणाम, भावंडास सप्रेम नमस्कार.

तुझा
श्याम

रामचे ताबतोब उत्तर आले.

प्रिय श्याम,

नि:शंकपणे निघून ये. पुढे ठरवू.
राम
रामचे पत्र म्हटले, म्हणजे तार असायची. त्यात वाचाळता नसायची. श्यामची पत्रे म्हणजे निबंध ! रामची पत्रे म्हणजे सूत्रे! ते पत्र दादाच्या हातात पडले.
''श्याम, अरे एका ओळीचं पत्र बघु, तुला आलं आहे!'' दादा म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel