साधारण साडेदहा वाजले, म्हणजे आम्ही दिवा मालवून निजत असू. दिवा मालवल्यावरही अंथरुणावर पडल्या पडल्या आम्ही बोलत असू. परंतु बोलता बोलत गोविंदा एकदम घोरु लागे. काही वेळाने इंगळेही घोरु लागे. मग मी एकाटाच जागा असे. मी दार उघडून गॅलरीत येऊन बसत असे. आकाशाची शोभा पाहात असे.

एके दिवशी रात्री असा बराच वेळ मी बसला होतो. मला तहान लागली. आमच्या खोलीत पाणी नव्हते. काळेमास्तरांना तरी रात्री कसे उठवायचे? तळयावर जाऊन पाणी पिऊन यावे, असे मी ठरवले. हो, तळयावरच जावे. रात्रीच्या वेळी तळे कसे शांत दिसत असेल!

आकाशातल्या अनंत ता-यांचे प्रतिबिंब कसे स्वच्छ पडले असेल! मी उठलो, रात्रीचे बारा तरी बाजून गेले असतील. मंद मंद पावले टाकीत मी तळयावर गेला. तळयाच्या घाटावरुन खाली उतरलो. मी पोटभर पाणी प्यालो. तेथून जावे, असे मला वाटेना. एके दिवशी तो तलाव मला बुडवत होता, पण त्याने मला बुडवले नाही. त्याचे मी आभार मानले.  ''बा तलावा, माझी आई तुला किती धन्यवाद देईल!'' असे मी हात जोडून म्हटले. इतक्यात रस्त्यावर मला गस्त ऐकू आली. मी घाबरलो. पोलिसाने मला पाहिले तर! तलावाच्या काठी रात्री बारा वाजता! आत्महत्येचा आरोप तर नाही ना ठेवणार माझ्यावर? आपण दिसू नये, म्हणून त्या थंडगार पायरीवर मी निजलो.

दहा-पंधरा मिनिटे अशी गेली. मी हलकेच उठलो. शाळेमध्ये परत येऊ लागलो. मला वाटेत कोणी भेटले नाही. शाळेत आलो तो खोलीचे दार लावलेले। कोणतरी लधवीला उठले असावे व उघडे राहिलेले दार लावले असावे! आता हाका माराव्या लागणर ! मी हाक मारली नाही उगीच कशाला उठवा? मी बाहेरच राहिलो. आकाशातील ता-यांच्या संगतीत राहिलो. त्या रात्री मला झोप आलीच नाही. मी रामनामाचा जप करीत, गॅलरीत फे-या मारित राहीलो.

पहाट झाली. गोविंदा जागा झाला. त्याने दार उघडले. मी दुस-या बाजूला जाऊन उभा राहिलो. गोविंदा खाली गेला. मी पटकन खोलीत शिरुन आपल्या अंथरुणावर पडलो. गोविंदा वर आला. '' काय इंगळे, उठणार ना? श्याम, उठायचं नाही का ?'' तो विचारु लागला. '' आज फार थंडी आहे. झोपू या जरा,'' मी म्हटले. '' माझीआहे मॅट्रिकची परीक्षा, तुमचं काय,'' असे म्हणत इंगळे उठला. त्याने दिवा लावला. गोविंदाही उठला. मी मात्र उठलो नाही.

'' श्याम, ऊठ रे. नाहीतर आम्हांलाही निजावसं वाटेल. ऊठ ऊठ,'' गोविंद म्हणाला. ''शाळा माऊलीच्या मांडीवर मला निजू दे आणखी थोडा वेळ. आज मला निजावसं वाटतंय. तुझंही पांघरुण घा माझ्या अंगावर,'' मी म्हटले.

''निजू दे रे त्याला. माझंही पांघरुण घाल,'' इंगळे म्हणाला. माझ्या अंगावर सर्वांची पांघरुणे घाल,'' इंगळे म्हणाला. माझ्या अंगावर सर्वांची पांघरुणे पडली, त्यामुळे शेवटी निजून राहाण्याऐवजी मी उठलो, पण माझे डोळे पेंगत होते. ''श्याम, नीज तू. तुला बरं वाटत नाही आज बहुत करुन,'' गोविंदा म्हणाला. त्या सहानुभूतीच्या शब्दांनी मला निजायची पुन्हा स्फूर्ती आली आणि मी निजलो, तो चांगले दिसायला लागले, तेव्हाच उठलो.

असा आमचा हा शाळागृहाचा आश्रम मोठया सुंदर रीतीने चालला होता. अभ्यासही चांगला होई. झोपही चांगली लागे. त्यामुळे मनही प्रसन्न राही, पण अकस्मात हा आश्रम बंद होणार होता. कायमचाच बंद होणार होता!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel