''खरं आहे तुमचं म्हणणं, माझा गणित विषय कच्चाच आहे. मी त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. सर्व विषय सारखे हवेत. आता मला पश्चाताप करावा लागेल,'' मी म्हटले. '' तो पलीकडे मुलगा आहे ना, तो अष्टावधानी आहे. त्याने मागे तसे प्रयोग केले होते. हेडमास्तरांचं त्याच्यावर प्रेम आहे; खरोखरच हुषार आहे तो. त्याला मामा म्हणतात. आणि ते पलीकडे आहेत ना, त्याचं नाव काळे. त्याचंही गणित चागलं आहे. ही सारी मुलं मराठी सात इयत्ता होऊन हायस्कूलात आलेली आहेत. स्वभाविकच त्यांचचं गणित चांगलं असत,'' तो म्हणाला.

''अजून शिक्षक कसे येत नाहीत?'' मी म्हटले.

इतक्यात कसली तरी नोटीस आली. शाळेला लवकरच सुट्टी मिळाली. वर्गनायकाने नोटीस वाचली. मुलांना खूप आनंद झाला. झोपलेली मोठी मोठी मुले जांभया देत उठली. सखाराम व मी घरी आलो.

''सखाराम, येतोस ना खोली पाहायला?'' मी अधीर होऊन म्हटले.
''चल,'' तो म्हणाला.

आम्ही दोघे खोली पाहायला गेलो. जवळ जवळ गावाचे ते टोकच होते; परंतु शाळेपासून जवळ होती जागा. तुरुंगाच्या पलीकडे खोली होती. समोर मशीद होती. मी खोली पाहिली. एका मराठा बाईची ती खोली होती. खोलीत अंधार होता; परंतु मी पसंत केली. मला एकटे राहायला पाहिजे होते. एकटे असले, म्हणजे कोणाची भीड नाही. माझे अश्रू, माझे सुकलेले तोंड  माझे खाणे वा न खाणे, कोणी पाहायला येत नाही. चारचौघात असले, म्हणजे मनसोक्त रडण्याचीही चोरी. आणि रडणे हे तर माझ्या जीवनतरुचे आवश्यक खत! मला पोटभर रडायला मिळेना, म्हणून मी सूकून जात होते.

''सखाराम, मी इथे राहायला येतो,'' मी म्हटले.

''त्या पलीकडच्या खोलीत मी येतो,'' सखाराम म्हणाला.

''सखा जवळ असला, म्हणजे बरं,'' मी प्रेमाने म्हटले.

''इथे आजूबाजूला आपल्या वर्गातली पुष्कळ मुलं राहतात,'' सखाराम म्हणााला.

''मग तर छानच. तुरुंगातले टोले ऐकायला मिळतील. घडयाळाची जरुर नाही,''
मी म्हटले.

''चोराची भीती नाही,'' सखाराम म्हणाला.
इतक्यात आमच्या वर्गातील आजूबाजूला राहणारी मुले तेथे आली.

''काय मुजावर!'' सखारामने हाक मारली.

''इथे राहायला येणार का?'' त्याने विचारले.

''हो,'' तो म्हणाला.

''तुम्ही कुठे राहता?'' मी विचारले.

''ह्या समोरच्या मशिदीत,'' मुजावर म्हणाला.

''तुम्हांला राहू दिलं?'' मी विचारले

''हो. मी व दुसरा एक मुसलमान विद्यार्थी तिथे राहतो,'' मो म्हणाला.

''तुम्ही भाग्यवान आहात. देवाजवळ तुम्ही आहात,'' मी म्हटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel