''थट्टा रे काय करतोस?'' मी केविलवाणा होऊन म्हटले.
''श्याम थट्टा नाही, मी गंभीरपणेच सारं सांगत आहे. पुण्यात नारायण पेठेत सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्या घरी बरीच मुलं आहेत. त्या मुलांना संस्कृत, मराठी शिकवायला एक प्रौढ विद्यार्थी पाहिजे होता. तू तिथे पत्र पाठवून विचारलंस तर? खडा मारुन पाहावा. जमलं तर देव पायल, नाही तर इथे आहेच मक्याची उसळ नि गोवारीची भाजी,'' सखाराम म्हणाला.
''तुला त्यांची काय माहिती?'' मी विचारले
''अशीच मागे मिळाली होती,'' तो म्हणाला.
''ते गृहस्थ उदार आहेत का?'' मी हलकेच प्रश्न केला.
''ते मला माहीत नाही. परंतु ते फार धार्मिक आहेत,'' सखाराम म्हणाला.
''फार धार्मिक असणा-या मनुष्याची मला भीती वाटते. साधारणपणे कर्मठ माणसं अनुदार असतात. गंध, भस्म, टिळे, माळा हृदयाला मारतात,'' मी म्हटले.
''अनुभव घेऊन बघ,'' सखारामने सुचवले.
''अरे, माझे हे वाढलेले केस पाहूनचे ते संतापतील. जुन्या मंडळींना गोटा पाहिजे,'' मी म्हटले.
''हे बघ, इथे बसून तर्क करण्यात काही अर्थ नाही,'' सखाराम म्हणाला.
''बरं तर, मी विचार करतो,'' मी म्हटले.
सखाराम निघून गेला. माझे वाचून संपले. विचारांची तंद्री सुरु झाली. माझे मन व्यग्र झाले. मनात आशा-निराशांचा नाच सुरु झाला. खरोखर अशी व्यवस्था लागली, तर किती छान होईल? कोणाचा मन मिंधेपणा नाही. मुलानां मी कितीतरी गोष्टी सांगेन. कितीतरी स्तोत्रे शिकवीन. मी त्यांच्याकडे इतरही काम करीन. स्वाभिमानाने, श्रमाने जगेन. लिहू का पत्र? नारायण पेठ! माझे मामा त्याच पेठेत आहेत. पळून जाणारा श्याम कष्टाने विद्या मिळवीत आहे, हे पाहून, त्यांना आनंद होईल.पुण्याजवळच हिंगण्यास मावशी व धाकटा भाऊ, त्यांना वरचेवर भेटायला मिळेल.
आणि राम! पुण्यालाच माझा राम होता. पुन्हा आम्ही एका शाळेत एकत्र असू, हसू, खेळू आणि तो तुळशीबागेतला नयनभिराम राम! त्याचंही मी रोज दर्शन घेईन. पाठवू का पत्र? येईल का होकार? कवितामय पत्र? पाठवलं तर? आणि संस्कृतच श्लोक करुन पाठवले तर?
शेवटी माझा निश्चय झाला. कागद-पेन्स्लि मी घेतली. मी संस्कृत श्लोक रचू लागलो पुष्कळ प्रयत्नांनी मी पुढील श्लोक रचले.
भवत्पदाब्जं शिरसा प्रणम्य
विनम्रवृत्या खलु प्रार्थयेऽहम्।
अकिंचनोऽहं सुभृशं सुदीन:
परंतु विद्यार्जनकामकामी ॥१॥
उदार किंचित् क्रियतां मदर्थ
भवत्कुमारान् वितरामि विद्याम! ।
कुटुंबसेवामितरां करिष्ये
भवान् यदाज्ञापयति प्रसंगे ॥२॥
समुन्नतं तद् भवदन्तरंगं
ममोपरि प्रेमदयां करोतु ।
भवन्निवासे निवसन् करिष्ये
नियुत्तकसेवां च लभेय विद्याम् ॥३॥