त्याने आपल्या आईला मारून तिचे काळीज कापून घेतले. ते हातांत घेऊन तो मोठया धावपळीने जात होता. त्याला गर्दीत ठेच लागली. तो पडला. हातातले ते काळीजही पडले. त्या पडलेल्या काळजातून त्याला शब्द ऐकू आले.

''बाळ, लागलं नाही ना रे तुला कुठे?''

मातृप्रेमाची धोरवी ह्याहून अधिक सुंदर रीतीने क्वचित कोठे वर्णिलेली असेल! मुलगा कसाही असो, त्याचे सदैव हितमंगल चिंतणे, हेच एक तिला ठाऊक, मातेला मुलाशिवाय अन्य दैवत नाही. त्याच्या सेवेशिवाय अन्य धर्म नाही. आईच्या हृदयातील वात्सल्यसिंधूत बुचकळून बाहेर पडणारा 'बाळ' हा शब्द ज्याने ऐकला नाही, मातेचा अमृतमय हात ज्याच्या पाठीवरून कधी फिरला नाही, मातेजवळचा खाऊ ज्याने कधी घेतला नाही, मातेच्या हातचा घास ज्याने कधी खाल्ला नाही, मातेची प्रेमस्निग्ध दृष्टी ज्याच्यावर कधी पडली नाही, मातेच्या हातचे पांघरूण ज्याच्या अंगावर कधी पडले नाही, मातेच्या मांडीवर जो कधी घोळला नाही, मातेच्या चरणांवर जो कधी लोळला नाही आणि सर्वांत गोड असा मातेच्या हातचा मार ज्याला कधी मिळाला नाही, तो अभागी होय!

आई मुलाला जे अंगाई-गीत गाते, त्याला पाळण्यात हलवताना, मांडीवर निजवताना, कुशीत थोपटताना, खांद्याशी धरून फिरवताना, ज्या गोड गोड ओव्या म्हणते, त्यात सारा सामवेद असतो, सारा गांधर्ववेद असतो. मुलासाठी जी शेकडो औषधे आई जमा करून ठेवते. तिची ती बाळकडवांच्या सामानाची सांकशी, त्यात सारा आयुर्वेद सामावलेला असतो. आई मुलाला ज्या कधी काऊचिऊच्या गोष्टी सांगते, राज-राणीच्या गोष्टी सांगते, आवडती-नावडतीच्या गोष्टी सांगते, त्यात सारे बालवाड्:मय असते. आई मुलाला कधी काळी कळकळीने उपदेशाचे जे चार शब्द सांगते, त्यात सारी उपनिषदे असतात. ती त्याला फुले दाखवते, फुलपाखरू दाखवते, गाई-गुरे दाखवते, कावळे-चिमण्या दाखवते, झाडेमाडे दाखवते, चांदोबा दाखवते, त्यात सारे सृष्टिशास्त्र येते. आईच्या सभोवती सारी शास्त्रे व सा-या विद्या जणू येऊन उभ्या राहातात. आईच्या वात्सल्यातून सा-या कला निघाल्या, सा-या विद्या निघाल्या, सारी शास्त्रे निघाली. आई म्हणजे बोधजननी, वेदजननी. आई म्हणजे ॐ!

अशा ह्या आईचे स्मरण कोणाला होत नाही? विशेष:त आजारात, संकटात, आपत्तीत मनुष्य कोणाची उत्कंठेने वाट बघतो, कोणाचा धावा करतो, कोणाला हाक मारतो? देवाला? नाही, आईला. आईचे बघणे, आईचे बोलणे, आईचे कुरवाळणे त्याला आवडते. तो आदर्श आरोग्यधामात असेल, पलंगावर पहुडलेला असेल, मऊमऊ गाद्यांवर निजला असेल, अशा डोक्याखाली असतील, फुलांचे गुच्छ तेथे ठेवलेले असतील, मोठमोठे डॉक्टर सभोवती असतील, मोठमोठया दाया सेवा करीत असतील, तेथे पाहिजे ते फळ असेल, पाहिजे ते पेय असेल, तेथे सारे काही असेल; परंतु तो आजारी मनुष्य त्या सर्व संभारात एका वस्तूचे स्मरण करीत असतो. त्याचे डोळे काहीतरी शोधीत असतात, त्याचे हात काहीतरी पाहात असतात. त्या सर्व सभोवतालच्या सृष्टीत आई नसते. ते सारे त्याला निस्सार वाटते. आई असेल, तर सारे आहे. आई नसेल, तर सारे असून नसल्यासारखे. डॉक्टरांच्या शेकडो सुया जे करू शकणार  नाहीत, ते मातेचा एक प्रेमळ दृष्टीक्षेप, एक प्रेमळ शब्द करू शकतो. कॉडलिव्हरच्या बाटल्या पिऊन-पिऊन जी पुष्टी येणार नाही, ती आईने पाठीवरून हात फिरवल्याने लाभेल. आई म्हणजे आरोग्य, आई म्हणजे पुष्टी, तुष्टी, हृष्टी, आई म्हणजे 'शांति: शांति: शांति:।'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel