वाटिकेंतल्या सुमांचा तुझ्या
धाष्टर्याने मी केला संचय
ह्रत्तंतुंनी गुंफिली फुलें
आणि शिंपिलें भक्तीचें पय
राष्ट्रासाठी राहिलास तूं
मृत्यूच्याही दारीं निर्भय
म्हणुनी गातों जीवनगाथा
जय मृत्युंजय जय मृत्युंजय
१. तो वीर विनायक अमर
जाळूनी जन्मभर कणकण निज देहाचा ।
ठेविला तेवता दीप स्वातंत्र्याचा ॥
तो वीर विनायक अमर, ऐकलें आम्हीं ।
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥धृ०॥
निष्ठेने आपण मागे त्याच्या जातां ।
देशाचें मंगल गाणें गातां गातां ।
बंधनातं संगति बंद घराच्या होतां ।
तो कसा जाहला अग्रणि या देशाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥१॥
परिसले, विनायक परदेशाला गेला ।
मित्रांचा संचय तेथे त्याने केला ।
भरभरुनि पाजला देशभक्तिचा पेला ।
अन् आपण प्याला घोत सुखें दु:खाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥२॥
उड्डाण सागरीं म्हणती अद्भभुत राही ।
सांगती, मृत्युने दार खोलले नाही ।
रिपु मात्र करी त्या पाशबद्व लवलाही ।
परवशतेने त्या होत दाह अंगाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥३॥
जयजयकारा तो स्वातंत्र्याच्या बोले ।
स्वातंत्र्यशिबिर जै अंदमानचे केले ।
वाग्स्पर्शे ज्याच्या पतितहि पावन झाले ।
तो शब्द कसा हो असे पुण्य वीराचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥४॥
म्हणतात, शारदा जिव्हाग्रावर होती ।
आलाप उमटता करती अंकित भिंती ।
रुणभेरी झाल्या त्या कवनांच्या पंक्ती ।
केव्हा फुटली त्या भित्तिपटांना वाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥५॥
ध्वज एक हिंदुला, राष्ट्र एकची त्याला ।
हा मंत्र, सांगती, दिधला तें आम्हाला ।
झटला तो करण्या बलशाली देशाला ।
तो विशद करा हो मंत्र अम्हां धैर्याचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥६॥
भारतासि म्हणती नव्हता कोणी वैरी ।
परि धजला होता समराला शेजारी ।
मग झाली जागी निद्रित जनता सारी ।
अंगिकार केला सावरकर-शब्दाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हाला त्याचा ॥७॥
सांगती सैन्य जैं लाहोरावरि गेले ।
वीरास वाटले, तनुचे सार्थक झाले ।
मृत्युला तयाने मग पाचारण केले ।
घातला तयाच्या मुखी घास देहाचा ॥
इतिहास कथा ना, तात, अम्हांला त्याचा ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel