*
जें सुख क्षीरसागरीं ऎकिजे । तें या वैष्णवामंदिरीं देखिजे ॥१॥
धन्य धन्य तें वैष्णवमंदिर । जेथें नामघोष होय निरंतर ॥२॥
दिंडी पताका द्वारी तुळसीवृंदावनें । मन निवताहे नामसंकीर्तनें ॥३॥
ज्याच्या दरुशनें पाप ताप जाये । भानुदास तयासी गीत गाये ॥४॥
*
ब्रह्मीं स्फ़ुरें जें स्फ़ुरण शुद्ध सत्वांचे लक्षण । तो तुं लक्ष्यातीत परिपूर्ण रे ॥१॥
कान्हू सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तूं निजानंदु रे ॥२॥
जेथें नाहीं गुणागुण नाहीं कार्यासी कारण । तो तूं गुणी गुणातीत परिपूर्ण रे ॥३॥
एका एकी जनार्दन भेद भाष्य वचन । तो तूं शब्दासी गिळून राहिलासी रे ॥४॥
*
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी॥१॥
शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
वेदशास्त्र देती ग्वाही । म्हाणती ज्ञानबाई आई ॥३॥
ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
*
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकी मात जयाची ॥१॥
केला भगवदगीते अर्थ। ऎसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवाते उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनी समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
*
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्‍वरी । कृपा करी हरि तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्‍नु अर्जुनेसी ॥२॥
तेचि ज्ञानेश्‍वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्‍वरी ॥४॥
*
गीता गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥
नित्य नेम वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥
एका जनार्दनीं जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥
*
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥
प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥
रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
*
अगाध तुझी लीला आकळे कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरुनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥
तुज कैसे भजावें आपणा काय देखावें । तुजमाजीं राहुनि तुजला कैसें सेवावें ॥२॥
अगा देव तूं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावें केंवी ॥३॥
एका जनार्दनीं सबाह्याभ्यंतरी नांदे । मिथ्या स्वप्नजात जेंवि जाय ते बोधे ॥४॥
*
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥
गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥
सद्‍बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सद्‍गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केश‍व नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहीण धावूनि आली गांवा। आतां संध्या कैसी मी करूं केव्हां ॥३॥
सहज कर्में झालीं तीं ब्रह्मार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । ऎसें ऎकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥
*
सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावीं । सज्जन वृंदे मनोभावें आधीं वंदावीं ॥१॥
संतसंगे अंतरंगें नाम बोलवें । कीर्तनरंगी देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतर न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥
जेंणें करुनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची । ऎसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचीं ॥४॥
अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करटाळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel