एक बंदी चरण वंदे, भेटुनी देत आलिंगनाला ।
आपणाला, तो म्हणाला, "अर्पितो चंपक-श्वेत माला" ।
सावरकर-
कशास तरुणा साहस केले घालुनि ही माला ।
आग भयानक वेढुनि राही माझ्या नावाला ।
जीभ पोळते उच्चाराने ! ज्वाला अंगाला ।
भस्म होत घरदार तयाचे जवळी जो आला ।
दंडधारी, दंडितारी, कृत्य सांगेल हे बंदिपाला ।
एक बंदी चरण वंदी भेटुनी देत आलिंगनाला ॥१॥
बंदी दादू-
बाबूजी ! विधिपंडित आपण ! मी तर मंदमती ।
जीभ अवघडे द्याया उत्तर विद्वानापुढती ।
घेते गोमय कण मातीचे पडता भुवरती ।
थोडे कळते मला सुजन का देशास्तव मरती ।
बध्द माता, गीत गीतां ऐकूनी दु:ख वाटे मनाला ।
एक बंदी चरण वंदी भेटुनी देत आलिंगनाला ॥२॥
देवासाठी निजयज्ञाचा मान मिळे कमला ।
आपणांत कमलाचे दिसले मानवरुप मला ।
पद्मा त्या पूजाया चंपक योग्य मला गमला ।
चाफा समजो मला माय जो चरणांवर पडला ।
गंध आला जीवनाला, भीत मी ना मुळी ताडनाला ।
एक बंदी, चरण वंदी भेटुनी देत आलिंगनाला ॥३॥
स्वातंत्र्याच्या मार्गस्थांच्या पायतळी पडणे ।
चुरगळणे, संपणे, तयाने वाटे धन्य जिणे ।
यथाशक्य देणे अन्नोदक, वारकरी भजणे ।
यातचि पंढरपुर आमचे, होई पुण्य दुणे
वाट चाला, समय झाला ! जा सुखाने प्रभो भारताला ।
एक बंदी चरण वंदी, भेटुनी देत आलिंगनाला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel