बंद्यांनी भरलें जलयान ।
अंदमानला निघे चलान् ॥धृ०॥
क्रोधी कोणी म्हणुनि विधीचा बंदी झाला ।
कुणी उपाशी कुणी अधाशी म्हणुनी आला ।
कोणी आला मुक्तिदेवता पूजायाला ।
सर्वासाठी एकचि यान् ।
अंदमानला निघे चलान् ॥१॥
भिडे येउनी दंडाबेडी हातकडीला ।
नेढया नेढ्यांतून ओवती लोहशृंखला ।
जोडी जोडी गुंफुनि केली मानवमाला ।
नमला नियतीला बलवान् ।
अंदमानला निघे चलान् ॥२॥
यान शक्तिने जलराशींना कापत होते ।
तोडत होते बंद्यांच्या प्रिय संबंधाते ।
भवितव्याशी गतकालाचे जोडत नाते ।
परतीरी नौकेचे ध्यान् ।
अंदमानला निघे चलान् ॥३॥
मुखामुखावर शून्य भाव फैलावत होता ।
वारा खारा फुफ्फुसात धोंगावत होता ।
सुस्कारा थरकत्या ह्रदांचा शोषत होता ।
जिवंतपणिचे जणू स्मशान् ।
अंदमानला निघे चलान् ॥४॥
आणि विनायक निरखत होता भविष्याला ।
पदरी उदरी दाबत होते वरुनि उराला ।
उत्सुक होता परी पाहण्या नवदेशाला ।
अवनीचे उघडें अपिधान् ।
अंदमानला निघे चलान् ॥५॥
(अपिधान= झाकण )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel