सांगती कौतुकें अंदमानच्या भिंती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥धृ०॥
बेटांत कुणीसा जगप्रवासी आला ।
भिंतीमधले तो स्थान शोधता झाला ।
आनंदाने त्या देती आतिथ्याला ।
त्या यात्रीसह त्या पर्यटनाला जाती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥१॥
राहिले जखडले अवयव लोखंडात ।
लेखनासि नव्हते साधन काही प्राप्त ।
ज्योती ह्रदयाची तेवत अंधारात ।
संवाद करी तो भिंतीशी एकांती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥२॥
मन पर्यटकाचे रुप घेत पक्ष्याचे ।
यंत्राविण रात्री यान बने कक्षाचे ।
तो घडवी त्यांना दर्शन अवकाशाचे ।
भिंती काळासह ताल धरोनी गाती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥३॥
वातायन होते मार्ग दाखवायाते ।
कालाचा कंटक यात्रा नोंदायाते ।
यानांग निरक्षर अलिखित कोरे होते ।
नोंदल्या प्रवासा भिंती गोंदुनि घेती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥४॥
बांधूनि शिदोरी वाक् प्रतिभेची पाठी ।
यात्री सरसावे सुर्यदर्शनासाठी ।
घेऊनि परतला सप्तर्षींच्या गाठी ।
पाहिल्या पेटत्या नक्षत्राच्या वाती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥५॥
दिसली त्या सुंदर ठायी ठायी राने ।
जगताचा नायक होता जात रथाने ।
विरहोच्छ्वासाच्या भरले यान धुराने ।
शोधू न सांपडे परी मृत्युची भीती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥६॥
गुरु गोविंदाला बंदा वैराग्याला ।
श्री शिवरायाला चितोडच्या राण्याला ।
पेशवे कुळाला त्यांच्या पराक्रमाला ।
वाटेत विखुरले कितीक माणिक मोती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥७॥
गोमांतक फुलले कमला घे जन्माला ।
आकांक्षा भिडली गरुडापरि गगनाला ।
प्रतिभा-मखराने सजली बंधनशाला ।
चमकते आजला यानाची त्या माती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥८॥
काजळ पर्वतसम सागरांत भिजवीले ।
बोरु कल्पतरु पत्र महीचे केले ।
नित लेखनकार्यी शारदेसि बसवीले ।
ना तरी श्रेष्ठता भिंत्तिपटला येती ।
अंगांत एकदा कविता खेळत होती ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जय मृत्युंजय


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत