क्षणाक्षणाला छळत भारता होती परवशता,
कठिण तो काळ असा होता ॥धृ०॥
सत्तावनला कुंड पेटले, धगधगत्या ज्याला,
चालुनि गेले सैन्य, घातला शत्रुवरी घाला ।
नेते होते तात्या टोपे, धुंडिराज नाना
झांशीची संग्रामदेवता संगर करताना- ।
अडला घोडा परदास्याला उल्लंघुनि जाता,
कठिण तो काळ असा होता ॥१॥
अत्याचारा वाव मिळाला अता इंग्रजांना,
माणुसकीचा अंश अल्पहे उरला ना त्यांना ।
तोफेवर बांधून मारती स्वदेशभक्तांना,
कितीक पडती बळी बंदुकी आग वर्षतांना ।
अंदमान दाटले, कितींच्या फास येत हाता,
कठिण तो काळ असा होता ॥२॥
उपशम झाला क्रांतीचा त्या, मात्र मनी होती-
स्वातंत्र्याची तीव्र भावना कोठे धगधगती ।
मधुनी कूका, वासुदेव, ती ज्वाला चेतविती,
इंग्रजांस आगीवर होती सदाचीच भीती ।
कुणास देती दंड, कुणाला पदव्यांचा भत्ता,
कठिण तो काळ असा होता ॥३॥
निराशेतुनी राष्ट्रसभेचा तदा जन्म झाला,
एकराष्ट्र-भावना मात्र ये तेव्हां उदयाला ।
महाराष्ट्र-केसरी क्षणी त्या क्षितिजावर आला,
आशा वाटे सह्याद्रीची भारतमातेला ।
स्वातंत्र्याचा दुष्कर त्याच्या करी वसा होता,
कठिण तो काळ असा होता ॥४॥
वातावरणे अशी राहिली धूमिल योगयुती,
जन्मुनि तेव्हां करित होता विनायक प्रगती ।
लिही तयाच्या कष्ट अपेष्टा भालावरि नियती,
अंगावरले घाव तयाचे जीवन भूषविती ।
वज्राचे आघात झेलण्या सिद्व सदा नेता,
कठिण तो काळ असा होता ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel