उद्यां १ ऑगस्ट हा लोकमान्यांच्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस. या दिवशीं सर्वत्र दारुबंदीच्या, अज्ञानबंदीच्या मिरवणुका काढा. हा सोन्याचा दिवस आहे. भारतमातेचें मुख एका सात्विक अभिमानानें उद्या तळपणार आहे. आईच्या मुखावरची सात्विक प्रभा पहाण्यापेक्षां सुपुत्राला दुसरा कोणता थोर आनंद ?

गांवोगांवच्या बंधुभगिनींनो, आपल्या गावीं दारुबंदीच्या मिरवणुका काढून ___ त्याला दंड ठरवा. या कामांत मागें राहूं नका. आपल्या गांवांतील दारु दूर करुन तेथें साक्षरता आणण्याचें ठरवा. घाण दूर करुन ज्ञानाचीं फुलें फुलवा. भारतीय बंधूंनो ? हें महान काम हांक मारीत आहे. जो न उठेल तो करंटा. जो उठेल तो खरा भाग्यवान !
-वर्ष २ अंक १७.

जीवनाकडे पाहण्याची दृष्टि २
(यवतमाळ येथें गणेशोत्सवांत दिलेले व्याख्यान)
जीवनाकडे कसें पाहावें हे समोरचे झाड मला शिकवितें. झाड वर आकाशाकडे बघतें. परंतु खालीं पायाजवळहि बघतें. मनुष्याच्या जीवनांत ध्येयवाद हवा व व्यवहारहि हवा. केवळ व्यवहार समाधान देणार नाहीं. भावनांचे सौन्दर्य, ध्येयवादाची उदात्तता जीवनांत ओतावी लागते. मानवी जीवनाकडे कसें पाहावें हें काँग्रेस दाखवीत आहे. आज प्रसिध्द झालेलें व. कमिटीचें स्टेटमेंट तुम्ही वाचलें असेल. काँग्रेस म्हणते, जगांतील सर्व राष्ट्रांना स्वातंत्र्य हवें. काँग्रेस दुसर्‍या राष्ट्रांना गुलाम करण्यासाठी स्वतंत्र होऊं इच्छित नाहीं. आज जगांत जी भीषण शांतता पसरली आहे त्याचें कारण काय ? त्याचें एकच कारण कीं मी थोर व्हावें, मी वैभवांत रहावें, आणि दुसर्‍यांनी माझे ताबेदार व्हावें असें आपणांस वाटतें. जर्मनीस वाटतें जर्मन लोकच जगांत श्रेष्ठ. त्यांनी जगात सत्ता गाजवावी. सारे गोरे म्हणत असतात कीं, जगावर सत्ता चालवण्यास आम्ही लायक. हा भ्रम, हा अहंकार दु:खाचें मूळ आहे. सेमिटिक मानववंश का नालायक आहेत ? चिनी लोकांनी का संस्कृतींत भर घातली नाहीं ? प्रत्येक मानववंश कोणत्या ना कोठल्या बाबतींत विकसित झालेला असतो. एकदां एक सुसंस्कृत गोरा संस्कृतीचें चिन्ह बंदुक खांद्यावर टाकून तिबेटांतील सुंदर पक्षांची शिकार करीत हिंडत होता. एक पांखराचा जोडा त्यानें बघितला. त्याने नेम धरला. असंस्कृत समजला जाणारा तिबेटी मनुष्य म्हणाला, ‘नका मारुं तें पांखरुं ही जात व्रती आहे. नर मेला तर मादी पुन्हां शादी करीत नाही. टाहो फोडून मरेल. मादी मेली तर नर तसाच व्रती राहतो. नका मारुं.’  तो सुधारलेला गोरा खदखदा हंसला व बंदुकीचा फट्फट् आवाज. प्रेमळ पांखरानें क्षणभर तडफड तडफड केलें. तो गोरा बंदुकीचा नेम मारण्यांत सुधारलेला होता. तिबेटी पांखरांच्या भावनांशी आत्मा जोडण्यास शिकला होता. तो त्यांत सुधारला होता. सुधारणेचा अर्थ मारण्याचीं अधिक सुंदर शस्त्रें कोणी शोधलीं हा नव्हे. जग सुधारलें असें तेव्हां म्हणूं कीं, ज्या वेळेस मानवी जीवनांत समता येईल. बंधुभाव येईल, उदारता येईल. एकमेकांनी मदत करुन पुढें आणणें, विकासाचा सोपान सर्वांनीं सहकार्यानें चढणें हा मानवी मार्ग आहे. हा माणसास शोभतो. परंतु हा अद्याप दूर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel