बाळ, काय ही दशा आणलीस ? आतां निश्चय करुन काय होणार ? पहिल्यानें रे तुझी कुठें अक्कल गेली होती ? आतां बैल गेला नि झोंपा केला, तशांतली गत. मगरानें गिळलेलें माणिक परत मिळत नाहीं. कर्जात बुडालेला मनुष्य मुक्त होत नाहीं, तसेंच व्यसनाधीन मनुष्यास सुटतां येत नाहीं.”

अशा प्रकारचे हिम्मत खचविणारे, नाउमेदीचे, भीतीचे, निराशेचे, चिंतेचे विचारच त्या दोघी बोलत. त्या नाउमेद करणार्‍या विचारांचा परिणाम त्या तरुणाच्या मनावर होऊं लागला. आपलें मन दृढ करण्याचा त्याचा प्रयत्न शिथिल होऊं लागला. कारण, तो स्वभावानें ताठर व कठोर नव्हता. दुसर्‍यांच्या विचारांचा त्याच्या कोमल मनावर हटकून परिणाम व्हावयाचा. त्या तरुणाचा पहिला आवेश ओसरला, अवसान गळलें, धीर गळाला. अखेर त्याचें मन इतकें दुर्बल झाले कीं, आपलें या व्यसनापुढें कांही एक चालावयाचें नाहीं व जिवांत जीव आहे तोपर्यंत आपण या अफूचे बंदे गुलामच होऊन राहणार असें त्यास वाटलें.

त्या दोघी बायांचें त्या तरुणावर प्रेम होतें. परंतु आईस व त्याच्या आजीस विचारांची शक्ति कळली नव्हती. आपल्याहि मनांत आशा बाळगून त्या तरुणाच्या निश्चयांकुरास पाणी घालण्याचें सोडून, त्यांनीं त्याचे हातपाय मोडले.

या गोष्टीच्या उलट उदाहरण मी पाहिलें आहे. मी माझ्या आतेच्या घरीं शिकावयास होतों. माझ्या आतेच्या यजमानांस गांजाचें व्यसन होतें. परन्तु त्यांच्या मनांत तें सोडावयाचें आलें. २५/३० वर्षांचें व्यसन आणि आतां वय म्हातारें झालेलें. चातुर्मास जवळ आला होता. या चातुर्मास्यांत हाच नेम कीं गांजा ओढावयाचा नाहीं असें त्यांनी ठरविलें. ते मला म्हणाले, “काय रे सोडतां येईल कीं नाही ?” मीं म्हटलें, “हो, येईल तर काय झालें.” माझ्या आतेनेंहि त्यांच्या निश्चयाला पाठिंबा दिला. तीं उभयतां करारी माणसें होतीं. शाबास त्यांची. चार महिन्यांत गांजाच्या चिलमीस ते शिवले नाहींत. त्यांचे मित्र त्यांचेकडे येत. त्यांना हे गांजा मळून देत, परंतु स्वत: त्यांनीं चिलीम ओढली नाहीं. पुढें चातुर्मास संपल्यावर एखाद्या वेळेस गमतीखातर एखादा झुरका मित्रमंडळीच्या आग्रहास्तव ते ओढीत. पण जुनें व्यसन म्हातारपणांत निश्चयाच्या बळावर त्यांनी घालविलें. केवढी त्यांची इच्छाशक्ति असेल हें मनांत येऊन त्यांच्याबद्दलची पूज्यबुध्दि माझ्या मनांत आज कितीतरी वाढली आहे; कारण, त्या वेळोस मी लहान होतों व सर्व सोपेंच वाटे.

मुलांनो, निश्चयाची, निर्भयतेची, आपण करुंच या भावनेची अशी परंपराशक्ति आहे. ही इच्छाशक्ति मानवांत आहे म्हणून तर ते मोठे आहेत. ही इच्छाशक्ति पशूंत नाहीं, कोणांत नाहीं. फक्त तुमच्यांत आहे. पण तुम्ही तर रडके, चहा कसा सोडूं, विडी कशी सोडूं, मलमलीची संवय झाली, अमुक झालें असें कुथत बसतां. शंका, संशय, भीति, चिंता, कसें होईल, काय होईल, काय करुं हें सर्व कार्य-हानिकारक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel