एकच विचार तुमच्या मनांत रात्रंदिवस घोळत राहूं दे. मी माझ्या कोणत्याहि परिस्थतींत, कोठें सांदीकोपर्‍यांत पडलों तरी, कांही तरी देशसेवा, जनसेवा केल्याशिवाय राहाणार नाहीं. हें कर्तव्य आहे. तें स्वत:च्या आंतरिक समाधानासाठीं आहे. कीर्तीसाठीं नाहीं; कर्तव्य करुन कीर्ति मिळवावयाची नसते : मिळाली तर ठीकच आहे. तुम्ही रोज जेवतां, त्यामुळें तुमची कीर्ति का होते ? जेवण हें जसें कर्तव्य आहे, त्याप्रमाणें दुसरीं पण बहुमोल कर्तव्यें आहेत. तीं तुम्हीं केलीं पाहिजेत, मग कीर्ति मिळो वा न मिळो. कर्तव्य केल्यानें होणारा आनंद हा त्रिभुवनांतील इतर सर्व आनंदापेक्षां फार उच्च, बहुत काळ टिकणारा आहे. मग करा तर विचार व व्हा स्पृहणीय कृतीस तयार !


आपली पूर्वीची संपत्ति व हल्लींचें दारिद्र्य
ज्या वेळेस पुणें राजधानी होती, तेव्हां फार श्रीमंत होती. सर्व हिंदुस्थानच्या घडामोडी तेथें चालावयाच्या. महाराष्ट्र संपन्न होता. नानासाहेब पेशव्यांनी म्हटल्याप्रमाणे उत्तरेकडून व दक्षिणेकडून संपत्तीचे पाट महाराष्ट्रांत, पुण्यांत आणून सोडले जात होते, त्यावेळीं वाकडे, तांबेकर, वानवळे वगैरे सावकार होते. सदाशिवराव नाईक वानवळे यांच्याकडे पेशवाईतील मोठमोठ्या सरदारांची खातीं होती. सुप्रसिध्द सरदार महादजी शिंदे यांचे देखील खातें नाईक यांच्या पेढीवर होतें, त्यांच्याकडे नाईक यांची ५० लक्ष रुपये बाकी थकली होती. नाईक यांनी पाटील बोवांकडे पुष्कळ तगादा केला; पण बाकीचा निकाल लागेना. पाटीलबोवांची एकदां समक्ष गांठ घ्यावी असें नाईक यांनी ठरविलें. इतक्यांत दिल्लीहून वकील मुतालकीचे किताब वगैरे घेऊन महादजी दक्षिणेंत येण्यास निघाले होते. नाईक यांनी पैठण येथें महादजीस गांठलें व पैशाचा तगादा केला. महादजी म्हणाले, ‘तुमच्यानें धर्म तर होत नाहीं, तर तुम्हास रुपये वसूल करुन काय करायचें आहे ?’ नाईक हे महाकंजूष होते, हें महादजीस माहीत होतें. परंतु नाईक यांनी विचार केला. नाहीं तरी पैसे बुडालेच आहेत; तर औदार्य दाखवावें. नाईक म्हणाले, ‘तुम्ही यावेळीं जितके रुपये द्याल तितके सर्व धर्म करतों.’  हे ऐकून शिंदे चकित झाले. नाईक यांच्या कंठी प्राण यावे म्हणून पाटीलबोवांनी एकदम २० लाख रुपयांचे तोडे मोजले ! नाईक यांनी तात्काळ ते सर्व धर्म केले !

बारामतीकर नाईक हेहि मोठे सावकार होते. पहिले बाजीरावांनी यांच्याजवळ एकदां बर्‍याच मोठ्या रकमेची मागणी केली; तेव्हां नाईकांनी रुपयांनी कांही गाड्या भरल्या ! हे सर्व रुपये एका शिक्क्याचे होते.

नाशिकचे हिंगणे यांनी एकदां पेशव्यांस मोठी मेजवानी दिली. हे हिंगणे मोठे सावकार. मोती कुटून त्यांनीं रांगोळी घातली होती ! पेशवे सरकार पानावर बसले व हिंगणे प्रार्थना करण्यासाठीं आले. त्यांनीं आपल्या मुलास विचारलें, ‘पेशवे कोणते?’ तो साधा प्रश्न होता. परंतु चुगलखोर लोक श्रीमंतांस म्हणाले, हा अपमान आहे. पेशव्यांनी घर लुटण्याचा हुकूम दिला. घर धुतात तसें साफ केलें व लाखों रुपयांची लूट जमा केली. हें पाहून मुलास वाईट वाटलें. म्हातारा मुलास म्हणाला, “अरे, घरांतील कचरा गेला ! तेव्हां पेशव्यांनी तळघर लुटलें व मोहरांचे हंडे आणवले. हें पाहून मुलगा रडूं लागला. बाप म्हणाला, “घरांतील एक कोपरा गेला, घाबरुं नकोस. पेशव्यांनी गुप्त तळघर शोधण्याचा प्रयत्न केला. तें सांपडेना. श्रीमंतानीं हिंगणे यांस बोलावून सांगितलें कीं, दुसरे तीन कोपरे पहाण्याची इच्छा आहे. सर्व द्रव्य परत देईन असें वचन घेऊन हिंगणे यांनीं हिरे, माणके व पांच वगैरेंचे नवरत्नांचे हंडे दाखविले ! ही सर्व संपत्ति पाहून श्रीमंतांचा गर्व नाहींसा झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel