बगदाद शहरांतील ह्यासंबंधींची एक दंतकथा आहे. एकदां बगदाद शहराकडे महामारीचा फेरा वळला; ही मरीआई (कॉलरा) बगदाद शहराकडे निघाली. वाटेंतील एका वाटसरुनें तिला विचारलें, ‘मरीआई, बगदाद शहराचे किती बळी घेण्याचें तूं ठरविलें आहेस ?’ तिनें उत्तर दिलें, ‘बाबा रे, ह्या वेळीं मी फार प्राण नाश करणार नाहीं; फक्त पांच हजार प्राणीच मला पाहिजे आहेत.’  वाटसरु म्हणाला, ‘जय मरीआई, थोडेच बळी घेणार तर ! कृपा होईल तुझी.’

पुन्हां बगदाद शहरांतून महामरी आई निघाली, त्याच वाटसरुची व तिची पुनरपि गांठ पडली. वाटसरुनें हात जोडले व तो म्हणाला, ‘आईसाहेब आपण बगदादमधून तर पांचच हजार प्राणी नेणार होतां; परन्तु फन्ना तर पन्नास हजारांचा केलात ? आपण बोलल्या शब्दास जागल्या नाहींत असें दिसतें.’

विकट हास्य करुन मरीआई म्हणाली, ’अरे, मी तुला सांगितले ऐवढेच पांच हजार बळी घेतले,  परन्तु पंचेचाळीस हजार हे भीतिराक्षसणीनें बळी घेतले, ते भीतींने मेले, समजलास !’

मुलांनों, या गोष्टींतील तात्पर्य तुमच्या लक्षांत आलेंच असेल. भीतीमुळें स्नायूंचा जोर कमी होतो; रक्ताचे वाहणे कमजोर व मंद होते. शरीर लुळे लटके पडते. भीतीमुळें एकंदर जीविताच्या नाड्याच आंखडल्या जातात. भीतीमुळें आपण स्वत:च दु:खी व कर्तव्यशून्य होतों असें नाहीं तर दुसर्‍यासहि आपण नाउमेद करतों. तुम्ही हंसा म्हणजे जग हंसेल. सूर्यप्रकाशानें जसें धुक्याचें पटल दूर होतें; त्याप्रमाणें तुमच्या तोंडावर तळपणार्‍या हास्याच्या, आनंदाच्या किरणांनी दुसर्‍याची चिंता दूर होईल. परंतु मनुष्य विचार करीत नाहीं. स्वत: अनिश्चित, साशंक व भीतिग्रस्त होऊन दुसर्‍यासहि “तूं म्हणतोस खरें हें कार्य होईल म्हणून, मला नाहीं बाबा वाटत; अरे मोठमोठे हें काम करतांना थकले.” अशा भेकड व नेभळट वाणीनें नाउमेद करतो; यासंबंधी वाचलेली एक गोष्ट सांगतों.

एका तरुण माणसास अफू खाण्याचें व्यसन जडलेले होतें. त्या तरुणाच्या घरचीं दोन माणसें त्याच्यावर जींव कीं प्राण करीत. एक त्याची आई व दुसरी त्याची आजी. हा तरुण फार हळुवार व मृदु स्वभावाचा होता. त्याच्या मनावर त्या दोघींच्या विचारांचा परिणाम होई.

आपल्या व्यसनामुळें आपल्या आजीस व आईस मनस्वी वाईट वाटतें तर हें व्यसन आजपासून आपण सोडून द्यावयाचें असा त्या तरुणानें एक दिवस निर्धार केला. त्यानें तो निश्चय त्या दोघींस सांगितला. परंतु त्या दोघी “चांगलें केलेंस; असाच निश्चय करावा,” वगैरे उत्तेजनपर बोलण्याऐवजीं “आतां कसचें रे बाबा सुटतें व्यसन ! त्या शेजारच्या गणप्याला व्यसन होतें, तें त्यानें सोडण्याचा सतरांदा निश्चय केला, पण छे, कांही म्हटल्या सुटलें नाहीं, अखेर तो त्या व्यसनापायीं मेला बिचारा. त्या माधवरावाचें असेंच झालें. तुझा तरी कसला निश्चय टिकतोय ? त्यांनी मिळवून ठेविलें, तूं या अफूपायीं तें सारें गमावून बसणार ! व्यसन आतां रे कसचें सुटणार ! नाहीं रे बाबा, तें आतां मेल्याशिवाय सुटावयाचें नाहीं. तुझ्या या व्यसनानें आपण सर्व भिकेस लागणार रे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel