निमगांवचे शिक्षकसंमेलनप्रसंगी केलेलें भाषण
‘आजच्या या सभेत शिक्षकांच्या केवळ आर्थिक स्थितीचा विचार होणार आहे हे मला माहीत नव्हतें. परन्तु आजच्या सभेची ही मर्यादा आहे. शिक्षकांची आर्थिक हलाखी आहे. येथील तक्त्यांतून सर्वांपेक्षां शिक्षक पगाराच्या दृष्टीनें कमदर्जाचा हें सिध्द केलें आहे. मोरे कमिटीनें शिक्षकांचा पगार जास्तींत जास्त ५० रु. सुचविला आहे. त्याचा निषेध करण्यासाठीं तुम्ही जमलां आहांत. मोरे कमिटीनें सुचविलेले पगार पंतप्रधानांस पसंत नाहींत. त्यांनी त्यासंबंधी पुन्हां एक कमेटी नेमली आहे. मोरे कमेटी मुख्यत्वें करुन प्राथमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठीं होती. तुम्ही जे ठराव तयार केले आहेत त्यांत ‘आर्थिक बाबतींत मोरे रिपोर्ट नापसंत आहे’ असें तुम्ही म्हटलें आहे. मुंबई इलाखा प्रां. शिक्षण परिषदेंत मोरे रिपोर्ट सर्वत्र निषेधिला गेला. तुम्ही अधिक विचारपूर्वक ठराव केला आहे. शिक्षणासंबंधीं या कमिटीनें जे नवीन विचार, ज्या नवीन योजना दिल्या आहेत, त्या निषेधार्ह नाहींत. आपल्या देशांतील शिक्षण परिस्थितीस अनुसरुन नाहीं. डेन्मार्क वगैरे देशांतील प्राथमिक शाळा शेतीशीं जोडलेल्या आहेत. आपल्या देशांतहि शेती, विणकाम वगैरे खेड्यांतील प्रमुख धंद्यांशीं शाळा जोडलेल्या असल्या पाहिजेत. वर्धा शिक्षण पध्दति ही शास्त्रीय पध्दतीच आहे. तिच्या आधारावर नवीन शिक्षण उभारलें पाहिजे.

मुलांना कांही तरी निर्माण करावें असे वाटतें. तीं आईबरोबर पाणी भरुं लागतात, धुणी धुवूं लागतात. ती गाऊं लागतात, चित्रें काढूं लागतात. त्यांना वाटतें खणून बी लावावी, पाणी घालावें. आपले हात कांही तरी निर्माण करीत रहावे असें त्यांना वाटतें. ही जी मुलांची निर्माणशक्ति ती आजकाल मारली जाते. त्याला अक्षरें गिरविण्यांत गाडून टाकतां. लहानपणीं ही निर्माणशक्ति मारली गेल्यामुळें पुढेंहि ती दिसत नाहीं. म्हणून ही नवीन पध्दत मांडण्यांत आली आहे. काव्य, इतिहास हें मुलांना खेळतांना फिरतांना शिकवा, “झाडींतुनी हे उडुनी प्रभातीं” ही कविता शाळेच्या चार भिंतींच्या आंत शिकविणें हें पाप आहे. ती बाहेर हिंडतांना शिकवा. मुलगा बाहेरचा उडणारा पक्षी पहातो व मास्तर छडी मारतात. उड्डाण करणार्‍या सर्व वृत्ति शाळेंत मारतात. नको हें शिक्षण मुलें कामाला कंटाळतात, श्रमाला कंटाळतात. अमळनेरच्या हायस्कूलमध्यें असतांना मी असें पाहिलें आहे कीं जेव्हां मुलें प्रथम बोर्डिंगात येत तेव्हां स्वत:ची ट्रंक डोक्यावर घेऊन येत, परंतु शाळेंतून शिकून सहा महिन्यांनीं सुटींत घरी जाऊं लागलीं म्हणजे त्यांना हमाल लागे, हें शिकलीं; ट्रंक उचलणें म्हणजे कमीपणा हें ती शिकलीं. मी ट्रंक न उचलणारा, तो हमाल हलका हें तीं शिकलीं. आपणांस हें बदलायचें आहे. श्रमाचें महत्व ज्या पध्दतीनें कमी होतें ती नादान पध्दति आहे. आपणांस मूल्यें बदलावयाचीं आहेत. संस्कृति म्हणजे मूल्यमापन. कोणत्या वस्तूस काय मूल्य देतां त्यावरुन संस्कृति अजमावयाची.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel