साहित्याचें हें काम आहे. परंतु कोणाचें आहे लक्ष ? मुंबईच्या एका साप्ताहिकांत कांही दिवसांपूर्वी वाचलें, ‘तीस बत्तीस सालचीं प्रभात फेर्यांचीं जप्त झालेलीं रद्दी पुस्तकें सरकार मुक्त करीत आहे. त्याच्यावरची बंदी उठवत आहे. परंतु सरकारला सांगावें कीं, असलीं भिकारडीं गाणीं बंधमुक्त करुन मराठीला काळिमा लावूं नका. तीं सरकारी पेटींतच राहूं देत.’ मला वाटतें धनुर्धारी या साप्ताहिकांत असें होतें. काँग्रेस मंत्र्यांवर अद्याप शिवरामपंतांच्या पुस्तकांवरची जप्ती उठली नाहीं म्हणून राग असणें साहजिक आहे. परन्तु प्रभात फेर्यांची पुस्तकें मोकळीं झालीं म्हणून धनुर्धारीस कां वाईट वाटतें ? प्रभातफेरीचीं तीं भिकार गाणीं असतील. परन्तु त्या भिकार गाण्यांत ब्रि. साम्राज्यशाहीला मातींत मिळविण्याची शक्ति होती. सरकारनें त्या भिकार लिहिण्यातील सामर्थ्य ओळखले होते. मराठीतील सारे काव्यग्रंथ त्या भिकार वाटणार्या प्रभात फेरीच्या पुस्तकावरुन ओवाळून फेकून दिले पाहिजेत. सर्व भरतखंड पेटलें होतें. स्त्रियांचा, मुलांचा आत्मा शेंकडों वर्षांत जागा झाला नव्हता, तसा जागा झाला होता. अशा वेळेस ज्यांना दिव्य प्रतिभा होती, ज्यांना वाणीची थोर देणगी होती ते मुके होते. त्यांचीं हृदयें उचंबळलीं नाहींत. गिरीश गिरीप्रमाणें निश्चल राहिले. यशवंतांची वीणा मुकी राहिली. माधव ज्युलियन नाचले नाहींत. भावनांचा सागर भारतांत उसळला होता. परन्तु मराठींतील थोर कवि थंडगार होते. मग ज्यांना राहवलें नाहीं त्यांनीं केलीं गीतें. ती गीतें म्हणतांच हजारों लोक जमत. तीं गीतें जनतेला समजत. आमच्या साहित्यिकांचा संसाराशीं संबंध तुटल्यासारखा झाला आहे. फैजपूरच्या काँग्रेसमध्यें झेंड्याची दोरी तुटली. दोन लाख लोक सभोवतीं होते. कोण चढवणार दोरी, कोण चढून जाणार निमुळत्या, बारीक ८० हात खांबावर ? कोणी थोडे चढले, खालीं आले. तो शिरपूरचा एक रजपूत तरुण किसनसिंग उठला. गेला झरझर वर. टाळ्यांचा कडकडाट झाला. तो तरुण वर अचल होता. त्याचा पाय सरकला नाहीं. चढवली दोरी, फडकला झेंडा ! त्या वीराला जवाहिरलालांनी छातीशीं धरलें. महाराष्ट्राची मान उंच राहिली. केवढा काव्यमय अभिमानाचा प्रसंग, अमर प्रसंग ! परन्तु मराठींतील नामवंत कवि सारे मुके. या वृत्तांत्तानें त्यांची भावसमाधि लागली नाहीं. मराठींतील गद्याचार्य वा पद्याचार्य यांना या गोष्टींत राम वाटत नाहीं. आणि म्हणूनच समाजांत आज राम नाहीं.
मराठीची वाढ व्हावयास साक्षरताप्रसारहि पाहिजे. मराठी विद्यापीठहि झालें पाहिजे. एरव्हीं साहित्य वाढणार नाहीं. मराठी विद्यापीठ होणें अशक्य नाहीं. परंतु आम्हांला इच्छा हवी. त्यासाठीं पैसे हवेत. महाराष्ट्रांत दरवर्षी हजारों मुंजी लागतात. मुंज करणें म्हणजे ज्ञानाजवळ नेणें. मुंज खरी तेव्हां होईल जेव्हां मुलाच्या ज्ञानाची सोय होईल. मराठींतून ज्ञान देण्याची सोय नाहीं. खरी मुंजच होत नाहीं ! मुंजीचा पैसा प्रो. पोतदारांच्या हवालीं करा. म्हणजे मराठी विद्यापीठ उभे राहील. एक वर्ष गणेशोत्सवाच्या सर्व वर्गण्या मराठी विद्यापीठासाठीं द्या. गणेशोत्सवांत लाखों रुपये जात असतील. मुंबईला चाळीचाळींतून वर्गण्या होतात. एक वर्ष कार्यक्रम बंद. मराठी विद्यापीठ स्थापणें म्हणजे मंगलमूर्तीचा त्या विद्यासागराचा, गणपतीचा खरा उत्सव. वर्ध्याचे पूज्य विनोबाजी एकदां मला म्हणाले, “लिहीत काय बसतां ? कोण वाचणार तुमचें ? आधीं जनतेला वाचायला शिकवा” खरा साहित्यिक साक्षरताप्रचाराचाही स्वयंसेवक आधीं झाला पाहिजे. आपण जें लिहितों तें जनतेनें वाचावें अशी त्याला तळमळ असेल तर तो साक्षरताप्रसारहि करील.
असो; कितीतरी मनांत विचार येत आहेत. साहित्य सम्मेलनाची गोष्ट डोळ्यांसमोर आली म्हणजे अनेक प्रश्न डोळ्यांसमोर येतात. परंतु आज इतकेंच पुरे.
-वर्ष २, अंक ३-४