वॉल्ट व्हिटमन एके ठिकाणी म्हणतो, “बा तृणा ? तूं परमेश्वराच्या हातातून गळून पडलेला सुंदर हातरुमाल आहेस.” किती सुंदर कल्पना ! खोलींत पडलेल्या हातरुमालाच्या रंगावरुन, मोलावरुन, त्याच्या मालकाची ओळख पटते. त्याप्रमाणेंच या हिरव्यागार अफाट व दूरवर पसरलेल्या, फाटला तरी पुन्हां नीट होणार्‍या रुमालावरुन तो रुमाल ज्याचा आहे त्या अनंत परमेश्वराची कल्पना येते. असला सुंदर व अनंत रुमाल कोणत्या मँचेस्टरच्या गिरणींत तयार होईल बरें ? मँचेस्टर, लिव्हरपूल, मुंबई, अहमदाबाद येथील श्रीमंत व उन्मत्त गिरणीवाल्यांस असा साधा परंतु सुंदर, तजेलदार, नाजूक, साजूक विस्तृत रुमाल तयार करतां येईल का ? वीतभर लांब व टीचभर रुंद अशा मानवाच्या खिशात राहणारा हा रुमाल नाहीं. या परमेश्वराच्या रुमालाने पृथ्वीस चोळी दिली आहे; दर्‍याखोर्‍यास पांघरुण घातलें आहे, पर्वतांस पोषाख दिला आहे. व्हिटमनची कल्पना किती थोर आहे ! त्या कल्पनेंत आणखीहि एक महत्वाचा अर्थ भरुन राहिला आहे. खोलींत पडलेल्या रुमालावरुन त्या रुमालाच्या मालकाचा मी शोध करतों, त्या रुमालावर त्याचें नांव वगैरे आहे का पाहतो व मालकाचा तपास लावतों; त्याचप्रमाणें हा भव्य व स्तव्य रुमाल, हा हिरवा रुमाल कोणा भाग्यवानाचा आहे ? कोणा भाग्यवंताच्या हातून हा गळून पडला ? हा अखंड रुमाल अखंडैश्वर्य अनंताचा-परमात्म्याचा आहे. या हिरव्या रुमालावर त्याचें नांव आहे का ? या हिरव्या रुमालावर धन्याचें नांव दिसतें का कोणास ? होय. नांव आहे व तें दिसतेंहि; परंतु सर्वांच्या दृष्टीस तें दिसणार नाहीं. ज्याची दृष्टि दिव्यतर आहे, निर्मळ आहे, प्रेमळ आहे, पवित्र व प्रशांत आहे, ज्याची दृष्टि तार्‍याप्रमाणें सतेज व गंगौघाप्रमाणें गंभीर आहे त्याच दृष्टिला तें नांव दिसतें. या रुमालावर भगवंताचें एकच नांव लिहिलें नसून सहस्त्रनाम लिहिलेलें आहे; परंतु हीं अदृश्य नांवे दृश्य व्हावयास भक्तीचें, नम्रतेचें, वैराग्याचें, प्रेमळपणाचें अंजन डोळ्यांत घालावें लागतें. हीं नांवे दिसूं लागतील असे चष्मे पाश्चिमात्यांस करता येत नाहींत !

बा तृणा ! परमेश्वराच्या अपरंपार वैभवाचें यशोगान करणारा तूं मुका कवि आहेस ! परमेश्वराच्या अस्तिवाचें सिध्दान्तस्वरुपी समर्थन करणारा तूं संयतवाक् तत्वज्ञ आहेस. तूं बोलत नाहींस, परंतु कधीं कधीं तूं हंसतोस व रडतोस त्या स्मितानें व त्या अश्रूनें तुझ्या मनांतील भाव चटसारे कळतात. तूं बोलत नाहींस, पण तुझ्या अबोलण्यानेंच हजारों गोष्टी समजून येतात. तुझें मुकेपण म्हणजे सागराचें वक्तृत्व आहे, मेघाचें गंभीर गर्जन आहे. तुझ्या मुकेपणांत मोठी शक्ति आहे. बोलून कोणीहि दाखवील, परंतु बोलण्यासारखें जवळ असून मौन धरणें थोर होय. कार्लाईल म्हणत असे : Speech is great but silence is greater. बोलून दाखविण्यापेक्षां, प्रकटीकृत वाग्वैभवापेक्षा गुप्त व अदृश्य वाग्वैभव कधीं कधीं श्रेष्ठ असतें. जें अदृश्य आहे, अप्रकट आहे, ते अनंत आहे,  अप्रमेय आहे. त्याचें मोजमाप कोण करणार ? जें बोललें जातें त्याचें मोजमाप केलें जातें. परंतु हृदयांतील सुप्त व गुप्त वाणीचें वैभव, हृदयांतील या न छेडलेल्या वीणेच्या तारांचें माधुर्य त्याचें मोजमाप कोण करणार ?

बा तृणा ! तूं मुका आहेस, परंतु तुझें हृदय व्हिटमनसारख्यांस, रामतीर्थासारख्यांस समजून येतें. आम्हांस कसें कळणार ? तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें ! तूं फार थोर आहेस एवढेंच मला समजून मी तुला विनम्रभावें वंदन करतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel