हिंदुस्थानांतील शेतीचें उत्पन्न दरवर्षी कमी कमी होत आहे. १९१० मध्यें बिघाभर जमिनींत ७॥ मण उत्पन्न होई तें १९२७ मध्यें ६॥ मण होऊं लागलें. हिंदुस्थानांतून प्रत्येक मिनिटास ११८ मण तांदूळ, ५५ मण गहूं, ५० मण भूईमूग परदेशांत चालला आहे. देशांतील दीन लेंकरांस अन्न महाग होत चाललें आहे व भारतमाता भाकरी पोटभर देत असूनहि ती सारखी परदेशीं चालली आहे. देशांत धान्याची महर्गता कशी वाढत आहे हें पुढील कोष्टकावरुन समजेल.
वर्ष        एक        रुपयास            मिळणारे धान्य
१७३८        “        “            २॥। मण तांदूळ मिळत.
१७५०        “        “            २।    “    “       “
१७५८        “        “            १॥।  “    “       “
१७८२        “        “            १मण ५शेर “       “   
१८२५        “        “            २५ शेर    “       “
१८५४        “        “            १५ शेर    “    “
१८८०        “        “            १२ शेर    “    “
१९२५        “        “            ५ शेर तांदूळ मिळत.

पूर्वी हिंदुस्थानांत दुष्काळ पडला तरी पांचावर धारण असे. ‘पांचावर धारण बसली’ या शब्दाचा अर्थ लोकांची घाबरगुंडी उडाली असा आहे. ज्या वेळी पूर्वी रुपयास ५ शेर धान्य मिळूं लागे तेव्हां तो भयंकर दुष्काळ असें समजत. परंतु आतां हा दुष्काळ रोजचाच झाला एकूण. पूर्वी गांवोगांवी मोठमोठीं पेवें असत व या पेवांतील धान्याचा दुष्काळग्रस्तांस उपयोग होई. परंतु आतां पेवें कोठलीं नी काय ?

हिंदुस्थानचा व्यापार हा सुध्दां परकीयांच्या हातांत. पूर्वी मोठमोठीं गलबतें बांधणारे, मोठमोठे व्यापारी आमच्याकडे हजारांनी असत. पंधराव्या शतकांत दक्षिणेकडील हिंदी व्यापारी इतके श्रीमान होते कीं, प्रत्येकी १५००० सोन्याचीं नाणीं किंमत पडेल अशा भारी किंमतीच्या स्वत:च्या मालकीच्या चाळीस चाळीस जहाजांतून ते व्यापार करीत. ३०० नावाडी लागतील इतकीं हीं जहाजें मोठीं असत. अकबराच्या कारकीर्दीत तर नौकाबांधणीला फारच उत्तेजन मिळालें. अबुलफजल लिहितो एका ठठ्ठा प्रांतात ४० हजार जहाजें भाड्यानें देण्यासारखीं होतीं ! मुंबईस मोठमोठे पारशी कुशल नौका बांधणारे होते. मुंबईला पारशी नौकाशिल्पज्ञांच्या अमलाखालीं तेथील डॉकयार्डाची कार्यक्षमता इतकी वाढली कीं अशा तर्‍हेची डॉक यार्डे युरोपखंडांतहि कोठें आढळणार नाहींत असें लेफ्टनंट लो लिहून ठेवतो. आमचीं सागवानी लाकडाचीं जहाजें ओकच्या जहाजांपेक्षां उच्च दर्जाचीं असत. “ग्रेटब्रिटनच्या आरमारांतील प्रत्येक ओकचें जहाज १२ वर्षांनी टाकाऊ होतें. तर मुंबईस पारशी शिल्पज्ञांनी बांधलेलीं सागवानी जहाजें ५० वर्षे व अधिकहि टिकत आणि पुन्हा ही इंग्लंडच्या गोद्यांतून बांधविलेल्या जहाजांपेक्षा चौपटीने स्वस्त पडत” असे लेफ्टनंट कर्नल वॉकरनें लिहून ठेविलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel