कोळसा :- समजलों. मी तुझ्याप्रमाणें सर्व संकटें सोशीन; प्रचंड दाब सहन करीन, पण तुझ्याप्रमाणें तेजस्वी व बळवान् होण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीं.

हिरा :- तुझा निश्चय असाच कायम राहो. कारण, निश्चयाचें बळ अंगी असलें म्हणजे फळ मिळालेंच समज.

चीनमधील मुली-मुलगे
चीनमध्यें मुली मुलगे राष्ट्रीय उन्नतीकरिता कशी खटपट करीत आहेत हें पाहिलें म्हणजे आश्चर्य वाटतें. आपल्याकडील बोलघेवड्या व फुलपांखरी तरुण तरुणींनीं यापासून बोध घ्यावा. क्किइचौ म्हणून चीनमध्यें एक अत्यंत मागसलेला प्रांत आहे. या भागात चांगले रस्ते जवळजवळ नाहींत. या प्रांताचा गव्हर्नर हा मोठा हुशार व योजक असा आहे. शाळेंतील मुलांमुलींकडून रस्ते तयार करुन घेण्याची त्यानें मनात कल्पना आणली. एक हजर मुलें मुली एके ठिकाणीं कवाईत करीत आलीं. गव्हर्नरानें उद्दीपक व देशभक्तीनें ओथंबलेलें भाषण केलें. तो म्हणाला, ‘पहा, तुमचा हा प्रांत दुसर्‍या प्रांतापासून अगदी अलग राहिला आहे; दळणवळण नाहीं; कांही नाहीं. परंतु मुलांनों, बाहेरच्या जगाशीं व्यवहार करण्याचें तुमच्या मनांत असेल, तर सर्व अडचणी तुम्हीं क्षणांत नाहींशा कराल. रस्ते बांधण्याचें काम अंगावर घ्या. रस्ते बांधणें हे स्वातंत्र्य मिळवण्याचेंच साधन आहे. तुमच्यामधील पुष्कळ मुलें श्रीमंत व सरदार घराण्यांतील आहेत. तरी त्यांनी हें काम करण्यांत कमीपणा मानूं नये. कमीपणा कामानें येत नसून, चैनीनें, विलासानें, आलस्यानें येत असतो. देवानें दिलेले हातपाय दुसर्‍याच्या मार्गांतील अडचणी दूर करण्यासाठीं उपयोगांत आणणें हेंच खरें मनुष्याचें कर्तव्य आहे.’

गव्हर्नराच्या भाषणाचा तत्काळ परिणाम झाला. ज्या ठिकाणी उंचवटे फोडून खणून रस्ते करावयाचे तेथें मुलें, मुली सर्व जमा झाले. गव्हर्नर निरनिराळ्या सूचना देत होता. हजारों कुदळीं, खोरीं, पाहरा काम करुं लागल्या. पाळीपाळीनें मुलें काम करीत होतीं. एका वर्षांत तो रस्ता तयार झाला. मोटार सुध्दां सुखानें जाईल असा रस्ता झाला. हा रस्ता होईपर्यंत क्किइचौमध्यें गाड्या नव्हत्या. सर्व सामान बैलांच्या पाठीवरुन किंवा माणसांच्या खांद्यावरुन न्यावें लागत असे. ज्या वेळेस हा प्रचंड रस्ता तयार झाला,  त्यावेळेस त्या प्रांतांतील लोकांस काय बरें वाटलें असेल ?

विद्यार्थ्यांनाच हें काम करावयास त्या गव्हर्नरानें लाविलें त्यांत हेतु होता. समाजांतील वरच्या दर्जाचे हे विद्यार्थी शारीरिक कामें करणें हलकें मानतात. त्यांची ही कल्पना काढून टाकणें भाग होतें. या साध्या शारीरिक कष्टाच्या कामाला त्यानें राष्ट्रीय स्वरुप दिलें. राष्ट्रभक्ति ही राष्ट्र सुखी करण्यासाठीं केलेल्या प्रत्येक कार्यांत आहे. मग तें काम करण्याचें, झाडण्याचें, शौचकूप साफ करण्याचें, कसलें का असेना. गव्हर्नराच्या या उदाहरणानें इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसहि स्फुरण आले व दिव्यानें दिवा पेटवावा, त्याप्रमाणें मुलें मुली खेड्यापाड्यांतून निरनिराळी कामें करण्यास जाऊं लागलीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel