काँग्रेसकमिट्या व काँग्रेसवाले यांस सूचना
काँग्रेस युध्दमंडळांत पंडित जवाहरलाल, सरदार व मौलाना अबुलकलम अझाद, तिघे आहेत. जवाहरलाल अध्यक्ष आहेत. या युध्दमंडळानें पुढील पत्रक प्रसिध्द केलें आहे :
जगांत महत्वाच्या घडामोडी होणार हें बरेच दिवस आपण जाणतच होतों. प्रक्षुब्ध वातावरणांतच आपण कांहीं वर्षे रहात होतों. आपले राष्ट्रीय प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्यानें असत; तरीहि या जागतिक प्रश्नांकडे काँग्रेसनें कानाडोळा केला नाहीं. त्या बाबतींत आपलें धोरण कसें असावें याची स्थूल रुपरेषा, एक सर्वसाधारण पध्दति तिनें आंखली होती. आतां तर युध्दच सुरु झालें आहे. परिस्थितीचा स्फोट झाला आहे, इकडे चीन-जपानच्या बाजूलाहि २-२॥ वर्षे युध्द चालूच आहे.
आजच्या परिस्थतीनें काँग्रेसच्या प्रत्येक अनुयायाच्या मनांत विलक्षण कालवाकालव झाल्याशिवाय राहिली नसेल. प्रत्येकानें स्वत:च्या कर्तव्याचा गंभीर विचार केला असेल. अशा परिस्थितींत काँग्रेसनें ज्या सूचना दिल्या त्याला अनुसरुन व स्वत:चें अस्तित्व सिध्द करण्यासाठींहि काँग्रेसनें योग्य तें कर्तव्य पाळलें पाहिजे. काँग्रेसच्या प्रतिष्ठेस शोभेल अशा प्रकारचा कार्यभार उचलला पाहिजे.
जें जें होईल त्याच्याकडे पहात रहाणें हें आमचें कधींच धोरण नव्हतें. हिंदी स्वातंत्र्यासाठीं सतत कार्य करणारी व धडपडणारी काँग्रेस ही संस्था आहे. कित्येक वर्षे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला ती मूर्त स्वरुप देत आली आहे. आज जी गंभीर आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे, जिच्यामुळें जगावर व हिंदुस्थानवरहि परिणाम होणार आहेत, त्या परिस्थितींत अधिक मोठी जबाबदारी पुन्हां काँग्रेसला शिरावर घेणें भाग आहे.
या सर्व गोष्टींचा नीट सांगोपांग विचार करुन काँग्रेस वर्किंग कमिटीनें वर्ध्याचें तें पत्रक प्रसिध्द केलें. त्या पत्रकांत भारताचें धोरण स्पष्ट आहे. सर्व प्रांतिक व स्थानिक काँ. कमिट्यांनी ते पत्रक काळजीपूर्वक वाचावें. त्यांतील अर्थ नीट लक्षांत घ्यावा व तदनुसार वागावें. तें पत्रक निर्विकार बुध्दीनें लिहिलेलें आहे. त्यांत हिंदुस्थानवर काय परिणाम होतील यासंबंधी स्पष्ट साध्या शब्दांत खुलासा केलेला आहे. प्रक्षुब्धकाळीं हिंदुस्थाननें कोणता मार्ग घ्यावा याचीहि दिशा दाखवलेली आहे. त्या पत्रकाचा भाव सर्वांच्या सहज लक्षांत येईल. त्या पत्रकावरुन पुढें काय होणार याचीहि सर्वांना कल्पना येईल.
अत्यंत व्यापक दृष्टीनें व. कमिटीनें विचार केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्ट्या हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न परीक्षिला. हिंदुस्थानांत महान ध्येयासाठीं आपण झगडत आहोत. आपणांस जागतिक दृष्टिकोन उपेक्षून चालणार नाहीं. आजची जगाची घडी सध्यांच्या युध्दानें बदलल्याशिवाय रहाणार नाहीं, जगाचें रंगरुप बदलणार; जगाच्या या नवनिर्मितींत हिंदुस्थानहि आपला भाग घेणार.