आम्ही परस्परांपासून भिन्न आहोंत ही कल्पनाच राष्ट्रीय प्रगतीच्या आणि ऐक्याच्या आड येत आहे. आम्ही निराळे आहोंत यापेक्षां आम्ही एक आहोत ही भावनाच आपल्या देशाचा उध्दार करील ? मी हिंदू नाहीं, मुसलमान नाहीं. ख्रिस्ती नाहीं, पारशी नाहीं, किंवा बंगाली नाहीं, मराठी नाहीं, किंवा पंजाबी नाहीं तर मी हिंदी आहे असें जर प्रत्येकाला वाटूं लागलें तर आपल्या देशाचा भाग्योदय होण्यास क्षणाचाहि विलंब लागणार नाहीं. मग जातीमधील, धर्मामधील तंट्यांचा मागमुसहि लागणार नाहीं. सर्वत्र ऐक्याचें साम्राज्य पसरेल. आपण एक आहों ही भूमिका स्त्री-पुरुष, आबालवृध्द, हिंदु-मुसलमान या सर्वांमध्यें कशी पसरेल ? याला एक उपाय आहे. या सर्वांची राहणी सारखी झाली पाहिजे. सर्वांचे खाणें, पिणें, राहणें, कपडेलत्ते, यांत जो भेद आहे तो निघून गेला पाहिजे. सारखा पोषाख करणार्‍या लोकांना प्रथमदर्शनींच आपण एक आहोंत असें वाटावयास लागतें. या दृष्टीनें गेल्या १० वर्षांत झालेला बदल अत्यंत महत्वाचा आहे. त्या फरकाची द्योतक गांधी टोपी आहे म्हणून या गांधी टोपीलाही महत्व प्राप्त झालें आहे. १९२० सालापर्यंत राष्ट्रीय चळवळ असली तरी प्रत्यक्ष राष्ट्रीय सभेला हिंदु, मुसलमान, पारशी किंवा निरनिराळ्या प्रांतांतले लोक आपापले पोशाख घालून येत. राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर हे कोणी निरनिराळे लोकच येथें जमले आहेत असे प्रेक्षकांस वाटल्याशिवाय राहत नसेल. परंतु असहकारितेच्या चळवळींत खादीचा उदय झाल्याबरोबर महाराष्ट्रीयांची पगडी, पारशांची उभी टोपी आणि मुसलमानांची लाल गोंड्याची टोपी इत्यादि सर्व शिरोभूषणांस गांधी टोपीनें अर्धचंद्र दिला आणि त्यांच्या ठिकाणी ती स्वत: विराजमान झाली. अलीकडच्या राष्ट्रीय सभेचें दृश्य किती आल्हादकारक दिसत असेल ? सर्व पंथांचे, धर्माचे, प्रांतांचे लोक खादीचा सदरा आणि गांधी टोपी घालून जमलेले आहेत हें पाहून कोणा हिंदवासीयाचें हृदय उचंबळून येणार नाहीं ? डॉ. अनसारी, पंडित जवाहिरलाल नेहरु, महादेव देसाई, बाबू राजेंद्रप्रसाद, गंगाधरराव देशपांडे, नरिमन, राजगोपाळचारिअर इत्यादि निरनिराळ्या प्रांतांतील आणि निरनिराळ्या धर्मांतील लोक एकसारखा पांढरा शुभ्र पोशाख करुन राष्ट्रोन्नतीकरतां एकत्र जमलेले पाहिल्यावर आपणांमध्यें राष्ट्रीयत्वाची भावना वाढत चालली आहे असें कोणास वाटणार नाही ?

खेडेगांवांतहि पोषाखांत असाच फरक घडून आला आहे. पाटलांचे पागोटें किंवा शालू आणि पांढरपेशांची पगडी किंवा फेटा यांची जागा गांधी टोपीनें पटकावल्यामुळें ते परस्परांच्या अधिकच जवळ आले आहेत. ब्राह्मणांचा पोषाख ब्राह्मणांनी करावा आणि पाटलांचा पोषाख पाटलांनी करावा ही पूर्वीची भिन्नत्वाची कल्पना निघून गेली आहे आणि सर्व जातींनी सारखा पोंषाख करावयास कांही हरकत नाहीं असें लोकांना वाटूं लागलें आहे. खरोखर हें सुचिन्ह आहे. आपण सर्व सारखे आहोत हा विचार लोकांमध्यें जितका जितका फैलावत जाईल तितका आपल्या देशाचा उत्कर्षकाल जवळ येत जाईल.

गांधी टोपी आणि खादीचा पोषाख ही राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न करतात त्याबरोबर हीं साधेपणाची राहणीहि शिकवतात. भाराभर कापड्यांचे ओझें आंगावर वहाण्याची आपल्या देशांत आवश्यकता नाही; आणि दारिद्रीनारायणाच्या देशांत कपड्यांच्या प्रीत्यर्थ इतका पैसा खर्च करणें न्याय्यहि होणार नाहीं. म्हणून धोतर, टोपी आणि खादीचा सदरा हा लोकांचा सर्वसाधारण पोषाख होणें अत्यंत इष्ट आहे. खादीला खर्च जास्त येत असला तरी कपड्यांत काटकसर केल्यावर एकंदर खर्च जास्त येणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel