सह नाववतु सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु ।
हा वैदिक शिक्षणमंत्र विसरले. श्रीमंत, गरीब, स्पृश्यास्पृश्य हे भेद शिक्षकानें विसरुन गेलें पाहिजे. प्रेमाच्या व उदारपणाच्या प्रकाशांत लहान मुलांची मनें फुलवा. त्यांच्यांत खेळा, मिसळा. त्यांच्या हृदयांत शिरा मुलें मनानें व तनाने निर्मळ राहातील असें करा. मुलें नीट उभीं राहतील, नीट बसतील हें पहा. हिंदुस्थानांतील मुलें बावळट दिसतां कामा नये. मुलांचा कपडा मळका नको, फाटका नको. मी म्हणत असतों ‘वर्गांत छडी नको, परन्तु सुई व दोरा पाहिजे.’ ज्या मुलांचे कपडे फाटले असतील, त्यांचे शिवून द्या. त्यांना छडी नका मारुं. सेवेनें मनें जिंका, उत्साह निर्माण करा. दर रविवारीं मुले बरोबर घेऊन ग्रामसफाई करा. सूर्य उगवतो व कोट्यवधि जंतु मारतो. मनोबुध्दींतील व गल्लींतलि जंतु मारणें, ही अंतर्बाह्य सफाई. सफाई करणें म्हणजे सूर्याची उपासना. बुध्दीची सफाई व बाहेरची सफाई. गांवांतील बाह्य घाण दूर करा व लोकांच्या मनांतील भेदभावाची घाण तीहि दूर करा. तुम्ही स्वत:ला तुच्छ मानूं नका. जगांत दोन लोक वंदनीय. धान्याची भाकर देणारा व विचाराची देणारा. शेतकरी पाहून प्रणाम करावा, तो धान्याची भाकर देतो. शिक्षक पाहून प्रमाण करावा, तो विचाराची भाकर देतो. गांवांत निर्मळ विचारांची भाकर देणारे तुम्हीं - तुम्हांला पगार किती आहे तें पहा, परन्तु त्यामुळें फार खिन्न होऊं नका. एकाद्या लक्षाधिशाच्या मुलासहि शिक्षकांस काम सांगता येतें. दसर्याचे दिवशीं लक्षाधिशाचा मुलगाहि त्याला भक्तीनें प्रणाम करतो. संक्रातीच्या दिवशीं लक्षाधिशाचा मुलगा प्रेमानें त्याच्याजवळ तिळगूळ मागण्यास येतो. हे शिक्षकाचें भाग्य आहे ! या भाग्याला पगारामुळें का लायक होऊं ? नाही; सेवेनें, पगार तुम्हाला अधिक पाहिजे हे खरें; परंतु शिक्षकाचा थोर, धर्महि विसरुं नका. एवढेंच नम्रपणें व प्रेमळपणें मला सुचवावयाचें आहे आणि तुमचे पगाराचे वगैरे प्रश्न संपूर्णपणे समाधानकारक रीतीनें सुटावयास हवे असतील, तर पुढच्या लढ्यांत तुमच्या शाळा बंद पडून तुम्ही व विद्यार्थी धुळे तुरुंगाचा रस्ता धरावयास तयार रहा. दुसरें काय ?’
सम्मेलनांत आर्थिक स्थितीसंबंधी अनेक ठराव झाले. पगार कमी मिळतो म्हणून बुध्दिमान् लोक फार येणार नाहींत अशीहि शंका कांहींनी मांडली. एप्रिलच्या १ तारखेस उपवासाचा ठराव झाला. त्या वेळेस आमदार हीरे म्हणाले. “तुम्ही इतक्यांत उपवास करुं नये. साठे परांजपे स्कीमप्रमाणें पगार द्यायचा म्हटलें तर २० लाख रुपये लागतील ! एकदम हे कोठून आणायचे ? तुम्ही १॥ महिन्याची मुदत दिली. महिना दीड महिन्यापूर्वी पुण्यास परिषद होऊन ठराव झाला. पैशांचे का झाड आहे, हलवलें कीं पडले ! मंत्र्यांना विचार करायला हवा. दारुबंदी करायची आहे, बडे पगार कमी करतां येत नाहींत. मंत्र्यांची स्थिति कठीण आहे. त्यांची स्थिति लक्षांत आणून जरा धीर धरा. मंत्री विचार करीत आहेत. मूस व प्रो. परांजपे यांची कमिटी नेमली आहे तिचा निकाल लागेपर्यंत तरी थांबा. तुम्ही स्वत:ची किंमत पगारावर ठरवूं नका. पोलिसास तुमच्यापेक्षां अधिक पगार असेल. फॉरेस्ट शिपायाला असेल. परन्तु तुम्हांला मास्तर सारे म्हणतात. तुम्हाला जो मान आहे, तो त्यांना नाही. होय. तुमची स्थिति सुधारली पाहिजे. परंतु जरा सबुरींने घ्या. तथापि ठराव पास झाला. पोतनीस म्हणाले, ”मोरे कमिटीनें शिक्षणासंबंधी विचार मांडले आहेत ते मननीय आहेत. त्यांचा तुम्ही निषेध करुं नका. तुम्ही केवळ आर्थिक गोष्टींचा निषेध केला हें उत्तम झालें.”
--वर्ष २, अंक १.