हिरा व कोळसा यांचा संवाद
कोळसा :- हिरे दादा, तूं व मी एकाच जातीचे; शास्त्रज्ञांनीं ही गोष्ट सिध्द केली आहे. तरी पण आपणांस जग भिन्न रीतीनें वागवितें. असे का ? तूं राजमुगुटावर मिरवतोस, श्रीमंत स्त्रियांच्या कंठांत शोभतोस; तुझी किंमत लाखांनीं करतात. परंतु माझी किंमत अगदींच क्षुल्लक; मला भट्टींत जाळतात, पोळतात, भाजतात; माझे हाल पाहून तुला वाईट नाहीं का रे वाटत ? आपल्याच हाडामांसाच्या बंधूचे हाल पाहूनहि सुखी राहणारा तूं हिंदु लोकांप्रमाणें वागण्यास केव्हां शिकलास ?

हिरा :- तसें नाहीं रे. मला कि नाहीं तुजबद्दल फार फार वाईट वाटतें. परंतु नुसतें माझ्या वाईट वाटण्यानें तुझें दु:ख थोडेंच दूर होणार आहे ? आपल्या दोघांमध्यें असा फरक कां याचा तूं कधीं विचार केला आहेस का ? तूं मृदु व मऊ स्वभावाचा आहेस. तुझें शरीर माझ्या सारखे कणखर नाहीं. मी सतत प्रयत्नानें माझें शरीर बलवान् बनविलें आहे. आतां घणाचे घणाचे घाव वर्मी बसले तरी मी अढळ व अभंग राहातों. तूं माझ्यासारखा बलवान् होण्याचा प्रयत्न केला नाहींस; म्हणून तूं क्षीण व दुर्बल शरीराचा राहिलास व दीनास जगांत दैन्य व दु:ख हीं ठेवलेलींच आहेत. गायीसारख्या गरीब हिंदूंना सरकार दरडावतें परंतु करड्या वृत्तीच्या मुसलमानांस गोंजारतें. हें साधें ज्ञान तुला नाहीं का ? अरे, जगांतील या अनुभवानेंच शहाणें व्हावयाचें आहे. तूं फार सौम्य व मृदु पडलास, म्हणून दु:ख शोक, चिंता हीं तुझ्या वांट्यास आलीं. तूं दगडासारखा कठीण हो; माझ्या सारखा मग तूं पण शोभशील. परंतु प्रयत्न कर व बलशाली हो. आयुष्याची सार्थकता बलशालित्वांत आहे. दुर्बलत्व म्हणजे क्षुद्रत्व व नीचत्व; दुर्बलत्व म्हणजे गुलामगिरी व मरण. दुर्बलांस जगांत किंमत नाहीं. त्याला सर्व जग चिरणार, लाथाडणार, ठार मारणार. समजलास का ?

कोळसा :- असें का बरें म्हणतोस ? लहान वस्तूसुध्दां प्रभावशाली असतात. मृदुत्व हें सुध्दां सामर्थ्यवान् असतें. लाकडे फोडणार्‍या भुंग्यास मृदु कमळ कोंडून ठेवूं शकतें. तो पहा लहानसा दंवबिंदु. तृणपर्णावर किती सुंदर चमकत आहे तो ! एवढा प्रचंड सूर्य पण त्याचें प्रतिबिंब त्या दंवबिंदूनें आपल्या उदरांत सांठविलें आहे. तो लहानसा बिंदु, दादा, तुझ्याहूनहि तेजानें चमकत आहे. दंवबिंदु किती मृदु, किती सुकुमार, परंतु त्याचें हे वैभव पहा.

हिरा :- सूर्यप्रकाशांत चमकणारा तो दंवबिंदु या क्षणीं सुंदर दिसतो आहे. परंतु दुसर्‍या क्षणीं तो नाहींसा होईल, वाफाळून जाईल, आटेल. त्या तृणपर्णास जसा धक्का लागूं दे कीं तो मौत्तिकसम दंवबिंदु सळकन भूमीवर पडेल व विरुन जाईल. अळवाच्या पानावर जलबिंदु मोत्यांसारखे दिसतात, परंतु क्षणांत भूमीवर पडतात व मातींत मिळतात. खरोखरचें मोतीं व्हावयाचें असेल तर जलबिंदूस महासागरांत उड्या घ्याव्या लागतील; त्यांना कष्ट सोसावे लागतील. त्यांनीं मन कठीण केलें पाहिजे. बाबा रे, प्रयत्न कष्ट यांशिवाय जगांत किंमत मिळत नाहीं. तो दंवबिंदू कोमल आहे, मृदु आहे. एकादा लहानसा पक्षी आपल्या चोंचीनें तो बिंदू गिळंकृत करील. परंतु माझ्यावर चोंच जर मारील, तर चोंच भंगेल पण मी भंगणार नाहीं, मला इजा होणार नाहीं. ऐरणावर मला ठोक ठोक ठोकतील पण मी फुटणार नाहीं. तूं माझ्यासारखा संकटांशी टकरा खेळण्यास शीक. पर्जन्य मातीला--मृदु मातीला वाहवून नेतो, परंतु प्रचंड पर्वत ताठ उभा राहतो. त्याच्या शिरोमंडलाभोंवतीं पाण्यानें भरलेले मेघ प्रदक्षिणा घालीत असतात. भाऊ, पर्वताप्रमाणें कठोर व्हावें; वज्राप्रमाणें बळकट, बलशाली व्हावें. बळाजवळ भाग्य, गौरव, यांची वस्ती असते. जो बळी तो सर्वांस छळी, पण त्यास कोणी न छळी. आज पाश्चात्य राष्ट्रें बलवान् आहेत, म्हणून दुसर्‍यांवर दरारा गाजवीत आहेत. इतर राष्ट्रांनीं धैर्यानें पहाडाप्रमाणें उभें राहावें, दंड थोपटावे, म्हणजे हीं गुरगुरणारीं राष्ट्रें गरीब होतील. भाऊ अरे, जगांत विजयानें मिरवलें पाहिजे. मेलेलें न राहतां जिवंतपणानें, प्रतिष्ठेनें राहण्यास शिकलें पाहिजे, समजलास ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel