आज हिंदुस्थानांतील प्रत्येकाचें कर्तव्य काय आहे ? काय आहे हें सांगण्याची गरज आहे असें वाटत नाहीं. ही सुवर्णभूमि आज दारिद्र्यभूमी झाली आहे; विद्येचे माहेरघर म्हणून शोभणारी ही भव्य व स्तव्य भूमि आज अज्ञानांत गुरफटली आहे, व्यापारांत एके काळीं अग्रेसर असणारी ही भूमि आज हतव्यापार झाली आहे, कलाविलासानें फलणारी ही भूमि आज कलाहीन झाली आहे; ज्या थोर भारतानें जगांतील नाना दिशांतून येणार्या भुकेकंगालांस पोटभर प्रेमानें सदैव सत्वास जागून जेऊं खाऊं घातलें, त्याच भारताच्या संतानांना आज अन्नान्नदशा प्राप्त झाली आहे. मग अशा परिस्थितींत प्रत्येक व्यक्तीचें कर्तव्य काय हें सांगावयास पाहिजे काय ?
आपापल्या शक्तीनुसार व आवडीनुसार प्रत्येक व्यक्तींने देशसेवा करण्याची प्रतिज्ञा करावी. आपण सर्वजण देशासाठी सर्वस्वाचा स्वाहाकार करणारे देशबंधु दास वा महात्माजी होणें शक्य नाहीं; देशाची कीर्ति आपल्या काव्यपरिमलानें दशदिशांत पसरविणारें कविवर रवींद्रनाथ आपणांस होतां येणार नाहीं; अपूर्व शास्त्रीय शोध लावून भारतभूमीचा मानमुखेंदु फुलविणारे जगदीशचंद्र आपण होणें सुतरां कठीण आहे; तरी पण फूल ना फूलाची पाकळी म्हणून प्रत्येकानें कांही तरी केलेंच पाहिजे. कर्तव्य हें कोणाहि व्यक्तीस सुटलें नाहीं. तें सर्वांना बंधनकारक आहे. तुम्ही विद्वान् असा, अविद्वान् असा; व्यापारी असा, भिकारी असा; शेतकरी असा, शिक्षक असा; तुम्हांस स्वदेशभक्तीचें कर्तव्य करण्यावाचून गत्यंतर नाहीं. भीक मागणारे झालांत तरी देशभक्तांचे पोवाडे रस्त्यांतून गात भीक मागा, तुकोबाचे अभंग म्हणून, समर्थांचे श्लोक ठणठणीतपणें म्हणून स्वधर्माची जाणीव करुन द्या; व्यापारी झालांत तर मिळणार्या धनाच्या राशी दीन देशासाठीं देण्यास तयार व्हा; शिक्षक झालांत तर विद्यार्थ्यांच्या मनांत देशभक्तीचें सद्बीज पेरा; विद्वान् असाल तर विचारपूरित ग्रंथरचना करुन जगाच्या ज्ञानांत भर घाला व देशाचा गौरव वाढवा, विद्यार्थी असाल तर देशाबद्दल प्रेम मनांत बाळगण्यास व तें दिवसेंदिवस वाढविण्यास व कृतींत आणण्यास शिका.
मी स्वभाषेचा अभिमान धरीन वाङ्मयास उत्तेजन देईल, मी स्वधर्माचा अभिमान धरीन, मी स्वदेशीच वस्तु शक्य तों वापरीत जाईन अशा प्रतिज्ञा विद्यार्थ्यांस करतां येण्यासारख्या आहेत. शाळा कॉलेजांतील सर्व विद्यार्थी एका विचारानें भरलेले झाले; तर ती एक शक्ति आहे.
वरील गोष्टी करतांना थोडा फार खिशास चट्टा बसेल; परन्तु आपले इतर शेंकडों खर्च कमी करुन आपणांस वरील गोष्टी करतां येणें शक्य आहे. तुम्ही जर असें न कराल तर तुमच्या शिकण्याचा काय उपयोग ? शिकून जास्त सुखलोलुप, जास्त कर्तव्यपराङ्मुख, जास्त देशद्रोही, जास्त स्वभाषाद्वेषी जर तुम्ही होणार असाल, तर आग लागो तुमच्या शिकण्याला ! तुम्ही शिकावयास शिकागोस जा, किंवा बर्लिंनला जा, विलायतेंत जा, जपानांत जा; कोठें त्रिखंडांत, पाताळांत जा; परंतु तुमचे सर्व उद्योग या दीन भूमीस मोठेपणा प्राप्त करुन देण्यासाठीं म्हणून होवोत. भगीरथाप्रमाणें भीमप्रयत्न करा व देशोध्दराची पावन गंगा, सौभाग्यदायिनी मंदाकिनी पुन्हां या भूमीवर आणून सोडा.