ही जागृति तेथें कोणी आणली ? विधायक सेवेनें विधायक सेवा मनुष्य करीत राहिला कीं, त्याचा अनेकांशीं जिव्हाळ्याचा संबंध जडतो. सेवेनें हृदयांत शिरतां येतें. शिकवूं लागलां तर स्त्रीपुरुषांचा संबंध येतो. गांवसफाई करतां करतां जनतेचीं मनें स्वच्छ करतां येतात. कातणें शिकवितां शिकवितां शिकवितां तेजस्वी विचार देतां येतात. एक व्याख्यान देऊन थोडा वेळ बुडबुडे निर्माण करुन आपण जातों. परंतु पाठीमागून काय ? सारखा संबंध येत गेल्याशिवाय संघटना उभी रहात नाहीं. आणि बाह्य संबंधावर संघटना उभी करतां येत नाहीं; तर ते आंतरिक संबंध हवेत.

उद्यां खिरोद्याचे दादासाहेब उठले म्हणजे तेथील २॥ हजार जनता उठेल. आसपासची हजारों जनता उठेल. दादासाहेब म्हणजे आतां एक व्यक्ति नाहीं. दादासाहेब म्हणजे दहा हजार आजूबाजूची पेटलेली जनता. दादासाहेबांप्रमाणें आणखी चार दादासाहेब जर खानदेशांत असे बसते तर ३० हजार सेना उभी राहिली असती.

दादासाहेबांचें कर्तृत्व सर्वांतच असेल असें नाहीं. जनतेच्या हृदयांत शिरणें सर्वांना दिलेलें नाहीं. तरीपण मीहि एखाद्या गांवी बसलों असतों तर ? विनोबाजींनी एका गांवी मला बसविलें होतें. परंतु आपणांस कांहींहि करतां येणार नाहीं अशा निराशेनें मी तें गांव सोडून अकस्मात् निघून गेलों. मी माझ्या परी कांहीतरी करीत असतों. वर्तमानपत्र चालवितों. फावल्या वेळीं किसानांत, कामगारांत, विद्यार्थ्यांत जातों. परंतु जिव्हाळ्याचे संबंध जोडतां आले का ? उद्यां मी गिरफदार होतांच शंभर लोक उभे राहतील का ? हे शंभर लोक माझे असें मला म्हणतां येईल काय ?

मला म्हणतां येणार नाहीं. तुम्ही किती प्रचार केलात, किती लोकांस ऐकवलेंत हा महत्वाचा प्रश्न नसून किती लोक आपलेसे केलेत ? तुम्ही म्हणजे किती लोक ? आपणाभोवतीं वर्तुळ निर्मिलें पाहिजे. माझ्या भोंवतीं १० चें वर्तुळ. त्या दहांपैकीं पुन्हां प्रत्येकाचें वर्तुळ. असें करीत गेलें पाहिजे महा-पुरुषांचें सर्वांत मोठें वर्तुळ. आकाशांत जशा अनंत ग्रहमाला असतात तसेंच हें आहे. चंद्रानें पृथ्वीभोंवतीं फिरावें. पृथ्वीनें सूर्याभोवतीं फिरावें.

पुष्कळ शिक्षक म्हणतात, “आमचे हाताखालून आजपर्यंत हजारों विद्यार्थी गेले.” हाताखालून गेले, परन्तु हातांत एखादा सांपडला का ? किती विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला ? तुम्ही मेलेत तर किती विद्यार्थी क्षणभर तरी खिन्न होतील, दोन मुके अश्रु ढाळतील ? विद्यार्थी व शिक्षक यांच्यांत असे संबंध येत नाहींत, तसे यावे असें कोणास वाटत नाहीं.

कार्यकर्त्यांचेहि तसेंच. जो तो म्हणतो मी ५०० सभांतून बोलून आलों. बोलून आलास, परंतु हृदय जोडून आलास का ? हृदयें जुळवायला वेळ लागतो. तें क्षणाचें काम नसतें. कांही महान् व्यक्ति ज्यांनी आजपर्यंत सेवा केली, त्यांनी विचार पेरीतच गेलें पाहिजे. त्यांनी मेघाप्रमाणें गडगडाट करुन जलधारा ओतीत गेलें पाहिजे. निवडणुकीच्या वेळेत जवाहिरलाल हिमालयापासून रामेश्वरपर्यंत, द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यन्त हिंडले; त्यांनीं वर्षाव केला. परंतु आम्ही गांवोगांव सेवा करीत राहून जमीन भुसभुशीत केलेली नसेल तर त्या जीवनदायी पाण्याचा काय उपयोग ? पीक येणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel