वर्‍हाडांतील कारंजा येथें एक वाणी इतका श्रीमंत होता कीं, त्यानें घराच्यासाठीं जो चिखल करावा लागे त्यांत कस्तुरीचीं पोतीं टाकवलीं होतीं. असें सांगतात कीं, अद्याप त्या भिंतींना वास येतो.

अशी संपत्ति हिंदुस्थानांत ठायीं ठायीं होती. नादिरशहा, तैमूरशहा यांनी सतरांदा नेली-तरी परवांपर्यंत होती. परंतु इंग्लिशांनीं लाखों जळवा लावल्या आहेत. पूर्वीच्या सर्व बाहेरच्या मुसलमान लुटारुंनी जी संपत्ति नेली तिची एकंदर किंमत तीनशे कोटींहून जास्त होणार नाही. परंतु आमचा व्यापार मारुन नुसती एक कापडाचीच जळूं जी इंग्रजांनी लावली आहे, ती दरवर्षी साठ कोठी रुपये नेते ! गेल्या चाळीस वर्षात इंग्रजांनी नुसते कापडाच्या रुपानें एक हजार कोटी रुपये नेले ! नादिरशहा एकदांच आला व मेला ! पण हा मँचेस्टरचा कापडशहा दरवर्षी साठ कोटींची लूट नेत आहे. हा एक कापडशहाचा धिंगाणा ! लोखंडशहा, साखरशहा, कागदशहा, सायकल मोटारशहा, कांचशहा-असे किती तरी सतत लुटणारे शहा लुटीत आहेत. हिंदुस्थानास लागलेली ही प्रचंड गळती कधीं व कशी थांबणार ? आम्ही भर घालणार दोन शेरांची व दोनशें शेर गळून जाणार ! हरहर ! तरी इंग्रज म्हणतात आम्ही हिंदुस्थानचें हितच करीत आहोत !


तृणाची थोरवी
अमेरिकेत वॉल्ट व्हिट्मन् म्हणून एक उच्च दर्जाचा व स्वतंत्र प्रतिभेचा कवि गेल्या शतकांत होऊन गेला. त्यानें आपल्या काव्यसंग्रहास Leaves of the grass- तृणपर्णें हें साधें नांव दिलें आहे.

वॉल्ट व्हिटमन् यानें आपल्या सुंदर व स्फूर्तिदायक कवितांस तृणपर्णें हें साधें नांव का बरें दिलें ? एक दिवस मी पहाटे उठलों व मला वॉल्ट व्हिटमनच्या काव्याची आठवण झाली व त्या नांवाचा मी विचार करुं लागलों. तृणासंबंधी मी विचार करुं लागलों तों तों माझी मति गुंग होऊन गेली. लहानसें तृण परंतु महिमा थोर आहे असें मला दिसून येऊ लागलें. वॉल्ट व्हिटमननें स्वत:च्या काव्यास तृणपर्णें हें नांव कां दिलें तें समजून आलें.

तृण-गवत-किती लहान व चिमुकलें-तरीपण त्याचा महिमा फार मोठा आहे. तृण हें सर्व विश्वास गुरुस्थानीं शोभण्यासारखें आहे. वर्षाॠतूस प्रारंभ झाला म्हणजे जेथें पूर्वी कांहींहि दिसत नव्हतें, जेथें रखरखीत व उजाड भासत होतें, ज्या जमिनीवर दृष्टि फेंकली असतां, ज्या पर्वतशिखरांकडे दृष्टि फेंकली असतां रखरखीतपणामुळें दिपवल्यासारखें होई, तीच भूमि, तेच पर्वत, तींच डोंगराची अंगे प्रत्यंगे किती सुंदर व रमणीय दिसूं लागतात ! डोळ्यांस संतोषदायक अशी हिरवी नव्या नवाळीची मृदु लव सर्वत्र दिसूं लागते. कोठेंहि चौफेर दृष्टि फेंका. जेथें म्हणून जागा असेल तेथें तेथें हें तृण सर्वत्र उगवलेलें असतें. घराच्या कौलावर, दगडांच्या अंगावर, वृक्षांच्या स्कंधावर, वरसुध्दां गवत उगवलेलें दिसेल. या तृणास उगवण्यासाठीं वाटेल तें ठिकाण चालेल. वाटेल त्या ठिकाणीं तें आपली सोय करुन घेतें. अमुकच ठिकाणीं मी वाढेन असें त्याला वाटत नाहीं. परिस्थितीचा प्रतिबंध तृणाला कधींच नसतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel