तुम्ही या नवीन पध्दतीचा धिक्कार केला नाहीं, मला आनंद होतो. तुम्ही पगारासाठीं भांडा तुमचा हक्क आहे. कामगार भांडत आहेत, किसान झगडत आहेत, तुम्हीही झगडा. परन्तु देशाची परिस्थिति पाहून मागा. तुम्हीं इतर देशांशी शिक्षकांचे पगार मांडले आहेत. परन्तु इतर देशांत उत्पन्नहि रोजीं तीन रुपये आहे. जर्मनींतील मजूर रोजीं ३। रुपये मिळवितो. आपल्या देशांतील सरासरी उत्पन्न रोजीं १॥ आणा आहे. याचा अर्थ तुम्हांला पगारवाढ नको असें मी म्हणत नाहीं. पण मर्यादा लक्षांत ठेवा. पगारावरुन लायकी ठरवूं नका. तलाठी, शिपाई, फॉरेस्टगार्ड यापेक्षां का आम्ही हलके ? तुम्ही कोणीहि हलके नाहीं. कामगार, शेतकरी, शिक्षक सारे पवित्रच. कोणी कोणतेंहि सेवाकर्म करो. पगाराचें वास्तविक प्रमाण जरुरी हें आहे. ‘लायकीप्रमाणें काम जरुरीपुरता दाम.’  ज्याला जें काम करतां येईल तें त्याला दिलें पाहिजे. ज्याला जरुर तेवढा पगार मिळाला पाहिजे. कलेक्टरला एकच मूल असेल तर त्याला ३० रुपये पगार पुरे. तो अधिक शिकलेला म्हणून अधिक सत्ता द्या. परन्तु पगार अधिक कशाला ? कारकुनास ४ मुलें असतील तर त्यास ७५ रु. पगार द्या. हे तत्व जगांत कधीं अंमलांत येईल तें खरें. तुम्ही तुमचे पगार अधिक करुन मागत आहांत त्याबरोबर बडे पगार कमी करा अशीहि मागणी हवी. कां. च्या हातीं थोडाफार अधिकार येतांच सर्वांना आपापले संसार सुधारावेत असें वाटूं लागलें. परन्तु फार थोडी सत्ता हातीं आहे. बड्यांचे पगार कमी करतां येत नाहींत. आर्थिक सत्ता आपल्या हातीं नाहीं. काँग्रेस काय करणार ? काँग्रेसजवळ ही शक्ति नसेल तर पुन: लढा होईल त्यांत आम्ही पडूं. काँग्रेसजवळ सर्व गार्‍हाणीं येतात. परन्तु काँग्रेसबद्दल सहानुभूति कितीकांस होती? आम्हांस मागें निवडणुकींत असा अनुभव आला कीं बरेचसे शिक्षक काँग्रेसच्या उमेदवारांविरुध्द गांवांत प्रचार करावयाचे, कारण बोर्डें काँग्रेसद्रोही होतीं. तेव्हां पुन: असें न होवो. आतां तरी काँग्रेसप्रेम वाढवा. पगार वाढत नाहीं याचें दु:ख वाटूं दे. परन्तु मुलांत देशभक्ति उत्पन्न करतां येईल, याचा तुम्हांस आनंद वाटूं दे. तुमचा आत्मा काँग्रेसनें मोकळा केला आहे. तुमची वाणी मुक्त केली आहे. आज देशभक्तांची चित्रें शाळेंत लावूं शकाल, स्वातंत्र्यदिन करुं शकाल ! हा केवढा लाभ ! परन्तु या लाभाबद्दल किती शिक्षकांची हृदयें उचंबळलीं ? मुलांना वंदे मातरम् शिकवितां येईल. ‘झेंडा उंचा रहे हमारा’ हें शिकवितां येईल. म्हणून किती शिक्षक नाचले ? पगारासाठीं उभे रहा; परन्तु या गोष्टीसाठींहि नाचा. मी एकदा लिहिलें होतें, ‘काँग्रेसनें बोर्डे जिंकल्यामुळे स्वातंत्र्यदिन, गांधीदिन सर्व शाळांत उत्साहानें साजरे झाले, यांत बोर्डाची सफलता झाली.” इतर कांहींहि होवो न होवो, १५० वर्षे तुम्हांला तुमच्या देशाचें नांव उच्चारतां येत नव्हतें. ती स्थिती आज बदलली आहे. याचा आनंद तुमच्या तोंडावर दिसला पाहिजे. प्राचीन कांळी खेड्यांतील शिक्षक दिवसा मुलांस शिकवी, रात्रीं मोठ्यांस शिकवी; रात्रीं पांडवप्रताप, रामविजय वाचून दाखवी. गांवांतील भांडणे मिटवी. शिक्षक हा खेड्यांतील संस्कृतिसंरक्षक व संस्कृतिवर्धक आहे. तुम्हीं आजहि हे विसरतां कामा नये. तुम्हीं रात्री सद्विचारांची पुस्तकें वाचून दाखवा. कां. चा इतिहास वाचून दाखवा. शाळेबाहेर लोकांमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत करा. तुम्हीं खेड्यांतील स्वातंत्र्याचे प्रचारक व्हा. कां. चे सभासद करतां येईल. जिल्ह्यांत दीडदोन हजार शिक्षक आहेत. प्रत्येकानें दहापांच लोकांस काँग्रेसचें महत्व पटवून जर सभासद होण्यास सांगितलें तर जिल्ह्यांत २०/२५ हजार कां. सभासद शिक्षकच करतील. परन्तु ही दृष्टी हवी, स्वातंत्र्याची तहान हवी. तुम्ही कराल का ? प्रत्येक गांवांत एकेक बिभीषण पाहिजे म्हणजे रामाचें काम होईल. रावणी राज्य दूर होईल. काँग्रेसकमिट्यांजवळ पैसे नाहींत. प्रचारक नाहींत. तुम्हीच काँग्रेसचे प्रचारक, “अहो, येतां जातां उठत बसतां” कां. नाम घ्या. हेंच आपलें आजचें रामनाम जीवनांत राम आणीत आहे. राष्ट्राची मान उंच करीत आहे. पण कां. सभासद करणें हेंच मुख्य काम नाही. तुम्हां शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हीं मुलांत ऐक्य निर्माण करा. हिंदु-मुसलमान, स्पृश्यापृश्य मुलें एकत्र नांदवा. त्यांच्यांत भेद नका पाडूं. राष्ट्रांत भेदाचें भिनलेलें विष काढून टाकणारे तुम्हीं पंचाक्षरी महान मांत्रिक बना. मुलांत जातिभेद पाडणारा शिक्षक दिसला म्हणजे मला वेदना होतात. लहान मुलांच्या मनांत आज जातीय विषें आणखीच भरविण्यांत येत आहेत. शिक्षक तरी असें न करो. जास्तींत जास्त उदार विचारांचा शिक्षक लहान मुलाजवळ हवा. शत्रुपक्षाकडचा मुलगा संजीवनी विद्या शिकावयास आला तर शुक्राचार्य रागावले नाहींत. त्यांनी त्याला पोटाशी धरलें. शुक्राचार्य राक्षसांचे नव्हते; कच देवांत नव्हता. तेथें ते फक्त ‘गुरुशिष्य’ होते. खानदेशांतील एका हायस्कूलमध्यें सम्मेलनाच्या वेळेस सर्वांनीं एकत्र जेवावें कीं नाहीं हा वाद निघाला. बिचारे,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel