गांधीटोपी
“मूर्ति लहान पण कीर्ति थोर” असा गांधी टोपीचा पराक्रम आहे. तिची योग्यता तिच्या किंमतीवरुन ठरवितां येणार नाहीं. गांधी टोपी कोणत्या ध्येयाची आणि कार्याची निदर्शक आहे हें पाहिले म्हणजे तिची योग्यता फार मोठी आहे हे सहज दिसून येईल.
वस्तुत: पोषाखाला काय महत्व आहे ? प्रत्येकानें आपल्या ऐपतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे पोषाख केला तर त्यांत कोणाचें कांही बिघडत नाहीं. त्या पोषाखाला विशिष्ट अर्थ प्राप्त व्हावा किंवा तो विशिष्ट भावनांचा आणि कल्पनांचा द्योतक मानला जावा असें म्हणतां येत नाहीं. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र तशी आहे. निरनिराळ्या राष्ट्राचे पोषाख ठरलेले आहेत. प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रीय पोषाख असतो आणि त्यावरुन एकादा माणूस कोणत्या राष्ट्रांतील आहे हे ओळखता येतें. जगांतील प्रत्येक रहिवासी आपला राष्ट्रीय पोषाख घालून एकत्र जमले तर त्यात बोटभर लंगोटीने काम भागविणार्या पासून नशशिखांत रंगीबेरंगी आणि उंची वस्त्रांनी शरीर सुशोभित करणारे लोक सांपडतील आणि तो देखावा अतिशय नयनमनोहर आणि आकर्षक होईल !
आपला देश घेतला तरी त्यांत पोषाखामध्यें विविधता आणि विचित्रता काय कमी आढळते ? बंगाली, पंजाबी, गुजराथी, मराठी, मद्रासी इत्यादि भिन्नभिन्न प्रांतांतील लोक त्यांच्या पोषाखावरुन सहज ओळखतां येतात. एकाद्या सभेंत अनेक धर्माचे आणि पंथांचे लोक एकत्र आले असतां हिंदू कोण, पार्शी कोण, मुसलमान कोण, हें जाणण्याची पंचाईत पडत नाहीं. पारशांची उभी टोपी, मुसलमानांची गोंड्याची लाल टोपी आणि हिंदूंची निरनिराळी शिरोभूषणें ही तेव्हांच डोळ्यांत भरतात. एका प्रांतातल्या सगळ्या हिंदूंचा पोषाख तरी कोठें सारखा असतों ? प्रत्येक जातीचा पोषाख निराळा असावा असें ठरुनच गेलें आहे ! ब्राह्मणांची पगडी आणि पाटलाचें पागोटें किंवा शालू यांची अदलाबदल कधींहि होणार नाहीं.
पोषाखांतील वैचित्र्य हे मुळांत वाईट नाहीं. उलट त्या योगानें प्रत्येकाला आपली अभिरुचि दाखवावयास वाव मिळतो. परंतु भिन्न पोषाखाच्या योगानें निराळेपणाची भावना उत्पन्न होत असेल किंवा आधींच असलेली भावना पक्की होत असेल तर सर्व लोकांचा एकसारखा पोषाख होणें ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपल्यामध्यें राष्ट्रीय भावना जागृत नाहीं. म्हणून आपला राष्ट्रीय पोषाखहि ठरलेला नाहीं. जो उठतो तो प्रथम मी हिंदू आहे, मी मुसलमान आहें, पारशी आहें, इतकेंच नव्हे तर यापुढें जाऊन मी ब्राह्मण आहे, मराठा आहें असा विचार मनांत आणतो, आणि मग कोणता पोषाख घालावयाचा हें ठरवितो. या योगानें दुहेरी नुकसान होतें. आरंभी मनांत भेद असतो म्हणून पोषाख निराळा होतो आणि पोषाख भिन्न असल्यामुळें ही निराळेपणाची भावना अधिकच वृध्दिंगत होते.