मराठी साहित्यसंमेलन
मराठी साहित्याच्या उन्नतीकरितां दरवर्षी संमेलनें भरतात, पण मराठी साहित्य तेव्हां सजीव व समृध्द होईल जेव्हां तें जनतेसाठीं निर्माण होऊं लागेल. संस्कृतांत सर्व ज्ञानभांडार लपलेलें पाहून ज्ञानराजांस वाईट वाटलें. त्यांनी संस्कृतांतील ज्ञान मराठींत आणलें. घरोघर ज्ञानाचा सुकाळ व्हावा म्हणून त्यांनीं अमृतमय रचना केली. तुकाराम मराठींतून वेदान्त सांगतात म्हणून पंडित रागावत. एकनाथांचें भागवत गंगेंत फेंकण्यापर्यंत पाळी गेली. हे सर्व प्राचीन मराठी सेवक मराठी मायबोलीसाठीं झगडले. ते बंडखोर होते. संस्कृत देवानें निर्मिली आणि मराठी का चोरांनी निर्मिली ? असे रोखठोख सवाल त्यांनी अहंमन्य पंडितांस विचारले. पैशाच्या भांडवलशाहीपेक्षांहि ही ज्ञानाची भांडवलशाही अधिक मारक असते. विचार जर घरोघर गेले नाहींत तर कसें होणार?

संतांनी जनतेच्या कळवळ्यानें लिहिलें म्हणून ते जनतेंत जाऊन बसले. मराठींतील राष्ट्रीय ग्रंथ कोणते असा प्रश्न केला तर ज्ञानेश्वरी, नाथांचे व तुकोबांचे अभंग, मनाचे श्लोक, मुक्ताबाई जनाबाईचे अभंग, श्रीधर व महिपती यांचे ग्रंथ असें उत्तर दिलें पाहिजे. जे ग्रंथ गांवोगांव आहेत, रोज वाचले जातात तेच खरे राष्ट्रीय ग्रंथ  जनतेच्या जीवनांत जे ग्रंथ अजून ओलावा निर्मीत आहेत तेच खरे थोर.

अर्वाचीन मराठी साहित्यांतील असें कोणतें पुस्तक हजारों खेड्यांतून गेलें ? आमचें सारें साहित्य शहरी असतें. शहरांतील कांहीं सुशिक्षितांसाठी असतें. पुस्तकाच्या हजार प्रती खपल्या म्हणजे डोक्यावरुन पाणी गेलें असें वाटतें. पुस्तकें कां खपत नाहींत ? लोकांत दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, पुस्तकें महाग आहेत, तीं समजायला जड जातात; जनतेच्या जीवनाशीं त्यांचा संबंध नसतो; खपविण्याचीही नीट व्यवस्था नसते;  प्रामाणिक पुस्तकें खपविणारे मिळत नाहींत. अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळें मराठी साहित्य समृध्द होत नाहीं.

रशियन साहित्यकार थोर टॉलस्टॉय म्हणत असे कीं, “जगांतील सर्व थोर पुस्तकांचे सारांश लहान पुस्तकांत यावे असें मला वाटतें. दोन दोन आण्यांचीं पुस्तकें. शेतकर्‍यांजवळ अधिक पैसे आहेत कोठें ?” शेतकर्‍याला दोन आण्यांत पुस्तक मिळालें पाहिजे. पुन्हां तें जीवन समृध्द करणारें व सोपें व सहृदय असलें पाहिजे. परंतु पुस्तकाच्या २०/२५ हजार प्रती खपतील तरच तें दोन आण्यांत देतां येईल. १०० पानांचें पुस्तक मग दोन आण्यांत देणें शक्य होईल. शंभर पानांचे पुस्तकास दोन आणे असा मराठी मायबोलीचा कायदा झाला पाहिजे. परंतु आम्ही पैशासाठी लिहितों. मराठी भाषा समृध्द करणार्‍या प्राचीन वागीश्वरांनीं पैशासाठीं लिहिलें नाहीं. लेखणीनें पैसे मिळविणें पाप असें त्यांना वाटे. आजहि हीच वृत्ति आमची व्हावयास हवी आहे. पोटासाठीं दुसरा प्रामाणिक उद्योग करा. आणि अनुभव जनतेस दिल्यावांचून राहवत नाहीं म्हणून लिहा. आईच्या पोटांत कळा लागतात, तेव्हांच ती बालक जगासमोर आणते, तोपर्यंत तें बाळ ती पोटांत लपवते. साहित्य पोटांत लपलेलें असू दे. ज्या वेळेस तुम्हांला राहवणार नाहीं, तेव्हां तें बाहेर पडूं दे. “मी एक मूल जगाला दिलें, त्याची इतकी मजुरी मला द्या” असें माता म्हणत नाहीं. ती आपलें बाळ विक्रीसाठीं देणार नाहीं. सर्वांनीं बाळ घ्यावें असें तिला वाटते. परंतु त्याचे पैसे ती घेणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel