कांही रुढिप्रिय सनातनींनीं मंदिराच्या अधिकार्‍यांवर ही सुधारणा करण्याबद्दल फिर्यादी केल्या. परंतु एक वटहुकूम काढून अशा लोकांवर दिवाणी व फौजदारी काम चालूं शकत नाहीं असें माणुसकीला मानणार्‍या मद्रास काँग्रेस सरकारनें जाहीर केलें.

८ जुलैला मीनाक्षीचें महान मंदिर उघडल्यावर सर्व तामीळनाड प्रांतभर प्रचंड चालना मिळाली. तटाला मोठें खिंडार पडलें कीं, किल्ला लगेच ताब्यांत येतो. झंझावातासारखी मोहीम सुरु झाली. आणि देवळापाठीमागून देवळें खुली होऊ लागलीं. मीनाक्षीच्या मंदिरासारखेंच तंजावरचें १ हजार वर्षापूर्वी बांधलेले भव्य ‘बृहदीश्वर’ मंदिरहि इतर ८९ मंदिरांसह खुलें झालें.

दक्षिण हिंदुस्थान सनातनतत्वाचें माहेरघर मानलें जातें. परंतु तेथेंच ही प्रचंड क्रांति होत आहे. मीनाक्षीचे मंदिर खुलें झाल्यावर १० जुलैला मद्रासला झालेल्या सभेंत पंतप्रधान राजगोपालचारी म्हणाले, “मदुरेची ही महत्वाची गोष्ट मी ऐकली व माझा आनंद गगनांत मावेना. मी आनंदानें वेडा झालो, देहभान विसरलों. त्या दिवशीं मला झोंप येईना, कशात लक्ष लागेना. त्या आनंदानें जणूं मी मस्त झालों होतों. ती बातमी इतकी चांगली होती कीं ती खरी असेल असा विश्वासच वाटेना. वर्तमानपत्रांतील ती बातमी मी पुन:पुन्हां वाचली. अनेक मित्रांना विचारलें. शेवटी खात्री झाली कीं मंगलमय गोष्ट खरोखर झाली; खरोखर ही अद्भूत अशी गोष्ट घडून आली.” दुसर्‍या एका सभेंत ते म्हणाले, “मीनाक्षीचें मंदिर हरिजनांना मोकळे झालें. या अद्भूत गोष्टीशीं तुलना करतां येईल अशी दुसरी एकहि गोष्ट मला आढळत नाहीं.”

मद्रासकडे असें क्रांतिकारक वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रांत काय आहे ? ज्या महाराष्ट्रांत संतांनी प्रेमधर्माचा पाऊस पाडला, तेथील लोक कां अजून निष्ठुर ? खानदेशांत निरनिराळ्या गांवी हरिजनांवर जे अत्याचार झाले ते ऐकले म्हणजे वाईट वाटतें. हरिजनांनी पाणी भरलें म्हणून कोणी त्याच्यावर बहिष्कार घातले. कोठें सुखी हरिजन असला तर त्याला छळलें. हीं पापें कोठें फेडणार?

अमळनेरला पूर्व खानदेशांतील स्वतंत्र मजूर पक्षाचे हरिजन आमदार श्री. जाधव आले होते. ते म्हणाले, ”आम्हीं काय करावें? आम्हीं आतां मेलें पाहिजे. जगणें असह्य झालें आहे. आम्हीं आतां जिवावर उदार झालों आहोंत.” त्यांना मी काय सांगणार ? आम्हांला कोठें तोंड आहे ? खरा धर्म केव्हां येणार ? हरिजनांना साधे माणुसकीचे हक्क आम्ही द्यावयास तयार नाहीं ? अरे रे!

गांवोगांवच्या बंधुभगिनींनो, हरिजन तुमचेच आहेत. सारी मानवेतर सृष्टीहि घरांत घेतां. हरिजनांना कां दूर ठेवतां ? त्यांना देवाजवळ जाऊं दे, विहिरीवर येऊं दे, ओटीवर बसूं दे. त्यांचा अपमान नका करुं. त्यांचा अपमान कराल तोपर्यंत दुनियेंत तुमचाहि अपमान होणार आहे. आज जगात आपणांस पैची किंमत नाहीं. कारण आपणच आपल्या भावाबहिणींची पै किंमत केली. अत:पर तरी हृदयें प्रेमानें भरुं या. खेटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भेद नाहीसें करुं. ‘जाळिन मी भेद ।  येथें प्रमाण तो वेद’ असें श्री तुकाराम महाराज गर्जून सांगतात. वर्णाश्रम धर्म म्हणजे ज्याला समाजाचे जे काम करता येईल ते त्याने करावे. वर्णाश्रम धर्म म्हणजे शिंवू नको धर्म नव्हे. हरिजनांचा अंत पाहूं नका. हजारों वर्षे त्यांनी कळ सोसली. अत:पर एक क्षणहि युगासारखें आहे. महाराष्ट्र मोठ्या मनाचा होवो व ही अस्पृश्यता मातींत जावो.
--वर्ष २, अंक २.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel