अश्रध्दा व भीति
निर्भय मनुष्यास सर्वत्र आनंद आहे, मनुष्य विनाकारण अनेक गोष्टींस भीत असतो, परंतु भित्या पाठीमागें ब्रह्मराक्षस ही म्हण आपणांस माहीत आहेच. जो भित्रा आहे, भ्याड आहे, त्याच्या डोक्यावर सर्व जग बसेल, वाटेल तो त्याला दरडावील. संशयामुळें साशंकामुळें, आपणांस कर्तबगार होतां येत नाहीं. काय होईल काय नाहीं ही धागधुग बागबुग सारखी भित्या माणसाच्या मनांत चाललेली असते. ज्या गोष्टीबद्दल संशय व भीति एकदां आपल्या मनांत शिरली ती गोष्ट करावयास आपले हातपाय धजत नाहींत. जी गोष्ट आपण सहज केली असती व यश मिळविलें असतें, त्या यशास त्या संशयभीतीमुळें आपण गमावून बसतों.
तुम्ही रोगाला भ्यालां की जडलाच तो तुम्हांस. बसलाच समजा तुमच्या बोकांडी. दारिद्रयाला भ्यालां कीं पछाडलेंच त्यानें. कुत्र्याला भ्यालांत तर आलेंच भुंकत अंगावर. मृत्यूला भ्यालां कीं गांठलेंच त्या यमाजी भास्कराच्या दूतांनीं. सरकारला भ्यालांत कीं बसलेंच तें उरावर. भुताला भ्यालांत कीं वळली बोबडी, बसली दांतखिळी.
जर कोणतीहि गोष्ट अनिष्ट होऊं नये असें तुम्हांस वाटत असेल, तर तुम्ही कशालाहि भिऊं नका. फ्रेंच भाषेंत पुढील अर्थांचे एक वचन आहे. “तुम्हांस दुखणींबाणीं, मोठी संकटें, आणीबाणीचे प्रसंग वगैरेस तोंड द्यावें लागलें असेल व त्या सर्वांतून सहीसलामत तुम्ही पारहि पडलां असाल; परन्तु या दुखण्यांनीं वगैरे जो तुम्हांस त्रास झाला असेल; त्याच्यापेक्षां शतपटीनें अधिक खोट्या भीतीमुळें आणि रिकाम्या चिंतेमुळें तुम्हांस भोगावा लागला हें लक्षांत धरा.” किती यथार्थ हें वाक्य आहे.
ज्या मनांत भीति आहे तेथें श्रध्दा नसावयाची, आणि श्रध्दा नसली कीं सत्यानाश ठेवलेलाच. श्रध्दा व भीति ह्यांचे हाडवैर आहे. दुष्ट मनोविकार हे जसे घातक शत्रु आहेत, त्याप्रमाणें भय हाहि एक आपला मोठा शत्रु आहे. प्रत्येकानें आपल्या मनांत निर्भय व्हावें. स्वामी श्रध्दानंद हे गुरुकुलांतील तरुणांस निर्भयतेचे प्रथम धडे देत. ते म्हणत, कोणा सोजिरानें तुम्हांस मारलें, तुम्ही त्याला बदडा; मग मी पाहून घेईन काय होईल तें.
गुरुकुलांत एकादा भित्रा मुलगा आला तर ते त्याची भीति पुढील उपायानें दवडीत. त्या भित्र्या मुलास श्रध्दानंद रात्रीं काळोखाच्या वेळीं कोठें तरी रानांत जंगलांत जाऊन येण्यास सांगत. गेलेंच पाहिजे ही शिस्त, तो मुलगा जाण्यास निघे. त्याच्या पाठोपाठ श्रध्दानंद सात आठ जणांस हळूच पाठवीत. तो भित्रा मुलगा वाघ येईल कीं काय, भूत येईल कीं काय या भीतीनें वाटेंत बेशुध्द होऊन पडे. पाठीमागून जाणारे त्यास उचलून आणीत व शुध्दीवर आणीत. असें दहाबारा वेळां झालें म्हणजे तो मुलगा शूराहून शूर होई. गुरुकुलातील मुलें दणगट, निर्भय व शूर होतात, वाघालासुध्दां मांजराप्रमाणें काठीनें हुसकून देतात, त्यांच्या पायाखालीं साप चिरडून जात असतात ! ही निर्भय वृत्ति आम्हांस पाहिजे आहे. नेल्सनप्रमाणें ‘आजी, भीति म्हणजे ग काय’. असें विचारण्यास शिकलें पाहिजे. परन्तु लहानपणापासून मुलांस भीतीचें शिक्षण दिलें जातें. ‘रडूं नको हां बाऊ येईल; बाहेर नको जाऊं बागुलबोवा येईल; रात्र झाली हो, भूत येईल.’ अशा रीतींनें आपण मुलांची स्वाभाविक निर्भयता दूर करीत असतों. ज्या मनांत भीति शिरली, तेथें सर्व अनिष्टें पाठोपाठ आलींच आणि भीतीच्या ऐवजीं धैर्य व हिंमत, धीर व धाडस हीं आमच्या मनांत नांदावयास आलीं कीं, सर्व जगांतील इष्ट वस्तु आम्हांस प्राप्त होतील. निर्भय बना कीं तुम्ही जगाचे राजे आहात.