हिंदुस्थानची हलाखी
(कांही पाठ करण्याचे आंकडे)
मुलांनो, आपले व्हाइसराय साहेब यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका व्याख्यानांत सांगितलें, ‘हल्लींचा हिंदुस्थान हा ब्रिटिशांनीं निर्माण केलेला आहे. ब्रिटिश लोक निघून गेले, तर पुन्हां हिंदुस्थानला वाईट दिवस येतील.
परंतु पुढें दिलेल्या गोष्टीवरुन ब्रिटिशांनी बनवलेला हिंदुस्थान कसा कंगाल स्थितीप्रत गेलेला आहे हें दिसून येईल. गव्हर्नर जनरल यांस असा हीन दीन हिंदुस्थान निर्माण केल्याबद्दल मोठेपणा वाटत असला तर वाटो; परंतु आम्हांस तर मान खाली घालावीशी वाटते आणि निराशेचे कढत सुस्कारे सोडण्यापलीकडे काहीं करता येत नाहीं.
मुलांनो, इंग्लंडमध्ये ऍडॅम स्मिथ म्हणून एक मोठा अर्थशास्त्रज्ञ १८ व्या शतकांत होऊन गेला. तो एके ठिकाणी म्हणतो, ‘राष्ट्राचा उत्कर्ष किंवा अपकर्ष हा मुख्यत: त्या देशांतील मृत्यूच्या प्रमाणांवरुन ठरविला जावा. ज्या देशांत आयुर्मर्यादा थोडी तो देश मागासलेला व खालावलेला समजावा. ऍडाम स्मिथप्रमाणेंच बर्क हाहि एक मोठा राजकीय तत्वज्ञानाचा पंडित इंग्लंडमध्ये १८ व्या शतकाच्या अखेरीस झाला. तो एके ठिकाणीं सांगतो, राष्ट्राची सुस्थिती अजमावण्याचीं मुख्य दोन चिन्हें आहेत. आयुर्मान आणि देशातील संपत्ति आणि ही दोन्ही अंगे जर नीट असतील तर त्या देशावरचा राज्यकारभार चांगलाच असला पाहिजे असें तो म्हणतो.
‘No country is which population flourishes can be under bad government.’ ज्या देशांतील जनतेची भरभराट होत आहे, तो देश वाईट राज्यकर्त्यांच्या हाताखालीं आहे असें म्हणतां येणार नाहीं. या वरील लक्षणांप्रमाणे आपण हिंदुस्थानकडे पाहूं या.
हिंदुस्थानांत मृत्यूचें प्रमाण फारच भयंकर ! हिंदुस्थानांतील मरणाची सरासरी काढली तर यमाचा केवढा खाटिकखाना येथें सुरु आहे हें पाहून अंगावर काटा उभा रहातो. प्रत्येक मिनिटास हिंदुस्थानांत २० मोठी माणसें व ४ लहान मुलें मरत आहेत. १८७७ पासून १९२७ पर्यंतच्या पन्नास वर्षांतील दुष्काळांत--हे दुष्काळ किती तरी पडले--२ कोटी ४२ लाख लोक मृत्युमुखीं पडले ! हिंदुस्थानांतील हा मरणाचा भीषण खेळ दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणांत आहे. १८९० मधील हिंदुस्थानांतील सरासरी आयुमर्यादा ३३.२ होती, ती या चाळीस वर्षात ३३.२ वरुन २२.५ वर येऊन ठेपली. ही सुधारणाच का ? इंग्लंडमध्यें एक हजारीं ११.८, अमेरिकेत ९.८, जपानांत १५.३, असें मृत्यूचें प्रमाण आहे. तर हिंदुस्थानांत तें २५.२ आहे ! अमेरिकेंतील सर्वसाधारण मनुष्य ५६.६ वर्षे जगतो, इंग्लंडमधील ५२ वर्षे, जपानांतील ४४ वर्षें, पण हिंदुस्थानांतील २२.५ वर्षे ! या स्थितीवरुन देशाच्या भरभराटीचें अनुमान करावयाचें का हलाखीचें करावयाचे हे सरकारने ठरवावें.