याप्रमाणें तूंसुध्दां जगास सुखी करण्यासाठीं पुन:पुन्हा अवतार घेतोस; रोज मरतोस व पुन्हां आनंदानें जन्मतोस. दुसर्याच्या उपयोगी पडावें एवढेंच तुला माहित आहे. यातच तुझे सुख, आनंद, यश सर्व कांही आहे. कोठेंहि जरा ओलावा मिळाला की पुरे; लगेच पायांनी तुडवलेला, उन्हानें करपलेला असा तूं हंसू लागतोस, डुलूं लागतोस. कोणी तुला उचलून फेकून देतील तर तेथेंहि योग्य परिस्थितीची तूं वाट पहात बसतोस. तूं जाशील तेथें स्वर्ग निर्माण करतो; ओसाड जागेस नंदनवन बनवतोस. सर्व उन्हाळ्यांत तूं मेल्यासारखा दिसतोस, जगाला कंटाळून गेला आहेस. मनुष्यांच्या, पशूंच्या लाथा खाऊन तूं उद्विग्न झाला आहेस, असें वाटतें. परंतु, बा तृणा ! केवढा तुझा उदारपणा व केवढी तुझी थोरवी ! तूं जगाच्या जाचास कंटाळत नाहींस; जगाचे आघात प्रत्यहीं सोसण्यास तूं सदा तयार. पुन्हां आकाश मेघमालेनें भरुन आलें, मोत्यासारख्या पावसाच्या सरी सुरु झाल्या कीं, तूं आपलें वैभव पुन्हां मिरवतोस. तूं संधि वायां दवडीत नाहींस. मोठा पाऊस न पडतां चारच शिंतोडे आले, तेहि न मिळतां चार दंवाचे बिंदूच मिळाले तर तेवढ्यानेंहि मोत्यांचे हार घालून तूं शोभतोस. आजूबाजूच्या दूरवरचाहि ओलावा तूं आपले चिमुकले हातपाय पसरुन आपलासा करतोस. तूं श्रीमंत होतोस, परंतु तुझी श्रीमंती देण्यासाठीं आहे. तूं भिकारीपणानेंच खरा शोभतोस, मरणानेंच खरा जगतोस. दुसर्यासाठीं तूं सदैव मरतोस म्हणूनच तूं अमर आहेस. तूं त्रेतायुगांत, सत्ययुगांत, द्वापारांत, कलींत सर्वदा आहेसच. या तुझ्या अमरत्वाचें साधन परोपकारितेंत आहे.
बा तृणा ! तूं लहानसहान किड्या मुंगीस किती जपतोस ! त्यांना स्वत:चें अंग खावयास देऊन त्यांचा रंगहि स्वत:च्या रंगासारखा करतोस ! या हिरव्या रंगाच्या किड्यांस तुझ्या हिरव्या प्रदेशांत लपतां येतें व ते शत्रूंपासून स्वसंरक्षण करुं शकतात. दुसर्यापासून या अनाथ किड्यांचें संरक्षण व्हावें म्हणून तूं त्यांना आत्मरुप करतोस. परंतु तूं ज्यांना प्रेमानें वाढवतोस, तूं ज्यांना आत्मरुप देतोस, त्यांनी जर कृतघ्नपणें तुझा त्याग केला तर ते कृतघ्न मरतात. टोळ, पतंग, नाकतोड्ये हे आपले तुझ्यापासून घेतलेलें हिरवें पाचूसारखें सौंदर्य जगास ऐटीनें दाखवावयास येतात ! या दुसर्या वैभवानें उन्मत्त ते होऊन दिव्याच्या प्रकाशांत नाचतात, मिरवतात, झेंपावतात व मरतात !
बा तृणा ! तूं तपोधनांची तपोभूमि आहेस, मृगांची आरामशय्या आहेस, थकलेल्या भागलेल्या मानवाचें तूं विश्रांतिस्थान आहेस, कंदुकक्रीडा वगैरे क्रीडा करणार्या थोरामोठ्यांची, तूं प्रिय वनस्थली आहेस, सर्व जगांतील उपवनें, उद्यानें पुष्पवनें यांचा तूं राजा आहेस. तूं जर तेथें नसशील तर सर्व शोभा विशोभित होईल. तुझ्याविरहित फुलांचे चित्रविचित्र ताटवे खुलून दिसणार नाहींत; कारंज्यांचे तुषार तूं आजूबाजूस असल्याशिवाय शोभत नाहींत. तूं साधा पण अत्तीत सुंदर आहेस, साधेपणा व सरलपणा यांतच तुझी खरी रमणीयता आहे.
बा तृणा ! तूं लहान परंतु तुझी महती अगम्य आहे, अगाध आहे. तुझें वर्णन मी कृपणमति किती करणार ? तुझें वर्णन करावयास तुझ्याप्रमाणें साधें, सरळ व परोपकारार्थ देह देणारा असें झालें पाहिजे.