आपणांकडे सुध्दां सुटींतून मुलांनी हीं कामें अवश्य करावी. हीं कामें संघशक्तीशिवाय होणार नाहीं. खानदेशांतील निरनिराळ्या खेड्यांत रस्ते अत्यंत वाईट आहेत. रस्त्यांत एका बाजूस उंचवटा तर दुसर्या बाजूस खळगा. गाडीचें एक चाक वर जातें; तर दुसरें खाली असतें. अशा रस्त्यानें जाणें हे बैलांना, घोड्यांना त्रासदायक होते. खेड्यांमधील रस्ते चांगले करणें हे काम एकेका खेड्यांत १००/१०० मुलें गेलीं तर दोन महिन्यांत बरेंच करतील. परंतु आंगमोड करुन कोणास कांही करावयासच नको; फक्त स्वराज्याच्या गप्पा मारा.
--ट्रेझर चेस्ट यामधून.
माणुसकी का सारी मेली ?
तिकडे मद्रास प्रांतांत, हरिजनांना अत्यंत पवित्र मानलेलीं महान् मंदिरें मोकळीं होत आहेत. तिकडील त्या कथा वाचल्या म्हणजे आशा वाटते. तामीलनाड हरिजन सेवक संघाचे मंत्री, श्री. गोपाळ स्वामी यांनीं त्याची जी हकिगत प्रसिध्द केली आहे ती स्फूर्तिदायक वाटते.
मीनाक्षी मंदिराचे पंच निवडून दिलेले असतात. या पंचांच्या जागांसाठी हरिजनप्रवेशास अनुकुल असे उमेदवार गोळा केले गेले. ७ पंचांपैकीं ६ हरिजन प्रवेशास अनुकूल असे निवडून आले. या निवडणुकीचे वेळेस खूप प्रचार झाला. उमेदवार निवडून आले. मंदिर प्रवेश-परिषद भरविण्यांत आली. श्रीमती रामेश्वरी नेहरु यांच्या अध्यक्षीय भाषणाने, त्याचप्रमाणे पंतप्रधान राजगोपालचारी व इतर मंत्री यांच्या भाषणांनी वातावरण फैलावत चाललें. मंदिर प्रवेश परिषदेच्या दिवशीं झालेल्या जाहीर सभेंत ३०००० लोक जमले होते. त्या विराट सभेंत एका माणसाखेरीज सर्वांनी मंदिर प्रवेशास पूर्ण संमति दिली. नंतर मंदिर-प्रवेश-परिषद स्थापली गेली. “हरिजन हे हिंदू आहेत. त्यांना मंदिरांत येऊं द्या” असें सांगणारीं शेंकडों पत्रकें सर्वत्र दिसूं लागलीं. भिंतींवर, सर्व गाड्यांवर, जिकडे तिकडे हीं पत्रकें. रोज गल्लीगल्लींत सभा होऊं लागल्या. सभांना चिक्कार गर्दी होऊं लागली. घरोघर हिंडूनहि प्रचार झाला. सारी मदुरा माणुसकीला मिठी मारण्यासाठीं उभी राहिली. मदुरेच्या मीनाक्षी मंदिरांतील पूजा अर्चा करणारे व इतर देवस्थानसंबंधीं लोक यांच्याशींहि सारखा विचारविनिमय सुरु होता. जनतेंतील उत्पन्न झालेल्या भावना त्यांनाहि समजल्या. ते तयार झाले. देवाचा बंदिवास सरण्याची वेळ आली. वनवासी लेंकरें जगन्मातेला भेटणार ! मंदिरांत हरिजन प्रवेश कधीं होणार ? लोकांत एकच भाषा, एकच ध्यास, उत्कंठा सागराच्या भरतीप्रमाणें वाढत होती.
शेवटीं तो सोन्याचा ८ जुलै १९३९ चा दिवस आला. सकाळीं ९॥। वाजता ५ हरिजनांच्या पहिल्या तुकडीनें मंदिरांत प्रवेश केला. त्या वेळेपासून पूजा अर्चेच्या प्रफुल्लित तोंडांनी व प्रफुल्लित मनानें हरिजन बंधु, भगिनी स्वच्छ पोषाख करुन मंदिरांत येतात, सवर्ण हिंदू बंधूंच्या शेजारीं उभें राहून देवाला प्रार्थितात, त्याचें मुखकमल पाहतात, त्याचें चरणकमल पाहतात.