ती ती जातजमात आपल्या जातिजमातीचा अभिमान बाळगी. आपल्या जातीचें, कुळाचें नांव वाढावें असें प्रत्येकास वाटे. आपल्या जमातीच्या पराक्रमाचे पोवाडे सर्वत्र जावेत असें त्यांना वाटे. औदार्याने, शौर्याने, अतिथ्यानें, वक्तृत्वानें माझी जात श्रेष्ठ अवी व्हावी, अशी प्रत्येक बेदुइनाला इच्छा असे. जातीचा जो मुख्य असे त्याच्या वैयक्तिक कीर्तीभोंवतीं त्याच्या कुळाचीहि कीर्ति असे. अमक्या शूर व अतिथ्यशील कुळांतला असें म्हणत. बेदुइनांच्या सर्व सद्गुणांत स्वाभिमान राजा होता. या स्वाभिमानाच्या त्यांच्या सद्गुणांत अनेक गुणांचा अंतर्भाव असे. त्या अनेक गुणांमुळे स्वाभिमान ही वस्तु बने. शौर्य व आतिथ्य हे दोन सर्वांत महत्त्वाचे गुण.

एक कवी म्हणतो - ''अरब देईल तेव्हां पाऊस पाडील, हलज करील तेव्हां सिंहासारखी उडी घालील!''

अरब योध्दा अपार शौर्याची मूर्ति असे कित्येक दिवस तो खोगीरावर काढील, अंगांत जाड, जड चिलखत घालून शत्रूच्या पाठीवर राहील, आपल्या नातलगास मारणा-याचा शोध करीत राहील. किंवा कधी श्रीमंत व्यापा-यांच्या कारवानांवर ह्ल्ले करील. लूटमार हा त्याचा मुख्य धंदाच असे. त्याची जमीन त्याला अन्न देत नसे. खजूर हीच त्याची भाकरी. म्हणून घासदाणा लुटणें प्राप्त. निसर्गाने ही भामटेगिरी त्याला शिकविली! त्याच्या आर्थिक जीवनामुळें परस्पर विरोधी गुण कसे आले पहा. सदैव गरज असे म्हणून हांव असली म्हणजे चढाई करणें हा गुणहि येतो. परंतु अरबांत हांवेबरोबर आतिथ्यहि आहे. गरीबीमुळें हांव आली आणि एकमेकांच्या कष्टमय जीवनाची जाणीव असल्यामुळें आदारातिथ्याची वृत्ति बळावली. तो आज संकटांत आहे. उद्यां मजवरहि तसा प्रसंग येईल. तो आश्रयार्थ आला आहे. उद्या मला आश्रय मागावा लागेल. या जाणीवेनें बेदुइन आतित्यशील झाला. अशा निराधारास ते आधीं अन्न देत व मग स्वतः जेवत. त्याला कपडे देत, त्याच्या गरजा भागवत. धंद्यासाठी किंवा दुर्दैवामुळें ज्याला एका स्थानाहून दुस-या स्थानीं जावें लागे अशा मित्रहीन माणसास अकारण ते आधार देत.

अरब लुटालूट करी. परंतु लुटालुटींतहि त्यानें मर्यादाधर्म ठेवला होता. तो उगीच मारहाण करीत नसे. शक्यतो हिंसा टाळी. रक्तपात टाळी. ''मी या व्यापा-याचे ओझें फत्त कमी करतो'' असे म्हणे! आणि ज्यांना लुटावयाचें तेथें स्त्री असेल तरी बेदुइन कितीहि आडदांड व उच्छृंखल असला तरी स्त्रियांशी तो अदबीनें वागे. तो स्त्रीवर हात टाकीत नसे. तो म्हणेल, ''तमचे नेसूंचें लुगडे किंमतीचें आहे. ते मला हवें आहे तुम्ही दुसरे नेसा. मी दूर जातो.'' आणि तो दूर जाऊन पाठ करून उभा राहील. इस्लामपूर्व अरबी कवितांतून या लढायांची, प्रसंगांची, वर्णनें आहेत. समोरासमोर कसे लढलों, पाठलाग कसे केले, शत्रूहि कशा शुर होता सारें वर्णिलेलें असे. अशा युध्दत दयेचा लेश नसे. द्वेषाची पराकाष्ठा असे. शत्रुपासून उदारतेची व दयेची अपेक्षा करणें लाजिरवाणें मानीत. स्वतःहि दया दाखवीत नसत. जखमी झालेल्यांसहि ठार करीत. त्यांची कुटुंबे गुलाम करीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel