पुढच्या वर्षी या सहांबरोबर आणखी सहा आले. यसरिब येथें एकंदर तीन तट होते. अरबांत दोन जमाती होत्या. खजरज व औस अशीं त्यांचीं नांवें. तिसरा पक्ष ज्यूंचा. ज्यूंनाहि वाटत होतें कीं कोणीतरी आपल्यांत नव-धर्म-दाता येणार म्हणून. अरबांनाहि वाटत होतें. ज्यूंना वाटलें कीं मुहंमदाच्या पैगंबरत्वाचा आपण अरबांना कबजात घेण्यासाठीं साधून म्हणून उपयोग करुं. येऊं देत मुहंमद येथें, ते म्हणाले. आणि अरबांच्या ज्या दोन मुख्य जमाती होत्या त्यांचे ते बारा प्रतिनिधि आले होते. एका घराण्याचे दहा व दुस-या घराण्याचे दोन.

पूर्वीच्या त्या ठरलेल्या जागीं मुहंमद वाट पहात होते. त्या घळींत वाट पहात होते. तेथें ते यसरिबचे बारा प्रतिनिधि भेटले. मुहंमदाचे ते अनुयायी  झाले. ते म्हणले, 'आम्ही एक ईश्वर मानूं. त्याच्याशी अन्य देवदेवता मिसळणार नाहीं. आम्ही चोरी करणार नाहीं. व्यभिचार करणार नाहीं. आम्ही आमच्या मुलींस मारणार नाहीं. परनिंदा करणार नाहीं. कोणाला उगीच नांवें ठेवणार नाहीं. जें जें योग्य आहे त्या बाबतींत पैगंबरांची आज्ञा पाळूं. सुखांत वा दु:खांत त्याच्याशीं निष्ठावंत राहूं.' अशी त्यांनीं शपथ घेतली. ज्या टेंकडीवर ही शपथ घेतली, त्या टेंकडीचें नांव अकबा असें होतें. म्हणून अकबाची शपथ असें या शपथेला नांव आहे. या प्रतिज्ञेला 'स्त्रियांची प्रतिज्ञा' असेंहि म्हणतात. कारण पुढें जी दुसरी प्रतिज्ञा यसरिबच्या लोकांनी घेतली ती हातांत शस्त्र घेऊन केली होती. या वेळेस हातांत शस्त्र घेतलें नव्हतें, म्हणून स्त्रियांची प्रतिज्ञा म्हणतात.

या वेळेस अबिसिनियांत गेलेला मुसब परत आला होता. तो या यसरिबच्या लोकांबरोबर गेला. नवधर्म शिकवण्यासाठीं, कुराण सांगण्यासाठीं गेला. एके दिवशीं मुसब कुराण सांगत होता. अद्याप पुष्कळ खजरज पुढारी नवधर्मी झाले नव्हते. असाच एक उसयद नांवाचा पुढारी शिकवणें चाललें असतां आला.

"हें काय चालवलें आहेस येथें ? दुबळयांना वळवूं पाहतोस. हें बरें नाहीं. प्राण प्रिय असतील व हवे असतील तर निघून जा.' तो मुसबला म्हणाला.

"तुम्हीहि जरा खाली बसा. ऐका. तुम्हाला आवडतें कां पहा. आवडलें तर घ्या' सौम्यपणें मुसब म्हणाला.
उसयद भाला रोंवून बसला. कुराण ऐकूं लागला. ऐकतां ऐकतां डोलूं लागला. आनंदानें उचंबळला.
"या तुमच्या धर्मात येण्यासाठीं मी काय करूं ?' त्यानें विचारलें.

"हातपाय धुवून या. शुचिर्भूत व्हा. आणि म्हणा कीं एका ईश्वराशिवाय दुसरा ईश्वर नाहीं. मुहंमद ईश्वराचे पैगंबर आहेत. ही शपथ घेतलीत कीं नवधर्मी, इस्लामी तुम्ही झालेत.'
त्यानें तसें तात्काळ केलें. नंतर तो म्हणाला, 'तुम्ही सादचेंहि मन वळवा म्हणजे चांगलें होईल.'

पुढें सादहि कुराण ऐकून इस्लामी झाला. कुराणाची विलक्षण मोहनी पडे. भाषेचें व विचारांचें, त्यांतील सामर्थ्यांच्या प्रत्ययाचें अपूर्व आकर्षण ऐकणाराला वाटे.
साद नंतर आपल्या जमातींत गेला व म्हणाला, 'अबुल अशालाच्या संतानांनो, तुमचें   माझें काय बरें नातें ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel