"तुम्ही आमचे नेते, सर्वांत शहाणे पुढारी. आमच्यांतील सर्वश्रेष्ठ, सुप्रसिध्द असे तुम्ही.' लोक म्हणाले.
"तर मग मी शपथपूर्वक सांगतों कीं जोपर्यंत तुम्ही एक ईश्वर मानणार नाहीं, त्याच्या पैगंबरांस मानणार नाहीं, तोंपर्यंत माझ्या जिवाला चैन पडणार नाहीं.'

"आम्ही सारे तसें करतों.' लोक म्हणाले. आणि ते सारे इस्लामी  झाले.

खजरज सारे इस्लामी झाले. बनु औस जमात राहिली होती. त्यांचा नेता कवि अबु कयास हा होता. त्याला इब्नुल अस्लात असेंहि म्हणत. तो अद्याप विरोधी होता.

आणि पुन्हां मक्केला, यात्रेला जाण्याची वेळ आली. मुहंमदांस यसरिबला बोलवायचें कीं नाहीं ? अरब म्हणाले, 'पैगंबर असोत वा नसोत, मुहंमद आमचा नातलग आहे. त्याची आई यसरिबची आहे. तो आमचा आहे. ज्यूंना निष्प्रभ करायला तो उपयोगी पडेल. आणि तो देवाचा पैगंबर असेल तर फारच छान. सोन्याहून पिवळें. हे ज्यू नेहमीं 'मेशिया येणार' मेशिया येणार, म्हणत असतात. तो आमच्यांत आला असें आम्ही अभिमानानें सांगूं. मुहंमदांची शिकवण ज्यूंसारखीच दिसते. एकेश्वरवादच आहे. म्हणून या नव धर्माचा व ज्यूधर्माचा समन्वयहि करतां येईल. भांडणें जातील. सारे सुखानें राहूं. एकेश्वरी मत आम्हांला अपरिचित नाहीं. येऊं दे मुहंमदाला. पैगंबर म्हणून, मेशिया म्हणून, आमच्यांत शांतिकर्ता म्हणून कोणत्याहि नांवें येवो.'

ज्यू व अरब सारे म्हणाले, 'येऊं दे.' यसरिबचें जीवन सारे फाटलें होतें. पक्षोपपक्षांच्या द्वेषमत्सरांनीं विदीर्ण झालें होतें. म्हणून पैगंबरांचें स्वागत करायला सारे उत्सुक होते.

मुसब यसरिबचे पाऊणशे लोक घेऊन निघाला. त्यांमध्यें कांहीं चारपांच मूर्तिपूजकहि होते. त्यांनीं अद्याप नवधर्म घेतला नव्हता. परंतु मुहंमदांस पहावयास व त्यांना आमंत्रण देण्यास तेहि आले होते.

ती पहिली प्रतिज्ञा घेऊन व मुसबला घेऊन बारा लोक गेले व आतां पाऊणशे पुन्हां आले, या मधला काळ मोठा आणीबाणीचा गेला. मुहंमदाच्या मनांत या काळांत आशानिराशांचा भीषण झगडा चालला होता. त्या             झगडयांतून शेवटीं आशा डोकावे. मुहंमद म्हणत, 'एक दिवस असा उजाडेल ज्या दिवशीं सत्याचा प्रकाश पसरेल. मी जिवंत नसलों तरी पसरेल.'

मक्केंत सर्वत्र धोका होता. वाघाच्या तोंडांत जणु ते होते. आपल्या शूर व निष्ठांवंत अनुयायांसह तेथें ते निर्भयपणे वावरत होते. तें धर्य असामान्य होतें. ती श्रध्दा अलोट होती. अद्वितीय होती. याच आंतरिक झगडयाच्या काळांत मुहंमदांस तें एक अपूर्व दर्शन घडलें. 'आपण स्वर्गांत गेलों आहोंत. तेथें प्रभूचें भव्य मंदिर पहात आहोंत.' असें त्यांनीं पाहिलें. कुराणांतील सतराव्या सु-यामध्यें हें वर्णन आलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel